टॉप न्यूज

दुष्काळग्रस्त उतरले रस्त्यावर

ब्युरो रिपोर्ट, सांगली
दुष्काळाचा वणवा पेटू लागलाय. त्याच्या झळा सगळीकडंच बसू लागल्यात. अशा वेळी सरकारी यंत्रणा कार्यक्षमतेनं आणि सुसंगतपणानं राबत नसेल तर दुष्काळग्रस्तांच्या संतापाचा भडका कसा उडतो, हे सांगलीतल्या जत-अथणी हायवेवर पाहायला मिळालं. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी करत 35 गावांमधल्या हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडलं. तसंच पाणी मिळालं नाही तर लोकप्रतिनिधी राजीनामा देतील, सगळी गावं निवडणुकांवर बहिष्कार घालतील, असा निर्वाणीचा इशाराही या आंदोलकांनी दिला.   
 

बुधवारी जतच्या पूर्वेला असलेल्या 35 गावांमधल्या गावकऱ्यांनी पाण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडलं आणि सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरली. या गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावतेय. याच गावांसाठी कृष्णा खोऱ्यातला म्हैशाळ प्रकल्प उभा राहिला. पण त्याला 18 वर्षं उलटून गेली. अजूनही या गावांमध्ये म्हैशाळचं पाणी काही पोहोचलं नाही.

महिनाभरापूर्वी जत शहरातल्या बिरनाळ तलावात म्हैशाळचं पाणी सोडण्यात आलं. त्यामुळं शहराचा पाणीप्रश्न सुटला. पण जतच्या पूर्वेला असलेल्या 35 गावांना या पाण्यातला थेंबही मिळाला नाही. कारण अजून धरणाच्या कालव्यांची कामंच अपूर्ण आहेत. मग या तलावातून पाईपलाईननं तरी आम्हाला पाणी द्या, घोषणा केल्याप्रमाणं कर्नाटकातून, सोलापुरातून पाणी आणा. आमचे तलाव, विहिरी भरून द्या,  अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. म्हैसाळ प्रकल्पाचं काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं 105 कोटींची मदत करावी, अशी जोरदार मागणीही आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केली.

 

...तर निवडणुकांवर बहिष्कार

sang.rastaआम्ही आता राजकारण्यांच्या घोषणांना कंटाळलो आहोत. आता आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नाही. तसंच इथून पुढच्या सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असा निर्णयच यावेळी आंदोलकांनी जाहीर केला.  याशिवाय डफळापूर, बिळूर आणि दरीबडची या तीन जिल्हा परिषदेचे सदस्य, डफळापूर, बेळंकी, बिळूर, उमराणी, मुचंडी आणि दरीबडची या सहा पंचायत समितीचे सहा सदस्य, तसंच ३३ गावांचे ग्रामपंचायत सदस्य या प्रश्नावर राजीनामा देणार असल्याचा ठरावसुद्धा या आंदोलनात मांडण्यात आला.

 

म्हैशाळ जल सिंचन योजनेची कामं निधीअभावी रखडली आहेत. त्यामुळं हा निधी सरकारनं लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असून, पाणी आणि चाऱ्यासाठी लोकांची वणवण होतेय. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रास्ता रोको आंदोलनासाठी शेतकरी आपले दैनंदिन सर्व व्यवहार बंद ठेवून सहभागी झाले होते.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.