टॉप न्यूज

एकटाच भिडणार..!

ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज-उद्धव एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच उद्धव यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत कोणी मनापासून शिवसेनेसोबत येणार असतील तर मी त्यांचं स्वागतच करीन, असं सांगताना टाळी एका हातानं वाजत नाही, असं सूचकपणं सांगितलं होतं. परंतु, आज कोल्हापुरात झालेल्या भव्य सभेत राज यांनी 'मला जे काय करायचं आहे, ते स्वतःच्या ताकदीवर करीन,' असं जाहीर केल्यानं या दोघांचे मार्ग वेगवेगळे असतील, यावर शिक्कामोर्तब झालंय.  
 


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीय. या दौऱ्यातील पहिली जाहीर सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात झाली. या सभेची भव्यता पाहता राज यांचा दौरा झंझावाती होणार, हेदेखील स्पष्ट झालंय.


Raj T1युती वगैरे काही नाही
मनोमिलनाच्या चर्चा पेपरातून होतात का, असा सवाल त्यांनी सुरुवातीलाच केला. तुम्ही उद्या एखाद्याला लग्न करायला सांगितलं तर ते काय मेळावा घेऊन होतं का, अशा शब्दांत त्यांनी टाळी देण्यासाठी पुढं आलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव यांच्या आवाहनाची खिल्ली उडवली. माझ्या डोक्यात युती वगैरे करायचा कुठलाही विचार नाही. जे करायचं ते स्वतःच्या ताकदीवरच करीन आणि त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात जातोय, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

 

सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली
या सभेत राज यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवत परप्रांतीयांचा मुद्दा परत एकदा जोरकसपणं मांडला. मराठी माणसाच्या हिताच्या आड जे येतील त्यांना चिरडून जे जे करणं आवश्यक आहे ते ते सर्व करण्याचं अभिवचनही जनसमुदायाला दिलं.

 

दुष्काळ दौरा करणार नाही
आपला राज्यव्यापी दौरा हा दुष्काळासाठी नाही, तर महाराष्ट्र काबीज करण्यासाठी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या नेत्यांसारखं दुष्काळाचं राजकारण आपण करणार नाही, दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार नाही. जी काही मदत लागेल ती पाठवून देईन.  दुष्काळासाठी काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. एवढी वर्षं काँग्रेसचं राज्य असूनही दुष्काळावर अजून का तोडगा निघाला नाही? गुजरातमध्ये जाऊन बघा... तिथं दुष्काळ पडतो का? नाकर्ते राज्यकर्ते असल्यावर दुष्काळ पडणार नाही तर काय होईल, असा सवालही राज यांनी केला.

 

केसेसना भीक घालत नाही
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर घ्यायला मी तयार आहे. अशा केसेसना मी भीक घालत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी मी बोलतच राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातल्या आया-बहिणींवर हात टाकणारे परप्रांतीय हात कलम करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
 

टोल नव्हे निवडणुकीचा फंड
महाराष्ट्राच्या विकासाचा धावता आढावा घेत महाराष्ट्राच्या मागासलेपणाला काँग्रेसच कसं जबाबदार आहे हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. कोल्हापुरात गाजत असलेल्या टोलच्या प्रश्नालाही त्यांनी हात घातला. टोलच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादी निवडणुकीचा फंड जमा करतात. बरं टोल घ्या, पण रस्ते तरी चकाचक आहेत का, असा सवाल करून ही टोलधाड बंद करा, असं त्यांनी सांगितलं.  

 

इथल्या भूमिपुत्राची सरकारला काळजी नाही. त्यांच्या विकासाची काळजी नाही, परप्रांतीयांची काळजी घेणाऱ्या सरकारला महाराष्ट्राच्य़ा विकासासाठी कुठं वेळ मिळणार, असा टोलाही  राज यांनी सरकारला मारला.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.