टॉप न्यूज

डहाणूत चिकूचा महाउत्सव

ब्युरो रिपोर्ट, ठाणे
मराठी मातीत पिकणाऱ्या फळांचा गोडवा सर्वदूर पसरवा आणि त्याला मोठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशानं अलीकडच्या काळात वेगवेगळे महोत्सव भरवले जातात. आंबा महोत्सव, काजू महोत्सव, हुरडा पाटर्या, भरीत पाटर्या त्यापैकीच. चिकूचं आगार समजलं जाणाऱ्या डहाणूत असाच चिकू महोत्सव झाला. लहानमोठ्या आकाराचे, तसंच विविध प्रकारे कापलेले चिकू पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. महोत्सवादरम्यान हजारो पर्यटकांनी चिकूचा आस्वाद तर घेतलाच. शिवाय चिकूच्या नवनवीन रेसिपीही समजून घेतल्या.
 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोकण भूमी प्रतिष्ठान, महाराष्ट्र कृषी विभाग, चिकू उत्पादक संघ, डहाणू नगरपालिका, डहाणू तालुका पर्यावरण उत्कर्ष संघटना आणि इन्टॅक यांच्या संयुक्त विद्यमानं कॅम्पिंग ग्राऊंड इथं हा महोत्सव पार पडला. महोत्सवात चिकूच्या अनेक प्रजाती मांडण्यात आल्या होत्या. अनेक बचत गटही सहभागी झाले होते.

 

chiku festival 1सात कोटींचा निधी जाहीर

आदिवासी विकास राज्यमंत्री आणि फलोत्पादन राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते झोकात उद्घाटन झालं. बोर्डी-घोलवड परिसराच्या पर्यटन विकासासाठी 4 कोटी रुपये, तर बोर्डीच्या समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी गावित यांनी जाहीर केला. तसंच सरकार आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मदत मिळाली तर या भागातील चिकू बागायतदारांच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी लागणारी सर्व मदत केली जाईल, असं अश्वासनही त्यांनी दिलं. आमदार भाई जगताप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, फलोत्पादन संचालक दिगंबर गायकवाड, पर्यटन महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे, वरिष्ठ व्यवस्थापक मनीषा धुळे-जायभाये, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, प्रभाकर सावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

आदिवासी नृत्य आणि खाद्य पदार्थही

या महोत्सवात पर्यटकांना तसंच इथं भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन दिवस अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी समाजाची ओळख असलेल्या तारपा-वारली नृत्याबरोबरच, आदिवासींनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू, कृषी उत्पादनं, बुरूड हस्तकला, वारली कला यांचं प्रदर्शनही इथं आलेल्या पर्यटकांचं आकर्षण ठरलं. तसंच, स्थानिक खाद्य संस्कृतीमध्ये पारशी, इराणी खाद्यपदार्थांची चव या निमित्तानं खवय्यांना घेता आली. तर चिकू सफारी, पतंग फेस्टिव्हल यांसारख्या अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. एकूणच चिकूचं मार्केटिंग करण्याबरोबरच कृषी पर्यटनाला चालना देणारा हा महोत्सव ठरला.


chiku festival  photo 1चिकूशी जोडलंय अर्थकारण

मराठवाड्यासह आणि पश्‍चिम महाराष्ट्रात चिकूची मोठी लागवड करण्यात येते. गुजरात, आंध्र, कर्नाटक राज्यातदेखील या फळाची लागवड होत असून; तिथल्या कालीपत्ती, पिवळीपत्ती, कोइमतूर 4 अशा जाती प्रचलित आहेत. ठाणे जिल्ह्यात कालीपत्ती या जातीची लागवड मुख्यत्वेकरून आढळते. राज्यात एकूण ५३ हजार हेक्टर जमिनीवर चिकूची लागवड असून, त्यातील 16 हजार हेक्टर एवढं चिकूचं क्षेत्र हे केवळ ठाणे जिल्ह्यात आहे. तलासरी, डहाणू, वाडा, वसई या भागांतील अर्थकारण चिकूशीच निगडित असल्यानं या फळाला इथं प्रचंड महत्त्व आहे. या फळाच्या शेतीतून इथल्या हजारो आदिवासी शेतमजुरांना रोजगार मिळतोय.

आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त फळ

चिकू हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त फळ आहे. माणसाच्या आजारपणामध्ये, तसंच जास्त अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्‍टर त्या रुग्णाला चिकू खाण्यास अथवा चिकूचा रस पिण्याची शिफारस करतात. याचं कारणं हेच, की या फळामध्ये 12 ते 14 मि.ग्रॅ. साखर, 18 ते 20 मि.ग्रॅ. कॅल्शियम, तर 6 ते 8 मि.ग्रॅ. 'क' जीवनसत्त्व आहे. यामुळं शरीराची आजारपणामुळं झालेली झीज भरून निघते, तर हाडांतील ठिसूळपणाही कमी होण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांपासून या फळझाडांवर बी पोखरणारी अळी, तसंच कळ्या पोखरणाऱ्या अळीचा रोग पडलेला दिसून आला होता. परंतु अनेक प्रयोगानं, तसंच कीटकनाशकांमुळं आता या रोगाचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालंय.

chiku festival  photo 9चिकू संशोधन केंद्राची मागणी

अलीकडच्या काळात ठाण्यात चिकू संशोधन केंद्र व्हावं, अशी मागणी होतेय. ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर भागात शंभर वर्षांपेक्षा चिकूच्या जुन्या बागा आहेत. हे मोठे वृक्ष वातावरणातील प्रदूषण कमी करण्यामध्ये, तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठं योगदान देत असतात.


रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोद्यान मोहिमेद्वारे चिकू लागवडीस प्रोत्साहन दिलं जातं. यामुळं सध्या या फळाच्या लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चाललंय. परंतु दुसरीकडं शेतकरी खूप मेहनत, तसंच पैसा खर्च करूनही त्यांना यापासून हवं तसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळं या फळावर संशोधन करण्याची गरज भासत आहे. यासंबंधी चिकूच्या संशोधनासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद सोसायटीनंही लक्ष देण्यास सुरुवात केली असून, बंदरपट्टी भागातील चिकू या फळावर संशोधन व्हावं, यासाठी सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त असं अद्ययावत केंद्र पालघर इथं उभारण्यास परिषदेकडून मंजुरी मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष यांनी दिली.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.