रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. टिळक स्मारक मंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमात काव्यमैफीलही भरली होती. त्याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी घेतला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हाधिकारी राजीव जाधव, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष देव, भास्करराव शेट्ये, शिक्षणाधिकारी सी. डी. कोतवाल, प्राचार्या आर. यु. देशपांडे, ग्रंथपाल संजय डाडर यावेळी उपस्थित होते.
सध्याच्या भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जीवनात चाललेली घालमेल कर्जबाजारीपणामुळं होणाऱ्या त्यांच्या आत्महत्या याचं भीषण वास्तव भालेराव आपल्या कवितेतून व्यक्त करत असतानाच... आपण या शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे. हा शेतकरी राजा आपला पोशिंदा आहे. त्यामुळं त्याच्याबाबत आपण संवेदनशील राहिलं पाहिजे, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
शिक बाबा शिक लढायला शिक,
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक
लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक,
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक
मागं मागं नको पुढे सरायला शिक,
आत्महत्या नको हत्या करायला शिक...
शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आणि त्यांचं दुःख वेगळ्या पद्धतीनं मांडणारे कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या कवितेनं उपस्थितांचे डोळे अक्षरश: पाणावले.
काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता...
जवा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली,
तवा गावाला गावाला कोणी न वाली
कसे सुगीत घालतात गस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता...
आपल्या या सुप्रसिद्ध कवितेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनातील कष्ट श्रोत्यांसमोर मांडले. शेतकऱ्यांच्या वेदना मांडताना दुष्काळात कुणीच त्यांच्याकडं लक्ष देत नाही हे विदारक सत्यही त्यांनी व्यक्त केलं. राजकारणी मंडळी फक्त सुगीच्या दिवसात हजर असतात, पण एरवी ते फिरकतही नाहीत, हेही त्यांनी अत्यंत ताकदीनं लोकांसमोर मांडलं.
शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची माप,
तिथं राबतो, कष्टतो, माझा शेतकरी बाप
मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातही आता राजकारण सुरू झालंय, हा सगळा खटाटोप मराठी भाषेच्या विकासासाठी नाही तर ३०० कोटींच्या निधीसाठी सुरू असल्याची टीकाही भालेराव यांनी केली.
शालेय जीवनापासूनच वाचनाची गरज
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असं आमदार उदय सामंत यांनी सांगितलं. राजकारण करत असताना आम्हाला अनेक गोष्टींमध्ये मर्यादा येतात, कारण आम्ही कोणतं काम केलं की, याचा निवडणुकीशी काही संबंध तर नाही ना, असा अर्थ लावला जातो. त्यामुळं मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांनी कवी भालेराव यांना हाक दिली. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी तर निसर्ग आणि ग्रंथ हे परमेश्वराकडं जाणाऱ्या गाडीची दोन चाकं आहेत, असं म्हणत उपस्थितांना वाचनाचे फायदे सांगितले.
ग्रंथोत्सवात बालसभेचं आयोजन
ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं बालसभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. राजकुमार किंवा जादूच्या गोष्टी माहिती असतात. त्यात अधिक भर न घालता विज्ञान, तंत्रज्ञान याबद्दल अधिक माहिती देणारे ग्रंथ सोप्या भाषेत आणि कमी दरात उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा बच्चे कंपनीनं व्यक्त केली. लेखनात सोपी भाषा असावी आणि बाबा आमटे, मेधा पाटकर अशा थोर व्यक्तिमत्त्वांवर पुस्तकं अधिक प्रमाणात लिहिली जावीत, अशी मागणीही या बालसभेत करण्यात आली. गेल्या तीन दिवसात चाललेल्या ग्रंथोत्सवात पुस्तकांचे 10 स्टॉल लावण्यात आले होते.
Comments
- No comments found