टॉप न्यूज

बडेजावी खर्च दुष्काळाकडं!

ब्युरो रिपोर्ट, सातारा
दुष्काळ असताना आपल्याच सहकाऱ्यांकडून दणक्यात साजरे झालेले विवाह, वाढदिवस पाहून झोप उडालेल्या शरद पवारांनी जाहीरपणे कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या सातारा दौऱ्यात स्थानिक नेतेमंडळींनी कार्यक्रम तर साधेपणानं साजरा केलाच. शिवाय वाचवलेल्या खर्चातून चारा खरेदी करून तो दुष्काळग्रस्त भागात पाठवून दिला. थोडाथोडका नव्हे चक्क 200 ट्रक चारा यामुळं दुष्काळासाठी मिळाला. विशेष म्हणजे, त्यात खासदार उदयनराजे भोसले हेदेखील आघाडीवर होते. सर्वच नेत्यांनी हा धडा गिरवला तर दुष्काळग्रस्तांची तहान भागायला कितीसं पाणी लागणारंय बाप्पा!
 


झोप उडाल्यानंतरची साखरझोप

राज्यात एकीकडं दुष्काळ असताना दुसरीकडं सार्वजनिक कार्यक्रमातून डोळं दिपवणाऱ्या श्रीमंती थाटाचं प्रदर्शन होतच होतं. राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी मुलामुलीच्या लग्नात केलेला बडेजाव पाहिल्यानंतर 'माझी तर झोपच उडाली' अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयकर विभागाचा ससेमिराही नामदार जाधवांच्या मागं लागला. लाल दिवा जाणार की राहणार, हे अजून अस्पष्ट असल्यानं कुठनं दुर्बुद्धी सुचली अन हे केलं, असं होऊन जाधवांचीच झोप उडालीय. पण त्यापासून इतरांनी धडा (धसका?) घेतलाय. त्याचंच प्रतिबिंब साताऱ्यात पाहायला मिळालं.

 

satara chara vatap 1दुष्काळी भागाला 200 ट्रक चारा
शरद पवार यांनी शनिवारी सातारा दौरा केला. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. मुळात कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीनं झाला. कार्यक्रमाचा खर्च वाचवून सुमारे 200 ट्रक चारा दुष्काळी भागाला दिल्याचं यावेळी आयोजकांनी जाहीर केलं. तो धागा पकडून भाषणात शरद पवार यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांना शाबासकी तर दिलीच. शिवाय इतरांनीही हा आदर्श गिरवण्याची गरज बोलून दाखवली. हा कार्यक्रम झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी (24 मार्च) उदयनराजे भोसलेंचा वाढदिवस होता. दुष्काळामुळं वाढदिवस साजरा न करण्याचं राजेंनी आधीच जाहीर केलं होतं. मग कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत वाचलेल्या पैशातून माण, खटाव या दुष्काळी भागाला 100 ट्रक चारा पाठवून दिला. वाढदिवसापूर्वीच 35 ट्रक चारा पाठवण्यात आला होता. 27 ट्रक चारा शरद पवार यांच्या हस्ते पाठवण्यात आला. तर उर्वरित चारा वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारी धाडण्यात आला.

 

ओघ सुरू झाला...
बाकी काही असलं तरी आता दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक फेस्टिव्हल रद्द करून तो खर्च जलसंधारणाच्या कामावर खर्च करायचं ठरवलंय. राज्यातील मंत्र्यांनी एक दिवसाचं वेतन द्यायचं जाहीर केलंय. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, तसंच शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान ट्रस्टनंही दुष्काळग्रस्तांना भरीव मदत जाहीर केलीय. मदतीचा ओघ असाच सुरू राहिल्यास दुष्काळग्रस्तांनाही सुखाची झोप लागू शकते.

 

दृष्टिक्षेपात दुष्काळ

 

48 टक्के पाणीसाठा
महाराष्ट्रात एकूण दोन हजार 468 प्रकल्प असून यात आज अखेर 48 टक्के एवढा पाणीसाठा आहे. कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 76 टक्के पाणीसाठा, तर मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपुरात 54 टक्के, अमरावती 54 टक्के, नाशिक 40 टक्के, पुणे 52 टक्के एवढा पाणीसाठा आहे. राज्यात पाणीटंचाई असलेल्या 969 गावात 1381 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

 

satara chara vatap tumbnailजनावरांच्या छावण्यांवर 214 कोटी 13 लाख रुपये खर्च
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात 173, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन, बीड जिल्ह्यात सात, पुणे जिल्ह्यात एक, सातारा जिल्ह्यात 89, सांगली जिल्ह्यात 20 आणि सोलापूर जिल्ह्यात 109 अशा एकूण 401 गुरांच्या छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण तीन लाख 46 हजार 847 जनावरं आहेत. जनावरांच्या छावणीवर आतापर्यंत 214 कोटी 13 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. चारा वितरणासाठी एकूण 684 कोटी 29 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

 

7हजार 64 गावं 50 पैसेवारीत
महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत राज्यात 18 हजार 660 एवढी कामं सुरू असून या कामांवर एक लाख 35 हजार 937 एवढी मजुरांची उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेच्या शेल्फवर तीन लाख 45 हजार 133 एवढी कामं असून त्याची मजूर क्षमता 15 कोटी 17 लाख एवढी आहे. 2012-13 या वर्षातील राज्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली असून, त्यात सात हजार 64 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या रब्बी हंगामाच्या हंगामी पैसेवारीत तीन हजार 905 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.