टॉप न्यूज

नियोजन नसल्यानंच दुष्काळ

ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळं महाराष्ट्रावर दुष्काळ कोसळला आहे. दुष्काळ आणि विकासाच्या अभावामुळं खेड्यांमधून लोकांचे तांडेच्या तांडे बाहेर शहराकडं पडत आहेत. दुष्काळाचं नियोजन का केलं नाही? सिंचनाचे 70 हजार कोटी गेले कुठं? असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या नॉर्थकोट मैदानावरील जाहीर सभेत केले. या सभेला प्रचंड तरुणाई लोटली होती.
 

राज पुढं म्हणाले, ``पाटबंधारे खातं सत्ताधाऱ्यांच्या हातात असताना राज्यातील धरणं, कालव्याची कामं का पूर्ण झाली नाहीत? दुष्काळाचं नियोजन का केलं नाही? आता भविष्यात पाणी जमिनीतही सापडणार नाही. सिंचनाचे 70 हजार कोटी गेले कुठं? आता दुष्काळी कामातही भ्रष्टाचार आहे. जनावरांच्या छावण्यांमध्ये सगळेच दलाल आहेत. राज्यात एकीकडं दुष्काळ, पाणीटंचाई असताना सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची शेती बघा कशी हिरवीगार आहे. याचा आपल्याला राग येत नाही. आपली किंमत मेंढराप्रमाणं केली आहे. पैसे फेकले की तुम्ही त्यांना मत देता. आता त्यांना घरी बसवा अन्यथा तुमच्या माथी हेच भोग येतील. माझ्या हाती एकहाती सत्ता द्या.``

 

रज ठकर सलपरगुजरातचा दाखला
नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये बघा, कच्छच्या वाळवंटात दुसऱ्या टोकावरून नर्मदेचं पाणी आणलं. वाळवंटात जिथं काही उगवत नव्हतं तिथं आता अनेक फळपिकं पिकतात. मुख्यमंत्री राज्याचा विश्वस्त असला पाहिजे. नरेंद्र मोदी विश्वस्ताप्रमाणं कारभार करतात. इथं महाराष्ट्रात सगळेच मालक झाले आहेत. मोदी आंघोळ करतात, तेव्हा त्या पाण्याचे दोन दोन चमचे प्या, असा सत्ताधाऱ्यांना त्यांनी उपदेश दिला.

 


महाराष्ट्राला राज ठाकरे हाच पर्याय!
गुजरात, कर्नाटक आणि बिहारचा विकास होतो. मग महाराष्ट्राचा का होत नाही? महाराष्ट्रानं काय घोडं मारलं आहे? सत्तेचे मालक बनलेल्यांना आता घरी बसवा. राज ठाकरे हा महाराष्ट्राला समर्थ पर्याय आहे, अशी विराट सभेत ग्वाही दिली.

 

अवघी लोटली तरुणाई
या नॉर्थकोर्ट मैदानावरील सभेस सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, मराठवाडा आणि कर्नाटकातूनही अवघी तरुणाई लोटली होती. सभेदरम्यान शिट्टया, टाळ्यांचा पाऊस पडत होता.

 


अजित पवारांचा ठाकरी भाषेत समाचार
या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. रोज सकाळी लवकर उठतो, असं अजित पवार म्हणतात. लवकर उठून काय...सतत पैशांचे व्यवहार करायचे, मग झोप कशी लागणार? `काका मला माफ करा` असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पाठीशी एकही आमदार नाही.

 

राज्याचे गृहमंत्री आर.आर. आबांची पोल खोल
राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणं पोलिसाबद्दल दया दाखवली. गृहमंत्री आर. आर. पाटलांची पोल खोल केली. असा गृहमंत्री असतो? तिकडे नितीशकुमार यांनी गुन्हेगारांना जेरबंद करून बिहारवासीयांना विश्वास मिळवून दिलाय, इकडं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी बिहार केलाय.

 

लवासा सुंदर होऊ शकते, मग सोलापूर का नाही...
आपले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उजनीचं पाणी बारामतीला नेऊन कोणतं राजकारण करीत आहेत. लवासा सुंदर होऊ शकतं, मग सोलापूर का नाही..

 

सोलापूरसाठी सुशीलकुमार शिंदेंनी काय केलं?
सोलापूरचा टेक्स्टाईल उद्योग त्यांनी बरबाद केला. लुधियाना, त्रिचूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचा विकास झाला, सोलापूरचा का नाही? हे बिनकामाचे गृहमंत्री आहेत. मला सोनिया गांधींनी हे दिलं, ते दिलं, दलित असूनही एवढ्या मोठ्या पदावर नेलं, अहो, सुशीलकुमार तुम्ही काय केलं दलित बांधवांसाठी? दुष्काळ असो, बॉम्बस्फोट होतात, तेव्हा शिंदे नेहमी एकच ऐकवतात, मी पट्टेवाला होतो, सबइन्स्पेक्टर होतो, मी दलित आहे, हे अजून किती दिवस ऐकवायचं. सांगा दलितांसाठी काय केलं? राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंवर एकच झोड उठवली.

 

एक हाती सत्ता द्या!
माझ्याकडं एक हाती सत्ता द्या, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं, त्याशिवाय विकास होऊ शकत नाही. मत मागाला नाही आलो, मत बनवायला आणि मांडायला आलो आहे. येत्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवा.


तुळजाभवानीकडं साकडं
महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट दूर कर, असं साकडं त्यांनी तुळजापुरात जाऊन तुळजाभवानीला घातलं.


सभेला खच्चून गर्दी
नॉर्थकोटचं मैदान सभेला अपुरं पडलं. झाडाच्या फांद्यांवरही लोक बसले होते. मनपा परिसर, इमारती, पार्क स्टेडियमवरही गर्दी होती.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.