टॉप न्यूज

दुष्काळी अनुदानात हवेत बदल

ब्युरो रिपोर्ट, सातारा
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे.  केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केद्र सरकारनं दुष्काळासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या निकषात बदल करावेत, अशी मागणीही आपण करणार आहोत. याशिवाय कर्नाटक सरकारबरोबर पाण्याची देवघेव करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 

राज्यात 1850 टँकर

दुष्काळी भागाचे दौरे सुरू असून, दररोज टॅंकर, चारा आणि जनावरांची आकडेवारी घेतली जात आहे. सध्या राज्यात 1850 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. मागणी होईल तिथं चारा डेपोही दिले जात असल्याचं मख्यमंत्र्यांनी सांगितलं. छावणीतील जनावरांना केंद्राकडून मिळणारं अनुदान फारच कमी आहे. तसंच ते फक्त तीन महिन्यांसाठीच दिलं जातं. दुष्काळाची तीव्रता आणि मदत करावा लागणारा कालावधी विचारात घेता केंद्र सरकार अनुदानाच्या निकषात बदल करण्याची गरज आहे. याबाबत आपण स्वत: केंद्रातल्या संबंधितांशी भेट घेऊन तशी मागणी करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 प्रसंगी चारापाणी कर्नाटकातून आणणार

pruthviraj chavhan image 1

राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. नुकसानाची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय समिती राज्याचा दौरा करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी तसंच चारा याला आम्ही प्राधान्य दिलं आहे. त्यातून पाणी शिल्लक राहिलं तरच ते केवळ उद्योगांना दिलं जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी कर्नाटकातून पाणी मिळावं आणि कर्नाटकातील काही भागांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाणी मिळावं, अशी मागणी दोन्ही राज्यांच्या सरकारकडून होत आहे. यासंदर्भात नुकतीच बेंगळूरु इथं दोन्ही राज्यांच्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. यामध्ये पाणी देण्याबाबत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक चर्चा झाली आहे. दुष्काळी जनतेला पाणी आणि जनावरांना चारा देण्यासाठी प्रसंगी कर्नाटकातून पाणी आणि चारा आणला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

उसासाठी ठिबकचा वापर, अनुदान वाढवणार

उसाला सिंचनासाठी लागणाऱ्या जादा पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी आगामी काळात ठिबकचा वापर वाढवण्याची सूचना साखर कारखान्यांना केली आहे. यासंदर्भात साखर संघाच्या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत. येत्या तीन वर्षांत सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पिकाला ठिबक सिंचनाद्वारेच पाणी दिलं जाईल. सध्या ठिबकसाठी असलेल्या 50 टक्के अनुदानात लवकरच वाढ केली जाणार आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.