टॉप न्यूज

भराडीआईचा उदो...उदो...!

मुश्ताक खान, मालवण, सिंधुदुर्ग
दक्षिण कोकणची काशी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मसुरे-आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीबाईची जत्रा अलोट गर्दीत आणि उत्साहात पार पडली. कोकणातल्या लाल मातीच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या जत्रेचं उत्तम व्यवस्थापन ग्रामस्थांनी केलं होतं. सामान्य भक्तांसोबतच उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारण्यांनीही जत्रंला हजेरी लावून भराडीआईचा उदोsss उदोsss केला. सुमारे 15 लाखांवर भक्तांनी भराडीआईचं दर्शन घेतलं. निवडणुका जवळ आल्यानं राजकारण्यांची गर्दी यावेळी ठळकपणे जाणवत होती. जत्रेत प्रसाद, खेळणी आदींची सुमारे पाच कोटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
 

aanganwadi jatra 15 लाख भाविकांची गर्दी

मालवण शहरापासून १२ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मसुरे गावातील आंगणेवाडी ही एक वाडी. या वाडीतली लोकसंख्या जेमतेम हजाराच्या आसपास. पण आंगणेवाडीच्या जत्रेला मात्र अवघा महाराष्ट्र लोटतो. जवळपास 15 लाख भाविक भक्तिभावानं भराडीदेवीचं दर्शन घेण्याच्या ध्यासानं आंगणेवाडी गाठतात. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भराडीदेवीच्या या जत्रेतली गर्दी पाहून डोळ्याचं पारणंच फिटतं. महत्त्वाचं म्हणजे, देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं स्वागत करणारे बॅनर्स इथल्या परिसरात जागोजागी दिसताहेत. या बॅनर्सबाजीतून कोणताही राजकीय पक्ष सुटलेला नाहीये. जणूकाही निवडणुकांमुळं बॅनरयुद्धच सुरू झालंय की काय, असं वाटतंय.

 

जत्रेसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या
आंगणेवाडीच्या जत्रेचा संबंध पेशव्यांच्या कारकिर्दीशी आहे. पण पूर्वी आजच्याएवढी प्रसिद्धी न मिळालेल्या या जत्रेची कीर्ती आज सर्वदूर पसरत आहे. ९०च्या दशकात मुंबई महानगरपालिकेतले बहुतेक नगरसेवक हे कोकणातलेच होते. त्यामुळं भराडीदेवीच्या जत्रेत आल्यावर प्रत्येक जण भराडीआईचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन हमखास जाई. त्यावेळी या जत्रेला शिवसैनिकांची जत्रा असंही म्हटलं जायचं. कोकणातले नेते आणि नारायण राणे यांनीही या यात्रेच्या प्रचारा आणि प्रसारासाठी आपली यंत्रणा कामाला लावली. हळूहळू याची महती सर्वदूर पोहोचू लागली आणि मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून गाड्या सुटू लागल्या... पण युतीच्या सत्तेच्या काळात जत्रेचं स्वरूपच पालटलं... गेल्या १५-२० वर्षांत इथली जत्रा आंगणेवाडीची जत्रा म्हणून प्रसिद्धीस आलीय.

 

देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख
भराडीदेवीच्या जत्रेची तारीख निश्चित ऩसते. इथेच खरी गोम आहे. इतर जत्रेप्रमाणं वार, तिथी ही प्रथा या जत्रेला नाही. तर हीची तारीखही देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. एकदा ही तारीख नक्की झाली, की मग त्याच्यात कोणताही बदल होत नाही.

 

स्कायवॉकचं आकर्षण
दर्शनासाठी लाखोंची गर्दी असूनही भाविकांना देवीचं दर्शन लवकरात लवकर व्हावं यासाठी यंदा व्यस्थापन समितीनं विशेष काळजी घेतली होती. गेल्या वर्षीपर्यंत दर्शनासाठी इथे 3 रांगा लागायच्या, पण यंदा दर्शनासाठी 6 रांगा केल्यामुळं भाविकांना दर्शन लवकर घेणं सोयीस्कर झालं. इथं उभारण्यात आलेला २-३ किलोमीटरचा लाकडी स्कायवॉक हा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. मुंबई-पुण्यातल्या इंजिनीयर्सनाही आश्चर्य वाटावं, असा हा स्कायवॉक आहे.

 

गरिबांचा मॉल
इथली आंगणेवाडीची बाजारपेठही बघण्यासारखी आहे. विविध वस्तूंच्या दुकानांनी सजलेल्या इथल्या बाजाराची जत्रेच्या काळात एका दिवसाची उलाढाला कोट्यवधींच्या घरात होते. इथं सजवलेल्या दुकानांमधून कोकणातले खास खाद्यपदार्थ, चादरी, फळं, प्लास्टिकचे गजरे, विविध प्रकारच्या कुंकवाची दुकानं, संसारोपयोगी वस्तू आणि इतर सर्व हव्या त्या वस्तू इथे मिळतात. थोडक्यात, भराडीदेवीच्या जत्रेतली बाजारपेठ म्हणजे गरिबांचा मॉल समजला जातो. एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करता येत असल्यामुळं ग्राहकांचीही या वस्तू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.  

 

यात्रेवर सीसीटीव्हीचा डोळा
मुंबई-पुण्यासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची काळजीही इथं चोखपणं घेतली गेली. यंदा अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी 6 वॉच टॉवर्स उभारले होते. शिवाय मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.

aaganewadi jatra photo  2 पोलिसांची करडी नजर
त्याचबरोबर 2 डीवायएसपी, 10 पोलीस निरीक्षक, 24 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 315 पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड्स, 2 राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि एक बॉम्बशोधक पथक असं मोठ्या प्रमाणावर पोलीस दल इथं तैनात होतं. त्यामुळं होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घातला जाऊन येणाऱ्या भाविकांना निर्वेधपणं, मोकळ्या मनानं या जत्रेत वावरता आलं. 

 

कशासाठी आईच्या आशीर्वादासाठी

भराडीदेवीच्या जत्रेचं हे भव्या स्वरूप पाहून अनेक जण अक्षरश: भारावून जातात. कोकणातल्या या सर्वात मोठ्या आणि सुप्रसिद्ध असलेल्या या जत्रेमुळंच ‘जत्रा’ या शब्दाचा खरा अर्थ उमजतो. तो म्हणजे लहान-थोर कुणीही असो, इथं येणारा प्रत्येक जण मग तो राजकारणी असो, सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य माणूस तो भावपूर्ण श्रद्धेनं केवळ भराडीआईच्या चरणी नतमस्तक होतो... तिच्या आशीर्वादासाठी भिक्षुक होतो...

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.