टॉप न्यूज

'भार' भारनियमनाचा!

ब्युरो रिपोर्ट, मुंबर्इ/सातारा/परळी
डिसेंबरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या घोषणा हवेतच विरल्यात. याउलट दाभोळ ऊर्जा प्रकल्प आणि परळीचा औष्णिक वीज प्रकल्प ठप्प झाल्यानं राज्यात सध्या तीन हजार मेगावॅट एवढ्या विजेचा तुटवडा आहे. मार्चपर्यंत भारनियमन न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. परंतु, ग्रामीण भागातील बत्ती आतापासून गुल व्हायला लागलीय. उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यावर मागणी आणि तूट वाढत गेल्यास भारनियमन अटळ होणार आहे. वीज हवी असेल तर जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवा, असं सरकारच सांगू लागलं तर आम्ही पाहायचं तरी कुणाच्या तोंडाकडं, असा सवाल दुष्काळग्रस्त जनता विचारतेय.
 

दाभोळ, परळी प्रकल्प बंद – मुख्यमंत्री चव्हाण
कोकणच्या किनारपट्टीवर असलेला १९६७ मेगावॅट क्षमतेचा दाभोळ ऊर्जा प्रकल्प आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परळी इथं असलेला ११३० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प अनुक्रमे गॅस आणि पाण्याअभावी पूर्णपणं बंद पडले आहेत. मात्र, उत्पादनात मोठी घट होऊ नये यासाठी परळी येथील कोळसा विदर्भातील कोराडी किंवा अन्य प्रकल्पांच्या ठिकाणी नेला जाईल. रिलायन्स आणि ओएनजीसी यांच्याकडून दाभोळ प्रकल्पाला पुरेसा गॅसपुरवठा होत नसल्यामुळं हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही, अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

 

शेती वगळता पुरेसा पुरवठा - अजित पवारParali Veej 2
उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सातारा दौऱ्यातही याची कबुली दिली. इन्फा सिंगल फेज योजनेंतर्गत ऊरूल (ता. पाटण) इथं दीड कोटी रुपये खर्चाचं वीज उपक्रेंद सुरू करण्यात आलंय. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भारनियमनाच्या प्रश्नाला हात घातला. गॅसअभावी दाभोळ पॉवर प्लॅण्टवर परिणाम झालाय. तर पाण्याअभावी परळीचा वीजनिर्मिती प्रकल्प ठप्प झालाय. त्यामुळं 2800 मेगावॅट विजेचा तुटवडा असल्याचं, त्यांनी पाटण इथं बोलताना सांगितलंय. मात्र, शेतीपंपासाठी दिली जाणारी वीज वगळता घरगुती, तसंच उद्योगांसाठी पुरेशी वीज दिली जात असून भारनियमन केलं जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 

सरकार म्हणतंय...वीज हवी तर पैसे भरा

राज्यात घरगुती वापरासाठी प्रथम तर फर्टिलायझर्ससाठी दुसऱ्या क्रमांकानं गॅस पुरवला जातो. त्यामुळं दाभोळ पॉवर प्लाण्टच्या उत्पादकतेवर परिणाम झालाय. तर परळीचा प्रकल्प पाण्याअभावी पूर्णपणं बंद पडलाय. वीजनिर्मिती बंद असल्यामुळं 2700 ते 2800 मेगावॅट विजेची तूट निर्माण झालीय. पण जनतेनं काळजी करण्याचं कारण नाही. जे लोक बिल भरतात त्यांना 24 तास वीज मिळेल, पण ज्या ठिकाणी विजेची बिलं भरली जात नाहीत, प्रमाण कमी आहे तिथं कमीजास्त प्रमाणात भारनियमन राहील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.


परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रात तयार होणारी ११३० मेगावॅट वीजनिर्मिती पूर्णपणं बंद झाल्याचं वीजनिर्मिती केंद्राचे जनसंपर्क अधिकारी व्ही. एस. विभूते यांनी सांगितलंय.

 

Tower1आजही 20 टक्के भारनियमन - होगाडे
राज्यातलं भारनियमन संपलंय, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा वीजतज्ज्ञ आणि वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना खोडून काढला. आजही मागणीपेक्षा 20 टक्के भारनियमन आहे. म्हणजेच राज्यातील सुमारे सव्वादोन कोटी जनतेला भारनियमनाचा फटका बसतोय. शहरी भागात नऊ तासांचं, तर ग्रामीण भागात 13 तासांचं भारनियमन होतंय. आज विजेची उपलब्धता 14 ते 14,500 मेगावॅटच्या घरात आहे. उन्हाच्या झळा वाढायला लागल्या की, ही मागणी 15 हजार मेगावॅटच्या घरात जाईल. या स्थितीचा विचार करता सरकारनं इच्छाशक्ती दाखवल्यास दरवाढीचा बोजा ग्राहकांवर न टाकता भारनियमन टाळणं शक्य आहे. परंतु, आजपर्यंत अनुभव पाहता सरकारला योग्य नियोजन करण्यात स्वारस्य नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भारनियमनाला तोंड द्यावं लागेल असंच वाटतंय, असंही होगाडे यांनी सांगितलं. शेतीपंपांना दिवसा दहा तास वीज देण्याची मागणी आम्ही करतोय. मात्र, सरकार ती मान्य करत नाही. वीज नियामक आयोगानं आदेश दिल्यानंतर दिवसा आणि रात्री मिळून आज कशीतरी चार तास वीज पुरवली जाते, याकडंही होगाडे यांनी लक्ष वेधलंय.

 

...तर पहिला फटका दुष्काळग्रस्तांना
आता उन्हाच्या झळा सुरू व्हायला लागल्यात. त्यामुळं विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पंखा, एसी आदी उपकरणांना जादा वीज लागते. आता दोन प्रकल्प बंद पडल्यामुळं वीजनिर्मिती घटलीय. त्यामुळं वाढणाऱ्या विजेची मागणी सरकार कशी पूर्ण करणार, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आतापर्यंतचा अनुभव विचारात घेता भारनियमन अटळ असून त्याचा पहिला फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसेल. त्यातही दुष्काळग्रस्त भागातील वीज बिलाला तात्पुरती स्थगिती दिल्यानं दुष्काळग्रस्त भागातील जनता पहिल्यांदा बळी ठरेल, असं तज्ज्ञ मंडळी सांगतायत.

 

दृष्टिक्षेपात वीज

दरवर्षीचे नवीन ग्राहक – 9 ते 10 लाखांपर्यंत
घरगुती - एक कोटी, 50 लाख, 72 हजार
कृषिपंपधारक – 34 लाख, 46 हजार
एकूण ग्राहक – 2 कोटी, 4 लाख, 93 हजार 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.