टॉप न्यूज

दुष्काळात पावसाची अवकळा

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमसतोय. यामुळं सुमारे 19 जिल्ह्यांतील पिकांची अपरिमित हानी झालीय. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिले असले तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता किती आणि कधी भरपाई मिळणार, हे काही सांगता येत नाही. त्यामुळं सध्या तरी शेतकरी पुरता हताश झालाय.
 

 

१९ जिल्ह्यांना तडाखा

अवकाळी पावसामुळं जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, परभणी, हिंगोली, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील शेतीचं मोठं नुकसान झालंय. गारांचा खच द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबीच्या बागांवर पडल्यानं झाडांनी माना टाकल्यात. Jalgaon Drought 6 newविदर्भात संत्री, मोसंबी, कापूस; नाशकात कांदा, द्राक्ष, डाळिंब; खान्देशात केळी, पपई, रब्बी मका यासह पश्चिम महाराष्ट्रात मिरची, गहू, ज्वारी, हरभरा, पपई, तूर, काकडी, वांगी, कोबी, टोमॅटो पिकांना प्रचंड फटका बसलाय. नागवेली आणि पानमळे उद्ध्वस्त झालेत. ढगाळ वातावरणामुळं आंब्याचा मोहोरही मोठ्या प्रमाणात गळून गेलाय. अनेक घरांची पत्र्याची, कौलांची छप्पर वादळी वाऱ्यानं नेस्तनाबूत केल्यानं हजारो लोकांपुढं निवाऱ्याचाही प्रश्न उभा राहिलाय.

 

 

पंचनामे करण्याचे आदेश

अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागाला दिल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यावर मदत देण्याचा निर्णय तातडीनं घेण्यात येईल, अशी माहिती दिलीय.

 

 

Jalgaon Drought 3खान्देशातील पिकं जमीनदोस्त

उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा वादळासह जोरदार पावसानं झोडपल्यामुळं परिसरातील केळी, गहू, हरभरा आदी काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. उभी पिकं जमीनदोस्त झाल्यानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. जिल्ह्याच्या उत्तरेकडील केळी उत्पादक तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका बसलाय. याशिवाय रावेर, यावल, सावदा, फैजपूरसह अनेक ठिकाणच्या मका, गहू, हरभरा या पिकांचं अतोनात नुकसान झालंय.

केळीचा पट्टाच उद्ध्वस्त
केळींचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर-सावदा परिसरात गुरुवारी संध्याकाळी अवकाळी वादळी पाऊस झाला. जोरदार गारपीटही झाली. त्यामुळं केळीचा पट्टाच उद्ध्वस्त झाला. केळीचं झाड एरवी हिरवंगार आणि मोठ्या पानांनी डवरलेलं असतं, पण केळीच्या झाडाची सर्व पानं झडून आणि फाटून बागेतच गळून पडली आहेत. केळीची फक्‍त खोडं उभी असून ती निष्पर्ण झाली आहेत. हीच स्थिती मका, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची आहे. कापणीला आलेल्या केळीच्या घडांवर गारांचा तडाखा बसून त्यावर काळे डाग पडले आहेत.

 

 

हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - खडसे

डोळ्यादेखत केळीबाग हातून गेल्याचं पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी चूल पेटली नाही, तर चिनावल इथं लग्नाच्या दोन जेवणावळी रद्द करण्यात आल्या. दरम्यान, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, खासदार हरिभाऊ जावळे, आमदार शिरीष चौधरी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. केळीला हेक्‍टरी 50 हजाराची, तसंच गहू आणि इतर पिकांसाठी हेक्‍टरी दहा हजाराची मदत शासनानं द्यावी, अशी मागणी खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

 Jalgaon Drought 1

 

गारपिटीचा पीक विम्यात समावेश हवा

केंद्र आणि राज्य शासनानं सुरू केलेल्या केळी पीक विम्यात तपमान आणि वाऱ्याचा वेग हे निकष लावून भरपाई मिळणार आहे. मात्र त्यात गारपिटीचा समावेश नाही. लोकप्रतिनिधींनी शासनाकडं आणि विमा कंपनीकडं पाठपुरावा करून गारपीट, वादळ, पूर, अतिवृष्टी यांचाही समावेश पीक विमा योजनेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी केली आहे.

  

 

Jalgaon Drought 2Jalgaon Drought 7Jalgaon Drought 4

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.