पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संपादित केलेल्या महानामा या पुस्तकावर आयोजित चर्चेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सचिन परब यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, अविनाश दुधे, प्रा. अशोक राणा, अविनाश राणा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आम्ही सारे फाऊंडेशन आणि 'महानामा'चे प्रकाशक मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी संयुक्तपणं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
संतांच्या कार्यामुळंच आज आपण माणूस म्हणून उभे आहोत. जात, धर्म, पंथ याच्यापलीकडचा माणुसकीचा धर्म संतांनी शिकवला. त्यामध्ये नामदेवांचं स्थान हे अग्रगण्य आहे. संत नामदेवाचा थेट प्रभाव संपूर्ण देशात जाणवतो. आपल्याला भक्ती करणं नामदेवानी शिकवल्याचं संत कबीर कबूल करतात. हे थोरपण संत नामदेवांचं आहे, असं सांगत अमर हबीब यांनी वारकरी संप्रदायाचा आणि पुस्तकाचा आढावा घेतला.
माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाल्यानं माझ्या कानी लहानपणापासून ऐकलेल्या संतांच्या गोष्टी कधी पडल्या नाहीत. मी शेतकरी चळवळीत सहभागी झालो त्यावेळी अनेक वारकऱ्यांशी माझा संबंध आला. वारकरी कसे माणुसकीनं वागतात हे तेव्हा लक्षात आलं. मी मुसलमान असल्यानं परकेपणाचा अनुभव अनेकदा आला. एकदा 'अभिनव भारत'च्या कामानिमित्त पंढरपूरला जाण्याचा योग आला. लाखो वारकरी ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात त्याच्या मंदिरात जाण्यास मीही उत्सुक होतो. पण मुसलमान असल्यानं मला भीतीही वाटली. मात्र मी छान मराठी बोलत असल्यानं मला मी कोण म्हणून काही ओळखणार नाही, हा विश्वास होता. विठ्ठलाच्या मंदिरात मी प्रवेश केला तेव्हा मंदिराचं अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम पाहून थक्क झालो. ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा अशा संतांनी ज्या दगडी पायांना स्पर्श केला त्या पायऱ्यांवर उभं राहून मला संतांच्या पदस्पर्शाचा अनुभव आला. ती अनुभूतीच वेगळी होती. खरंच लोक इथं उगीच येत नाहीत, हे त्या दिवशी कळलं, असंही हबीब यांनी सांगितलं.
वारकरी संप्रदाय सामाजिक सलोखा निर्माण करणारा आहे. संत परंपरा ही दस्ताऐवजीकरणातून पुढे आली नाही, तर ती एक चळवळ आहे. ती नदीच्या प्रवाहासारखी आहे, हे ठळकपणं मांडण्याचं काम महानामा पुस्तक करतं. आता निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळं जाती-धर्माचा उन्माद वाढणार आहे. परंतु संत शिरोमणी नामदेवाच्या कार्याचा आढावा घेणारं महानामा पुस्तक जे वाचतील त्यांचं टाळकं ठिकाणावर राहील, असंही हबीब यांनी सांगितलं.
आज शब्दांना अवकळा आलीय. परंतु सातशे-आठशे वर्षांनंतरही संतांचे शब्द जिवंत आहेत, हे आश्चर्य आहे. संतांचे शब्द आजच्या परिस्थितीतही कसे परिणामकारक आहेत, हे महानामा पुस्तकामुळं ठळकपणं समाजासमोर येतं. त्यामुळं प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं, असं चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितलं.
सचिन परब यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केलं. सामाजिक सलोखा राखण्यात संत साहित्यानं मोलाची भूमिका बजावलीय. संत नामदेवांची महती नव्या दृष्टिकोनातून मांडणारे महानामा हे पुस्तक समाजातील तळागाळातील वर्गापर्यंत पोहोचावं, यासाठी या चर्चासत्राचं आयोजन केल्याचं पाटकर यांनी सांगितलं.
Comments
- No comments found