टॉप न्यूज

गुलाबाला गंध मराठी मातीचा..!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई/पुणे/कोल्हापूर
जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाईन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले गेलेत. यामुळं थोडेथोडके नव्हेत तर तब्बल 10 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. याशिवाय देशातील मुंबई, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच. मग रेड रोझ हातात घेऊन शेतकऱ्यानंही 'हॅपी व्हॅलेंटाईन डे' म्हटलं तर बिघडलं कुठं भाऊ?


Intro imageकोल्हापूरचे मळे बहरले

कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडिग्रे तसंच जयसिंगपूरजवळील ग्रीन हाऊसमधून 15 लाखांहून अधिक गुलाबांची निर्यात झाली. कोंडिग्रेच्या श्रीवर्धन बायोटेक या फर्ममध्ये १०३ एकरांपैकी ३२ एकरांत केवळ गुलाबच केले जातात. त्यात रेड, यलो, पिंक यासह विविध रंगांच्या आणि रेड अप्पर क्लास, ग्रँडगाला, समुराई, बिग बी, गोल्ड स्टाईल, स्प्रिंक्स, स्कायलाईन, शकिरा, नोबलेस यासह विविध जातींच्या गुलाबांच्या फुलांचं उत्पादन घेतलं जातं. 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी फुलं तयार व्हावीत, या दृष्टीनं त्यांचं नियोजन केलं जातं. दोन महिने आधी झाडांची छाटणी केली जाते. नंतर झाडावर आलेल्या कळ्यांची काळजी घेतली जाते. थंडीपासून त्यांचं संरक्षण केलं जातं. वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येते. ठिबक पद्धतीनं खतं दिली जातात. कळ्यांना योग्य आकार यावा यासाठी कॅप बसवल्या जातात. 'व्हॅलेंटाईन डे'च्या अगोदर या कळ्या १४ ते १७ इंच देठ ठेवून तोडल्या जातात. नंतर त्यांचं पॅकिंग केलं जातं. विशेषतः जपान, स्वीडन, ग्रीससह अन्य देशांत ही फुलं पाठवली जातात. त्यापासून देशाला सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचं परकीय चलन मिळतं.Washim Rose 2

 

मावळातूनही निर्यात

मावळातूनही मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात झालीय. यंदा गारठा हाडाला भिडणारा होता. त्याचा फटका गुलाब फुलांना बसलाय. कळीला असतानाच फुलं गोठल्यानं उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती मल्हारी दाभाडे या शेतकऱ्यानं दिली. व्हॅलेंटाईन डेसाठी मावळातून ४५ ते ५० लाख फुलांची तोडणी झालीय. परदेशी आणि देशभरातील बाजारपेठेत ही फुलं गेली असून त्यातून सुमारे चार कोटींपर्यंत उलाढाल जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. गतवर्षी एका फुलाला प्रतवारीनुसार पाच ते नऊ रुपये भाव मिळाला होता आणि स्थानिक बाजारपेठेतून ६० लाख फुलांची विक्री झाली होती. तुटवडा आणि मागणीमुळं यंदा एका फुलाला प्रतवारीनुसार १० ते १५ रुपये मिळणार आहेत.


Washim Rose 1
सण उत्सवालाही मागणी

सण, उत्सव यासोबतच लग्न हंगामातही गुलाबाला मागणी असते. बाजारभाव हा स्थिर नसला तरी फुलाला सरासरी ४ ते ५ रुपये भाव मिळतो. व्हेलेंटाईन डेला ४० सेंटिमीटरच्या फुलाला ६ रुपये तर ७० सेंटिमीटरच्या फुलाला १२ ते १३ रुपये भाव मिळतो. या गुलाबासोबतच कार्नेशन, जरबेरा यालाही मागणी असते. गुलाब शेतीतून वार्षिक ६ ते ७ लाख रुपये तर कार्नेशन, जरबेरामधून वार्षिक २ ते ३ लाख रुपये एवढं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.