टॉप न्यूज

हैदराबाद हादरलं बॉम्बस्फोटांनी

ब्युरो रिपोर्ट, हैदराबाद
हैदराबादच्या दिलसुखनगर इथं गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 14 झालीय. तर जखमींची संख्याही 119वर गेल्याचं समजतंय.  गुरुवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हैदराबाद शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं. सायंकाळी सातच्या सुमारास एकापाठोपाठ असे दोन स्फोट झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागं ' इंडियन मुजाहिदीन 'चा हात असल्याचा संशय आहे.  तसंच बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

hydrabad blast image

 

स्फोटांबाबत गृहमंत्री आज संसदेत बोलणार

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हैदराबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र ते तिथं काहीच बोलले नाहीत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. त्यामुळं ते आज बॉम्बस्फोट आणि त्याच्या तपासाबद्दलची माहिती संसदेत देणार आहेत. तर या बॉम्बस्फोटामुळं संपूर्ण देश हादरला असून राजधानी दिल्लीसह देशभरातील मोठ्या शहरांमधील सुरक्षा वाढवण्यात आलीय. मुंबईसह राज्यातही हायअॅलर्ट लागू करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय.

 

पंतप्रधानांकडून बॉम्बस्फोटाचा तीव्र निषेध

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून या बॉम्बस्फोटामागं हात असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. देशवासीयांनी शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.

 

 

दोन दिवसांपूर्वीच दिली होती कल्पना

आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफझल गुरू आणि मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्यांना अलीकडंच फाशी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे शक्तिशाली बॉम्बस्फोट झालेत, याकडं लक्ष वेधताना यामागं इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतायत. राष्ट्रीय तपास पथकाची (एनआयए) टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्राथमिक चौकशीनंतरच सर्व गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. गुप्तचर संस्थांकडून दोन दिवसांपूर्वीच तशी शक्यता वर्तवून आंध्र प्रदेश सरकारला सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला होता, असंही शिंदे यांनी सांगितलंय.

 


गजबजलेली ठिकाणं लक्ष्य

हैदराबादच्या कोणार्क आणि व्यंकटाद्री चित्रपटगृहासह दिलसुखनगर बस स्टॅण्ड, या गजबजलेल्या परिसरात हे स्फोट झालेत. बस स्टँड, चित्रपटगृह आणि उपाहारगृहाजवळ हे स्फोट झाले. सुरुवातीला हे स्फोट गॅस सिलेंडरचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात होता. पण दहशतवादी हल्ला असल्याचं आता स्पष्ट झालंय. रस्त्याकडेला ठेवलेल्या सायकलींमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. ज्या परिसरात हे स्फोट झाले तिथेच पाच वर्षापूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. दिलसुखनगर भागाची नाकाबंदी करण्यात आली असून हा परिसर रिकामा करण्यात येत आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, 2007 मध्ये याच दिलसुखनगरात शक्तिशाली स्फोट घडवण्यात आले होते, ज्यामध्ये 40 लोक मृत्यू पावले होते. 2003 मध्येही एका स्कूटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

 


मुख्यमंत्री घटनास्थळी

दिलसुखनगर भागात पोलिसांनी नाकाबंदी केलीय. हैदराबादचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी एनएसजी कमांडोंसह घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.चेन्नईला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये उद्यापासून (शुक्रवारी) कसोटी सामना सुरू होणार होता. तो आता या बॉम्बस्फोटामुळं रद्द करण्यात आलाय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.