टॉप न्यूज

बैलगाडा शर्यत झाली सुरू!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई / पुणे
बैलगाडा शर्यतीवरील बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं अवघ्या मराठी मुलखातील बळीराजा एकदम खूश झालाय. दावणीच्या ढवळ्या-पवळ्यावर जीवापाड जीव लावणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. परंतु, बंदीमुळं त्यांचं याडंच पळालं व्हतं. आता या  शर्यती पुन्हा सुरू होतील. जत्रा-यात्रांमधून बैलं धावतील, फुफाट्यात आभाळाला भिडणारी भिर्ऱर्ऱ अशी आरोळी ऐकायला येईल, टोप्या आणि फेटे उडतील, एकूणच काय तर मातीत राबणाऱ्या हातांची तब्येत एकदम खूश होऊन जाईल.
 

 

Bailgada Sharyatतूर्तास परवानगी

बैलगाडा शर्यतीवर हाय कोर्टानं डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खेड तालुका बैलगाडा चालक-मालक संघटना, तसंच भंडारा इथले प्रभाकर सपाटे यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून बंदी उठवण्याची मागणी केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती दिली आहे. त्यामुळं अंतिम निकाल लागेपर्यंत बैलगाडा शर्यतींना तूर्तास परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं असून, बैलगाडा शर्यतीदरम्यान काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांचं पालन शर्यतीदरम्यान करावं लागणार आहे.

 

न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि राधाकृष्णन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगिती कायम राहील. बैलांचा छळ होऊ नये म्हणून काही नियम आणि अटी घालून देण्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलं. त्या अटींचं पालन करून परवानगी मिळाली. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्यावतीनं संजय खर्डे, मार्ला पल्ले आणि बैलगाडा चालक-मालक संघटनेच्यावतीनं उदय ललित या वकिलांनी युक्तिवाद केला.

 


Bailgada 3 2राज्य सरकारवर टीकास्त्र

न्यायालयाच्या निकालानंतर शिरूर-मंचरचे खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांनी मंचरला घेतलेल्या विजयी सभेत राज्य सरकार आणि प्रशासनावर टीका केली. शर्यतींबद्दल काडीचीही माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यानंतर हाय कोर्टानं बंदी आणली. यासंदर्भात वस्तुस्थिती लक्षात घेऊन परत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. त्याचा पाठपुरावा केला. त्याचं फळ आज आपल्याला दिसतंय, असं त्यांनी सांगितलं.

 

श्रेय लाटू नका...

बैलगाडा शर्यतबंदीला स्थगिती ही आमच्या खेड तालुका बैलगाडा चालक-मालक संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टनं दिली. तसा स्पष्ट उल्लेख कोर्टाच्या आदेशात आहे. आमचे काही विरोधक जाहिराती करून फुकटचं श्रेय लाटत असल्याचा आरोप खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलाय. आम्ही स्वत:च्या नावानं बैलगाडा संघटना अथवा विमा कंपन्या काढल्या नसल्याचा टोला त्यांनी हाणला. कोर्टाचा अंतिम निर्णय अजून बाकी आहे. काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्यानं नियमांचं तंतोतंत पालन करा, असंही आवाहन त्यांनी केलं.

 

Bailgada 5 2निमगावच्या घाटात  फळीफोड

खेड तालुका बैलगाडा चालक-मालक संघटनेनं निमगाव (खंडोबा) घाटात बैलगाडा शर्यतीची फळीफोड करून आपला आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळं बऱ्याच दिवसांनी शर्यतीचा आनंद लुटता आल्यानं पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येंनं उपस्थित होते.

 

जत्रांना येईल बहार...

जत्रा म्हटलं की कुस्त्यांचा आणि तमाशाचा फड तसंच बैलगाडा शर्यती आल्याच. मात्र न्यायालयानं शर्यतींवर बंदी घातल्यानं जत्रांमधील जानच गेली होती. आता बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानं जत्रांना बहार येईल बघा... अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.