टॉप न्यूज

संत साहित्य सर्वत्र पोहोचवा

सुखदा खांडगे, नवी मुंबई
तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, असा मानव धर्माचा संदेश संत साहित्यानंच समाजात झिरपवला आहे.  समतेचे हे विचार सर्वत्र रुजवण्यासाठी संत साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं भरलेल्या संत साहित्य संमेलनात व्यक्त झाली. संमेलनात पार पडलेल्या संत साहित्यावरील विविध चर्चासत्रांमध्ये अभ्यासकांनी संतांनी सांगितलेले मानवतेचे विचार जागवले. संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
 

  

vlcsnap-2013-02-17-20h34m45s8संत साहित्याचा हातभार

‘संत साहित्य आणि कायदा’ या चर्चासत्राचे अध्यक्ष असलेले ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात संत साहित्य मोलाचा सहभाग देतं, असं आग्रहानं सांगितलं. संत साहित्य मानवी धर्माची मूल्यं रुजवण्यासाठी हातभार लावतं. दुसऱ्यांना त्रास न देता आपलं जीवन जगावं, याचा वस्तुपाठ घालून देतं. थोडक्यात, तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, हा संदेश माणसांमध्ये झिरपवण्याचं काम ते करत असत. साहजिकच मानवी वर्तन संतुलित बनवण्यासाठी संत साहित्याचा मोठा हातभार लागतो. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला आपोआप हातभार लागतो. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये कालानुरूप सुधारणा कराव्या लागल्या तरी चिरंतन मानवी मूल्यांचं दर्शन घडवणारं संत साहित्य हे अबाधित आहे. त्याचा व्यापक प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचा निश्चितच समाजाला फायदा होईल, असंही चकोर महाराजांनी सांगितलं.

 

विविध स्तरावर प्रयत्नांची गरज

या चर्चासत्रमध्ये अनेक दिग्गज विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव शेखर गैक्वाद, पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख, पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांनीही अशाच पद्धतीचे विचार मांडून संत साहित्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवली.

 

vlcsnap-2013-02-17-20h34m55s109बोलीभाषेचा आवर्जून वापर

संत साहित्यावर खूप लोक अभ्यास करतात, पदव्या मिळवतात, पण ते अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचत नाही. शिकलेल्या लोकांनी हे साहित्य अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवावं, असं विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी ‘संत साहित्य आणि पाठ्यक्रम’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना सांगितलं. संत साहित्यात बोलीभाषा आवर्जून वापरली आहे. त्यामुळं हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं जातं, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं. या चर्चासत्रामध्ये आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव मोहिते, महसूल विभागाचे उपसचिव ह.भ.प. माणिक गुट्टे, रंगनाथ नाईकवाडे, यांनीही विचार मांडले. सध्याच्या पाठ्यक्रमात संत साहित्याला म्हणावं तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. पाठ्यक्रमात संत साहित्याचा जास्तीत जास्त समावेश झाल्यास बालपणीच चांगले संस्कार रुजण्यास मदत होईल. त्यातूनच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, याकडं सर्वच वक्त्यांनी लक्ष वेधलं.

 

...तर बाबासाहेबांचं धर्मांतर टळलं असतं

संत साहित्य हे राज्यातील साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. परंतु यामधील विचार योग्य प्रकारे मांडले नाहीत. संतांचे विचार नीटपणं समाजासमोर ठेवले असते तर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतर करावं लागलं नसतं, असं मत मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं.

 

काल शनिवारी संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक यांना मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांनी वीणा देऊन संमेलनाची सूत्रं प्रदान केली. या वेळी मोरे यांनी संत साहित्याचं महत्त्व विशद केलं. काळानुरूप संत साहित्यामधील संदर्भ समजावून सांगितले पाहिजेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम या साहित्यानं केलं आहे. पण यामधील विचार नीट सांगितले गेले नाहीत. हे विचार १९३0 च्या दरम्यान नीट सांगितले असते तर कदाचित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतर करावं लागलं नसतं, असं मोरे यांनी सांगितलं.

 

संमेलनाध्यक्षांचा विश्वास सार्थ ठरला
सर्वसमावेशकता हाच संतदृष्टीचा स्थायीभाव असून करुणा हा संतविचारांचा आत्मा आहे. दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, पाणीवाटपातील विषमता दूर व्हावी, खुल्या अर्थकारणाचा प्रत्येक घटकास समान लाभ व्हावा, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली होती.

संतविचार आपल्या जीवनाला अनेक अंगांनी भिडला आहे. म्हणूनच या संमेलनामध्ये शेती, उद्योगव्यवसाय, कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण तसंच अभ्यासक्रम यासारख्या व्यवहारातील नानाविध क्षेत्रांशी संतविचारांचा सांधा कसा जुळला आहे याविषयी ऊहापोह व्हावा, यासाठी या संमेलनात या विषयावर आधारित चर्चासत्रं ठेवल्याचं  अभय टिळक यांनी नमूद केलं. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.