टॉप न्यूज

बा विठ्ठला, दुष्काळ हटू दे

यशवंत यादव, सोलापूर
आज माघी एकादशी. चंद्रभागेकाठी भाविकांची दाटी झालीय. माघी वारीनिमित्त राज्यभरातून तसंच कर्नाटक, आंध्र प्रदेशातून जवळजवळ अडीच लाख भाविक पंढरीत दाखल झालेत. प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, चंद्रभागेचं वाळवंट भाविकांनी फुलून गेलंय. जिकडं पाहावं तिकडं भाविकांची गर्दी दिसतेय. विठ्ठलाची पददर्शन रांग गोपाळपूरपर्यंत गेलीय. पददर्शनासाठी 8-10 तास लागत आहेत. श्रीविठ्ठलाच्या पददर्शन रांगेत एक लाखाहून अधिक भाविक उभे आहेत. विठोबाच्या चरणी माथा टेकताना बा...विठ्ठला दुष्काळाचा वेताळ हटू दे, अशीच मागणी वारकरी करतायत.
 


Vithobaचंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीरस

चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीत यात्रा भरते. अलीकडच्या काही वर्षात माघी यात्रेलाही वारकऱ्यांची गर्दी वाढताना दिसतेय. यंदा दुष्काळ असला तरी वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं आलेत. माघी वारीसाठी राज्यातून आणि परराज्यातून अनेक दिंड्या, तसंच पालख्या पंढरीत आल्या आहेत. या दिंडी चंद्रभागा वाळवंट परिसरात विसावल्या आहेत. चंद्रभागेचं वाळंवट भक्तरसात न्हाहून निघालंय. `माऊली, ज्ञानदेव, तुकाराम, पुंडलिक वरदे हरि विठ्ठला`चा गजर होतोय.

 

भाविकांची चांगली सोय
दर्शन रांगेत 15 ते 18 हजारांपर्यंत भाविक होते. एका मिनिटाला 45 ते 48 भाविकांचं दर्शन होत असल्याचं मंदिर समितीचे व्यवस्थापक एस. एस. विभुते यांनी सांगितलंय. दर्शन रांगेतील घुसखोरी आणि वेग वाढवण्यासाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याशिवाय मंदिर समितीनं प्रकाश, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेवर अधिक भर दिल्यानं भाविकांची चांगली सोय झालीय.

 PANDURANG2

`बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल!
करावा विठ्ठल जीवभाव!`
अशी भाविकांची ओढ आहे. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं आणि रेल्वेनं जादा गाड्या सोडल्यात. तसंच खाजगी वाहनानं भाविक मोठ्या संख्येनं आलेत. पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, तात्पुरती शौचालयं, वीज आदींची सोय करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी 700 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेसाठी 800 पोलिसांची फौज तैनात केलीय.

 

दुष्काळाचा परिणाम वारीवर
यंदाच्या दुष्काळाचा परिणाम या वारीवर दिसून येतोय. बाजारातील उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होतोय. माघ शुध्द पंचमीला वसंत ऋतू सुरू झालेला असतो. थंडीचा कडाका कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. शेतातील पिकं काढलेली असतात. यामुळं या वारीला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आला आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळत आहे. आज माघी एकादशीचं औचित्य साधून श्रीविठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ 325 भाविक घेणार आहेत.

 

Pandharpur

 ही धावती यात्रा असल्यानं परंपरेप्रमाणं दर्शन करून भाविक मिळेल त्या वाहनानं मागं परतणार आहेत. तर वारकरी मात्र मंदिरातील औसेकर महाराजांचं चक्रीभजन आणि गोपाळकाला साजरी करून माघीची सांगता करूनच परतीच्या मार्गाला लागणार आहेत.

 

रिंगण सोहळ्यानं भाविक धन्य
अखिल भारतीय वारकरी मंडळ, माघी वारी पालखी सोहळा, सोलापूरच्या वतीनं जनार्दन मठाच्या परिसरात बुधवारी सकाळी नऊ वाजता गोल रिंगण पार पडलं. या रिंगणामध्ये ‘माऊली, ज्ञानदेव, तुकाराम, पुंडलिका वरदे हरि विठ्ठला’चा गजर करीत भाविक सहभागी झाले होते. या सोहळ्यानं रिंगण पाहणारे वारकरी धन्य झाले.

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.