टॉप न्यूज

हापूस यंदाही खाणार भाव!

मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना या फळांच्या राजाची चव काही आत्ताच चाखता येणार नाही. त्यासाठी नेहमीप्रमाणं गुढीपाडव्याची वाट पाहावी लागणार आहे. आता तुम्हाला एका पेटीला तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागतील. त्यातच गतवर्षीपेक्षा उत्पन्न सरासरी 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता उत्पादक व्यक्त करतायत. त्यामुळं नाही म्हणायला हापूस नेहमीपेक्षा यंदा जास्तच भाव खाऊन जाणार आहे बरं. 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' असं उगीच का म्हणतात? हापूसमुळं कोकणात भरभराट आली आहे, यात कुणालाच शंका नाही.
 

 

हापूस म्हणजे प्रेस्टिज

फळांचा राजा हापूसनं कोकणाला जगभरात ओळख मिळवून दिली. देवगड आणि रत्नागिरीच्या हापूसला जगभरात मागणी आहे. Rat Mango 1नव्या हंगामात कोणी पहिल्यांदा हापूस खल्ला हा प्रेस्टिजचा विषय बनतो आणि चावडीवर त्याची चर्चाही जोरदार होते. त्यामुळं कितीही महाग का असेना आंबा शौकिन मंडळी त्याची पर्वा करत नाहीत. खवय्ये ज्याप्रमाणं हापूस बाजारात कधी येतो याची वाट बघत असतात त्याचप्रमाणं आंबा बागायतदारांमध्ये कोण आंबा पहिल्यांदा पाठवणार, याची स्पर्धा असते. हर्णे इथल्या मयेकर बंधूंच्या बागेतला रत्नागिरी हापूस पहिल्यांदा मुंबईत दाखल होतोय. ही किमया त्यांनी तिसऱ्यांदा साध्य केली आहे.

 


बाळासारखी घेतात काळजी

समुद्र किनारी असलेल्या आंब्याच्या बागांना फळं चांगली लागतात. त्या ठिकाणचं वातावरण आंब्यांना पोषक असतं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे चवीलाही इथला आंबा चांगला लागतो. Rat Mango 16बागेची काळजी ही लहानग्या बाळासारखी घ्यावी लागते, असं फजल रखांगे सांगतात. ते गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहेत. आपल्या बागेत ते कटाक्षानं कल्टारचा वापर टाळतात. आंब्याचं पीक चांगलं यावं याकरता ते शेणाचा भरपूर वापर करतात. बागेत पडलेला पालापाचोळा हा सर्वात उत्तम खत आहे, असंही फजलभाई आवर्जून सांगतात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा आंबा हा मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल होतो. चव उत्तम असल्यामुळं त्यांच्या आंब्याला विशेष मागणीही असते.

 


असे राहतील दर

आता फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला फळांच्या राजाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला एका पेटीला ५ - ६ हजार रुपये मोजावे लागतील. मार्चमध्येही हा दर तसाच असतो. Rat Mango 7मार्च महिन्यातही आंब्याचा दर चढाच राहतो. २० एप्रिलनंतर मार्केटमध्ये हापूसची आवक वाढल्यानं त्याच्या दरात थोडीशी घसरण होते. ५००, १०००, २००० रुपये अशा टप्प्यानं ही किंमत कमी होत जाते. त्यामुळंच काही लोक मे उजाडेपर्यंत आपल्या मोहाला आवर घालतात. एका आंब्याच्या पेटीत 4 - 6 डझन आंबे बसतात. आंब्याचा आकार जर मोठा असेल तर चार डझन, मध्यम असेल तर पाच आणि त्यापेक्षा छोटी असतील तर सहा डझन भरतात. आंब्याचा आकार जास्त तेवढा दर जास्त. फेब्रुवारी-मार्चपर्यंत आंब्याची अॅडवान्स बुकिंगही झालेली असते.

 


काही बागायतदारांच्या मते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काढलेला आंबा हा चांगला नसतो, कारण त्याची नैसर्गिक वाढ झालेली नसते. पण फजलभाईंच्या मते आंबा तयार झाला असेल तर फेब्रुवारी महिन्यात काढायला काहीच हरकत नाही.

 

Rat Mango 15उत्पादन घटणार?

कोकणात सध्या एक लाख 47 हजार हेक्टर शेतीत हापूस आंब्याच्या बागा आहेत. कडाक्याची वाढलेली थंडी आणि पाहिजे त्या प्रमाणात मोहर न लागल्यानं हापूसचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटेल असा अंदाज आहे. कोकणात, यंदा थंडीचा कालावधी लांबला असून, त्याचा परिणाम मोहर धारणेवर झाला आहे. डिसेंबरमध्ये 10 टक्के, जानेवारीत 30 टक्केच मोहर झाडांना दिसून आला. सध्या कैरी तयार होण्याचा कालावधी असून, ग्लोबल वॉर्मिंग आणि रोग यामुळे कैर्‍यांची गळ होण्याचं प्रमाणही गतवर्षाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळं उत्पादन घटेल, असं बागायतदार सांगतायत.

 

 

Comments (1)

  • बरेच वर्षान फझल भाई ला बधून आनंद झाला .मी त्यांच्या चांगल्या आयुष्य साठी ईश्वरा कडे परार्थाना करतो.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.