टॉप न्यूज

लढवले पेच... कापला पतंग...

शशिकांत कोरे, सातारा
"होsss ओsssकाट...काट...”  या शब्दांसोबत समोर येतात आकाशात उंचच उंच भरारी घेणारे आणि मध्येच सूर मारत वेगात पेच कापणारे रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे पतंग. पौषातल्या कोवळ्या उन्हामध्ये हा पतंगांचा खेळ पाहण्यासाठी आणि याची मजा लुटण्यासाठी बच्चे कंपनीसोबतच मोठेही दंग होतात.  मोबाईल, कॉम्प्युटर गेममध्ये रमलेल्या आजच्या तरुण पिढीनं थोडं बाजूला होऊन आपल्या पारंपरिक मैदानी खेळांचा आनंद घ्यावा, या उद्देशानं साताऱ्यात पहिल्यांदाच 'अजिंक्यतारा पतंग महोत्सव' आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये जवळजवळ 800 स्पर्धकांनी भाग घेतला.
 

चली चली रे पतंग...

साताऱ्यातलं कोटेश्वर मैदान मांजा, पतंग, पेच या शब्दांनी दणाणून गेलं. निमित्त होतं साताऱ्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या 'अजिंक्यातारा पतंग महोत्सवा'चं. विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्सच्यापलीकडं जाऊन खऱ्या अर्थानं मैदानाकडं वळायला पाहिजे. या उद्देशानं दत्ताजी थोरात मित्रसमूहाच्या पुढाकारानं शहरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं.
यासाठी गुजरातच्या व्हायब्रंट काईट ग्रुपनंही सहकार्य केलं.

kite festival image 1या स्पर्धेत भाग घेतलेल्या 800 विद्यार्थ्यांसोबत कॉलेज युवक, पालक असा जवळपास दोन हजारांचा प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. अभ्यासातून सुट्टी घेऊन मुलांनी ही पतंग उडवण्याची धूम माजवली. आपल्या मुलांनी व्हिडिओ गेम्सना बगल देऊन पारंपरिक खेळ खेळण्यासाटी मैदानाकडं मोर्चा वळवल्यानं त्यांचे पालकही समाधानी दिसत होते. या दुहेरी समाधानामुळं दरवर्षी अशा प्रकारे पतंग महोत्सव सातारा शहरात घेण्याचा निर्णय संयोजक दत्ताजी थोरात यांनी घेतलाय.

 

पतंगांचा इतिहास

हवेत पतंग उडवणं हा एक आकर्षक आणि मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. त्यासाठी विशिष्ट कौशल्य लागतं. दोन पातळ कामट्यांना कागद चिकटवून पतंग तयार केला जातो. त्यातील उभ्या कामटीला ‘तिड्डा’ तर आडव्या कमानीसारख्या कामटीला ‘कमान’ म्हणतात. पतंगाला सामान्यपणं खाली लांब शेपटी जोडतात. पतंग आकाशात उंच उडवता यावा, म्हणून त्याला लांब दोरा बांधलेला असतो. त्यास तिड्डा आणि कमानी यांच्याविरुद्ध बाजूस ‘किन्ना’ बांधतात. पतंग हे विविध आकारांचे, तसंच प्रकारांचे असून ते कागद, कापड वा प्लॅस्टिक यापासून बनवितात.


kite festival image 2प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ टरेन्टमचा आर्काईटस यानं इ. स. पू. चौथ्या-पाचव्या शतकात पतंगाचा शोध लावला असं मानलं जात असलं, तरी आशिया खंडात तो त्यापूर्वी अनेक वर्षं ज्ञात असावा, असं दिसतं. एक चिनी सेनानी हान सिन यानं इ. स. पू. २०६ मध्ये युद्धात पतंगाचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. कोरियन, चिनी, जपानी आणि मलायी लोकांचा पतंग हा राष्ट्रीय खेळ आहे.


पतंगाचा खेळ अनेक शतकांपासून भारतीयांना परिचित आहे. हा खेळ चीनमधून भारतात आला, असं एक मत आहे. भारतात मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला. उत्तर भारतात हा खेळ विशेषत्वानं खेळला जातो. गुजरातमध्ये पतंगाचा खेळ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो. संक्रांतीचा दिवस फार महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातही पतंगाचा खेळ मुलांमध्ये विशेष प्रिय आहे. चीनमध्ये नवव्या महिन्याचा नववा दिवस हा ‘पतंग दिन’ म्हणून पाळला जातो.

 


kite festival image 3पतंगांचे प्रकार

पतंगांचे विविध आकार आणि प्रकार दिसून येतात. पक्षी, माणसं, जहाज, फुलपाखरं इ. विविध आकारांत पतंग तयार करतात. पेटी-पतंग (बॉक्स काइट) हा प्रकारही विशेष लोकप्रिय आहे. भारतीय पतंग सामान्यतः चौकोनी आकाराचे असतात. पतंगाचा आकार आणि किमती यांवरून ‘पैचुडी’, ‘चापट’, ‘अद्धा’, ‘पोण्या’, ‘ताव्या’ इ. प्रकार केले जातात. चिनी पतंग सामान्यतः बदामाकृती असतात. चिनी पतंगांना कित्येकदा ‘ड्रॅगन’चा वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला जातो. विविध प्रकारच्या पतंगांना शोभा आणण्यासाठी चित्रविचित्र रंग आणि वस्तू यांचा वापर केला जातो. कित्येकदा पतंग एकाच रंगीत कागदाचा न बनवता अनेक रंगीत लहान-लहान तुकड्यांचा बनवतात.

एकूणच काय तर, या सर्व इतिहासाची, परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि पतंगासारख्या मैदानी खेळाची सगळ्यांनीच मजा लुटावी, यासाठीच पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.