टॉप न्यूज

जमिनी विकू नका, अस्तित्व विकू नका

मुश्ताक खान, खेड, रत्नागिरी
कोकणातल्या बहुमोल जमिनी फक्त पैसे मिळतात म्हणून बाहेरून येणाऱ्या कुणालाही विकू नका, कोकणी माणसा जागा हो, असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड इथं घेतलेल्या सभेत उपस्थित जनसमुदायाला केलं. प्रत्येकालाच 'येवा कोकण आपलाच आसा,' अशी हाक देऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्या जमिनी तुमच्या हातातून गेल्या तर तुमचं अस्तित्वच उरणार नाही, हे तुम्हाला कळत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. खेड शहरातल्या ऐतिहासिक गोळीबार मैदानात शुक्रवारी (ता.15) 25 हजार कार्यकर्त्यांच्या साक्षीनं ही जंगी सभा पार पडली.
 

 

Raj In Khed 1कोकणातल्या जमिनी विकण्यामध्ये आपलेच दलाल अग्रेसर आहेत आणि जमिनी विकणारेही आपलेच आहेत. त्यामुळं जमिनी विकणं बंद करा. जर एखाद्याला इथं पर्यटनाचा विकास करण्यासाठी जागा हवी असेल तरच विचार करा, असा सल्लाही राज यांनी दिला.

 

नोकरीत स्थानिकांना प्राधान्य

यावेळी कंपन्यांमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचे आकडे किती कमी आहेत हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्थानिकांना प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांनाच कोकणात यापुढं प्रवेश दिला जाईल, असाही त्यांनी इशारा दिला.  कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आणि रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाला. पण प्रकल्प कोणते आले? तर अणुऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा! पर्यटनासंदर्भात, फलोत्पादनाबाबतचे प्रकल्प कोकणात  आणायला इथल्या सरकारला, आमदार आणि खासदारांना समजत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मालवणमध्ये बेकायदा, जबरदस्तीनं आणि धाकदपटशाहीनं जमिनींचे व्यवहार झाले आहेत, पण लोक त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत. एका जोडप्याला दमदाटी करून समुद्रकिनारी असलेला त्यांचा बंगला विकायला लावून, पिटाळून लावण्यात आलं, ही गोष्ट जर खरी असेल तर नारायण राणेंना यासंदर्भात उत्तर द्यावं लागेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

 

Raj In Khed 5चांगल्या प्रकल्पांचं स्वागत

अणुऊर्जा चांगली की वाईट याबद्दल मी चर्चा करत नाही... पण जर तो प्रकल्प वाईट असेल तर त्याला खड्ड्यात घाला. पण जर कोणी राजकारण करत असेल तर चांगली गोष्ट धुडकावून लावू नका, असंही राज म्हणाले. लोकांमध्ये भीती घालून प्रकल्प घालवणाऱ्या राजकारण्यांनाही धुडकावून लावा. एनरॉन बुडवायची भाषा करणाऱ्यांनी त्याला तारलं कसं? अणुऊर्जेच्या बाबतीतही पुन्हा एकदा तोच प्रकार सुरू झाला आहे, हा मुद्दाही त्यांनी कोकणवासीयांच्या निदर्शनास आणून दिला. औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात देशात लॉबीज आहेत. हे लोक स्वत:च्या फायद्यासाठी तुमची डोकी झुंजवत आहेत,  असंही राज म्हणाले.


नक्कल करायलाही लागते अक्कल 

राज ठाकरे हे फक्त मनोरंजन करतात. नकला करून सामाजिक प्रश्न सुटत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी राज यांना लगावला होता... यावर नक्कल करायलाही अक्कल लागते, ते अजित पवारांना कधीच कळणार नाही, असं प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलं. फक्त पैसे मोजण्यातच ते दंग आहेत, असा आरोपही त्यांच्यावर केला. एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मग बघा राज्याचा कसा कायापालट करतो, असंही राज पुढं म्हणाले.

 

परप्रांतीयांना थारा देऊ नका

राज यांनी बांग्लादेशींचा मुद्दाही पुन्हा एकदा उपस्थित केला. भारताच्या चलनात येणाऱ्या नकली नोटा या बांग्लादेशींमुळंच येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणं खेडमध्ये राहणाऱ्या काही बांग्लादेशींना कोर्टानं शिक्षा सुनावली. इथं आया-बहिणी सुरक्षित नाहीत. याला जबाबदार हे येणारे लोंढे आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. हा प्रकार गंभीर आहे. कोकणी माणसानं सतर्क राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. 

इथं मी तुमच्याकडं मतं मागायला आलो नाही, तर तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे, असंही राज म्हणाले. परंतु मनसेचे इतर नेते मात्र 2014च्या निवडणुकीबद्दल भरभरून बोलले. येणाऱ्या काळात कोकणातले चार विद्यमान आमदार तरी आम्ही पाडू आणि किमान दोन तरी निवडून आणू, अशी ग्वाहीही त्यांनी देऊन टाकली.

 

Raj In Khed 8आमदार उपरकरांचा मनसे प्रवेश

राज ठाकरे कोकणात आले आणि कोणी पक्ष प्रवेश करणार नाही, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत जंगी प्रवेश केला. खेडचे वैभव खेडेकर यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.