टॉप न्यूज

महिलांना पारायणाचा हक्क का नाही?

ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
नेरूळ इथं सुरू झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातला. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्त्रियांना पारायण सांगताना मी कधी बघितलं नाही. भगिनींनाही पारायण सांगता यावं, यासाठी या संमेलनानं पुढाकार घ्यावा, असं कळीचं आवाहन पवार यांनी केलं. सोमवारपर्यंत चालणारं हे संमेलन पवारांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार, याविषयी सर्वत्रच उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालंय. याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संतांनी दुष्काळ निवारणासाठी लोकांना आवाहन करावं, असंही पवार म्हणाले. संत साहित्याचा संस्कार लहानपणापासून व्हावा, याकरता वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्नशील राहण्याची ग्वाही संमेलनाध्यक्ष डॉ. अभय टिळक यांनी यावेळी दिली.
 


vlcsnap-2013-02-16-22h14m50s217.pngवारकरी साहित्य परिषदेतर्फे नेरूळ इथल्या रामलीला मैदानावर दुसरं अ. भा. मराठी संत साहित्य संमेलन सुरू झालंय. त्याचं उद्घाटन आज सकाळी (शनिवार) पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात पवार बोलत होते. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष आणि ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.


स्त्रीशक्तीचा जागर

भेदभाव नष्ट करून समतेची पताका समाजातील शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम वारकरी संप्रदायानं केल्याचे गौरवोद्गार सुरुवातीलाच काढून पवार यांनी स्त्री समानतेच्या प्रश्नाकडं लक्ष वेधलं. ५० टक्के स्त्रियांना बाजूला ठेवून समाजाचा विकास साधता येईल का? स्त्री आज समाजातील सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. मात्र, अजूनही भगिनींनी पारायण सांगितल्याचं बघायला मिळालं नाही. तुकोबांचा समानतेचा विचार समाजापुढं आणण्याचा बहिणाबाईंनी प्रयत्न केला. परंतु त्या काळी समाजात प्राबल्य असणाऱ्या विशिष्ठ वर्गाकडून तिला मोठा विरोध झाला. आजही पारायण सांगण्याचा अधिकार स्त्रियांना नाही. हे चित्र बदलण्यासाठी वारकरी संप्रदायानं पुढाकार घ्यावा, असंही पवार म्हणाले.


मानवतेला विरोध का?

महाराष्ट्राला संतांची आणि संत साहित्याची मोठी परंपरा आहे. त्यामुळंच समतेचा प्रसार झाला. मानवतावादी विचार रुजण्यास मदत झाली. समाजात सत्त्वगुणांचा प्रसार झाला. आजही समाजाला मानवता हाच धर्म या विचाराची गरज आहे. मानवतावादाचा विचार युगानुयुगे चालूनही त्याविरुद्ध समाजातील विशिष्ठ वर्गातून अन्यायाची भूमिका का घेतली जाते, हे समजत नाही. समाजातील सर्व घटकांना आम्ही न्यायाची वागणूक देतो का, याचाही विचार सर्वांनी करावा, असंही आवाहन पवार यांनी केलं.

vlcsnap-2013-02-16-22h16m49s222.png

 

दुष्काळाचाही जागर
राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाच्या तीव्र झळा बसतायत. त्यामुळं त्याचा उल्लेख संमेलनात होणं साहजिकचं होतं. दुष्काळग्रस्तांसाठी संत मंडळींनी पुढाकार घ्यावा. सुकाळ असलेल्या भागातील लोकांनी दुष्काळग्रस्तांची जाणीव ठेवून पाण्याचा काटकसरीनं वापर करावा. तसंच दुष्काळग्रस्तांना चारा, पाण्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची सढळ हस्ते मदत करावी, असंही आवाहन शरद पवार यांनी केलं.

 

वारकऱ्यांची साहित्य दिंडी
सकाळी विठू नामाच्या गजरात साहित्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झालं. संमेलनाच्या उद्घाटनानंतर संत साहित्यासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या ह.भ.प. तात्यासाहेब डिंगरे यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात 'संत साहित्य आणि शेती' या विषयावर, तर सायंकाळी 'संत साहित्य व उद्योग–व्यवसाय' या विषयावर चर्चासत्र पार पडलं. त्यानंतर सामुदायिक हरिपाठ,
ह.भ.प. धोंडोपंत महाराज शिरवळकर, पंढरपूर यांच कीर्तन आणि रात्री ह.भ.प. लक्ष्मण महाराज राजगुरू, पुणे यांचं भारूड झालं.

संमेलनाच्या तीन दिवसात जवळपास १५ लाख नागरिक हजेरी लावतील असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.