राजचा तडका, पवार मात्र शांतच
पक्ष बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरे करीत असलेल्या सत्ताधाऱ्यांवर झोंबरी टीका केलीय. दौरे हा भंपकपणा आहे. दौरे कसले करता? जनावरांना चारा द्या, जनतेला पाणी द्या, असं त्यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळाचा प्रश्न दौरे करून सुटणारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान, औरंगाबादमधील पत्रकारांनी राज यांच्या विधानाकडं लक्ष वेधलं असता शरद पवार यांनी 'या विषयावर बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाही,' असं सांगत चुप्पी साधणंच पसंत केलं.
पवारांचा मराठवाडा दौरा
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यानंतर आज औरंगाबाद इथं सर्वपक्षीय मंत्र्यांच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्याची दुष्काळी परिस्थिती भीषण असून पाणीटंचाईचा प्रश्न सर्वात गंभीर असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारनं दुष्काळ मदत देण्यासंबंधी केंद्र सरकारला निवेदन द्यावं. त्यानंतर तातडीनं मदत कशी मिळेल, यासाठी मी मदत करीन. कृषिमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या समितीच्या माध्यमातून मराठवाड्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू, तसंच मनरेगामार्फत जास्तीत जास्त रोजगार देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करू, असं आश्वासनही पवार यांनी दिलं.
दुष्काळाचं राजकारण नको
दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून यामागं कोणत्याही पक्षानं राजकारण करू नये, असं सांगत, सर्व पक्षांनी मिळून दुष्काळाचा सामना करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांना मराठवाड्यातील दुष्काळाची माहिती दिली असून या भागाचा आढावा घेण्यासाठी दौरा करण्याची विनंती त्यांना केली आहे, असंही पवार म्हणाले.
अधिकाऱ्यांचे टोचले कान
दौऱ्यानंतर पवार यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. उपलब्ध असलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सर्वांनी कंबर कसून काम करा, असं सांगताना अधिकाऱ्यांनी केवळ नियमांवर बोट न ठेवता वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली अधिकारांतर्गत निर्णय घेऊन कामं करावीत, असं आवाहन केलं. केंद्राकडून मिळालेल्या 780 कोटींचा निधी तातडीच्या कामांवर खर्च करून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या, असंही पवार म्हणालेत.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट
दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे दोन हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. यासाठी दुष्काळग्रस्त भागांतील महाविद्यालयं आणि विद्यापीठांकडून गरजू विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात येणार आहे. तसंच राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्यापासून ते ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यानं यासाठी आपलं एक महिन्याचं वेतन दयावं, असं आवाहनही पवार यांनी केलंय.
दुष्काळ प्रस्ताव तातडीनं मंजूर करणार - अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद या तीव्र दुष्काळी भागातील दुष्काळ निवारण प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देण्यात येईल, असं आश्वासन दिलं. औरंगाबाद वाढीव पाणी प्रस्तावासाठी ९ कोटी रुपये, जालना पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी (पैकी १४ कोटी दिलेत), तर उस्मानाबाद पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ कोटी (पैकी २५ कोटी रु. दिलेत), तातडीनं मंजूर करण्यात आल्याचं सांगत उर्वरित रक्कम मुंबईला गेल्यानंतर त्वरित देऊ, असंही अजित पवार म्हणाले. चारा छावण्या उघडण्यासंबंधीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना विशेष आर्थिक अधिकार देण्यासंबंधी सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
या बैठकीला मराठवाड्यातील नऊपैकी केवळ तीनच खासदारांनी हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री मंगळवारी दौऱ्यावर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी (12 फेब्रुवारी) मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचं उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी या गावी आगमन होईल. त्या ठिकाणी असलेल्या जनावरांच्या छावणीस भेट देऊन ते शेतकरी आणि ग्रामस्थांसमवेत चर्चा करतील. दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्यातील आष्टी, मुशंदपूर, सिद्धवाडी येथील जनावरांच्या छावण्यांना भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांसमवेत चर्चा, तसंच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची पाहणी करतील. दुपारी 3.15 वाजता बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायंकाळी 4.15 वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक.
मराठवाड्यात 706 टँकर
मागील वर्षी याच सुमारास मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मिळून केवळ दोन टँकर औरंगाबाद जिल्ह्यातील दोन गावांमध्ये सुरू होते. औरंगाबाद जिल्ह्यात 201, जालना जिल्ह्यात 171, बीड जिल्ह्यात 141, उस्मानाबाद जिल्ह्यात 153 तर नांदेड जिल्ह्यात 40 याप्रमाणं एकूण 706 टँकरद्वारे 504 गावं आणि 170 वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
Comments
- No comments found