टॉप न्यूज

मराठी मुलखात शड्डू घुमणारच!!

रणधीर कांबळे, सांगली
कुस्ती ही तर रांगड्या मराठी मातीची शान! परंतु, ऑलिम्पिकमधून कुस्तीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानं अवघ्या मराठी मुलखातून संताप व्यक्त होतोय. आपला म्हणून कुस्ती एकमेव खेळ होता, जो ऑलिम्पिकमध्ये दिसत होता. भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिकचं पदक कृष्णाकाठच्या खाशाबा जाधवांनी कुस्तीतच मिळवून दिलं. त्यामुळंच ऑलिम्पिकमधून कुस्तीचं हद्दपार होणं मराठी मनाला डाचायला लागलंय. पण मराठी मातीतून कुस्ती काही हद्दपार होणार नाही. इथं आजही तांबड्या मातीला उसासे फुटतायत. सांगलीत नुकत्याच झालेल्या एका शानदार फडानं हेच तर शिक्कामोर्तब केलं.
 

सांगलीच्या फडात गोल्डनसिंगच भारी

सांगलीत अंबाबाई तालीम संस्था, मिरजच्या वतीनं दरवर्षीप्रमाणं हा कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला होता. फडाचं आकर्षण असणारी मुख्य कुस्ती पंजाबच्या गोल्डनसिंगनं कोल्हापूरच्या बाला रफिकला चीत करून जिंकली. गोल्डनसिंग हा मूळचा पंजाबचा जरी असला तरी तो संभाजी पवार यांच्या तालमीतला पैलवान आहे. त्यानं गेल्या दोन वर्षात सतत जिंकत आलेल्या बाला रफिक या कोल्हापूरच्या पैलवानास धूळ चारली. राज्यभरातून अनेक वयोगटातील पैलवानही फडात उतरले होते.

 

kustiअंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, पहिलेवहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर यांच्या उपस्थितीमुळं फडाला वेगळाच रुबाब आला होता. तांबड्या मातीत घुमणाऱ्या शड्डूंमुळं त्यांचा ऊर पहिल्यासारखाच अभिमानानं दाटून येत होता. पण त्याच वेळी ऑलिम्पिकमधून कुस्तीला बाहेर काढण्याची सलही मनात होतीच. तरीही पहिल्यासारखंच तेवढ्याच उत्साहानं ते मल्लांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत होते. बाकी काही असलं तरी मराठी मुलखातील तांबड्या मातीत कुस्ती टिकून राहील, असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणं दिसत होता.

 

श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर यांनी या कृतीचा निषेध करून ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कुस्तीचा समावेश कसा होईल, यासाठी भारत सरकार आणि खेळांमध्ये मिरवणाऱ्या पुढाऱ्यांनी नेटानं प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केली. अहो, हा आपल्या मातीतला खेळ. त्याविषयी आपण आस्था बाळगायची नाही तर कुणी? अमेरिका, इंग्लंड काय त्यासाठी प्रयत्न करणार आहे का, असा रांगडा सवालही त्यांनी केला.
 

अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं गरीब घरातल्या छोट्या पैलवानांना दत्तक घेतलंय. त्यातून पैलवानकीसाठीच्या खुराकपाण्यापासून इतर सर्व गोष्टींचा खर्च संस्था करते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी दिली. ऑलिम्पिकमध्ये कालांतरानं परत समावेश होईलही, पण आमच्यासारख्या अनेक लहानमोठ्या संस्थांमार्फत जे काम केलं जातंय, त्यातूनच बाकी काही झालं तरी तांबड्या मातीतून कुस्ती काही हद्दपार होणार नाही, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

  

ऑलिम्पिकची कार्यपद्धती
येत्या मे महिन्यात रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथं कुस्तीसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, रोलर स्पोर्ट्स, स्पोर्ट क्लाइंबिंग, स्क्वॉश, वेकबोर्डिग आणि वुशू या खेळांच्या संघटनांना आयओसीच्या कार्यकारी मंडळासमोर सादरीकरण करावयाचं आहे. या सादरीकरणावर विचार करून, कार्यकारी मंडळ आपल्या शिफारशी आयओसीच्या १२५व्या सभेसमोर सप्टेंबरमध्ये मांडेल, त्यावेळीच अंतिम निर्णय होईल. मात्र परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. बेसबॉल, स्क्वॉश, कराटे या खेळांना विशिष्ट खंडांमध्ये लोकप्रियता आहे. पण कुस्तीची लोकप्रियता अधिक वैश्विक आहे. ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयाचा धक्का भारत, अमेरिका, जपान, रशिया, इराण अशा विविध देशांमध्ये कुस्ती संघटना आणि कुस्ती रसिकांना बसला आहे.

 

KUSTIऑलिम्पिकमध्ये१८९६ पासून कुस्ती
१८९६मध्ये अथेन्सला झालेल्या पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीचा समावेश होता. फ्रीस्टाइल आणि ग्रीको-रोमन अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो. भारत आणि महाराष्ट्राला तर कुस्तीचा फार वेगळा आणि अभिमानी संदर्भ आहे. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक कोल्हापूरचे खाशाबा जाधव यांनी कुस्ती याच खेळात १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिलं होतं. आतापर्यंत या खेळात भारताला चार वैयक्तिक पदकं मिळालेली आहेत. खाशाबांच्या पराक्रमानंतर सुशील कुमार (बीजिंग २००८, लंडन २०१२) आणि योगेश्वर दत्त (लंडन २०१२) यांच्या कामगिरीमुळं या खेळाकडं आता हमखास ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा खेळ म्हणून पाहिलं जाऊ लागलंय.

 

कुस्तीचा देदिप्यमान इतिहास
देशातील पहिले हिंदकेसरी ठरले ते म्हणजे श्रीपती खंचनाळे. त्यानंतर तब्बल सात मल्लांनी हिंदकेसरीची गदा मिळवून महाराष्ट्राचं नाव देशभर केलं. हिंदकेसरी खंचनाळे, गणपतराव आंदळकर, हे आजही नवोदित मल्लांना मल्लविद्येचे धडे देताहेत. हिंदकेसरी मारुती माने, हजरत पटेल, चंबा मुत्नाळ हे आज हयात नसले, तरी त्यांच्या नावाचा दबदबा त्यांच्या कुस्तीतील योगदानामुळं कायम आहे. अलीकडेच हिंदकेसरीची गदा पटकावणारे विनोद चौगुले, योगेश दोडके यांच्या खांद्यावर नव्या पिढीला मल्लविद्येकडं वळवण्याची जबाबदारी आली आहे.

 

हे आहेत मराठी मातीतील हिंदकेसरी
* श्रीपती खंचनाळे (1959, दिल्ली)
* गणपत आंदळकर (1961, मुंबई)
* मारुती माने (1964, कर्नाळ, पंजाब)
* हजरत पटेल (1966, अहमदाबाद, गुजरात)
* दीनानाथ सिंह (1971, नागपूर, महाराष्ट्र)
* चंबा मुत्नाळ (1975, बंगळूरु, कर्नाटक)
* विनोद चौगुले (2003, नाशिक, महाराष्ट्र)
* योगेश दोडके (2005, नगर, महाराष्ट्र)

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.