टॉप न्यूज

रेल्वेची महाराष्ट्राकडं पाठ!

ब्युरो रिपोर्ट, दिल्ली/मुंबई
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पानं काही जुजबी घोषणा वगळता महाराष्ट्राची निराशा केली. तीन पॅसेंजर, एक एक्स्प्रेस वगळता पदरी काहीच पडलं नाही. त्यातल्या त्यात नागपूरमध्ये रेल्वेचा नवीन प्रकल्प, बॉटलिंग प्लॅण्ट, प्रशिक्षण केंद्र आणि मुंबईत लोकलच्या 72 वाढीव फेऱ्या आणि काही गाड्यांना एसी डबे जोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी केली. समाधानाची बाब म्हणजे सुपरफास्ट गाड्या वगळता कोणतीही भाडेवाढ नसणारा हा अर्थसंकल्प असल्यानं प्रवाशांच्या खिशाला चाट पडणार नाही. सोनिया गांधींचा मतदारसंघ रायबरेलीमध्ये कोच फॅक्टरी दिल्यामुळं लोकसभेत काही काळासाठी गोंधळाचं वातावरण झालं.

 

railway imagesविदर्भासाठी घोषणा झाल्यात पण...

नागपूरमध्ये रेल्वेचा नवीन प्रकल्प, नवीन बॉटलिंग प्लॅण्ट, विशेष प्रशिक्षण केंद्र अशा घोषणा झाल्या असल्या तरी अपेक्षेप्रमाणं फारसं काही पदरात पडलेलं नाही. नव्या रेल्वेगाड्या, रखडलेले प्रकल्प अन्‌ वर्ल्ड क्‍लास स्टेशनच्या दिशेनं उपाययोजना होण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. नागपूर-वर्धा थर्ड लाईनच्या प्रस्तावाबाबत काहीच घोषणा झाली नाही. नागपुरातील अजनी इथं तयार करण्यात आलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्‍सचं काम पूर्ण झालं आहे. कुठल्याही प्रदेशात नव्या रेल्वेगाड्या देताना तिथं रेल्वेगाड्यांची देखभाल करण्यासाठी कोचिंग कॉम्प्लेक्‍स आहे की नाही? याचा प्रथम विचार करण्यात येतो. नागपुरात कोचिंग कॉम्प्लेक्‍स तयार झाल्यामुळं या अर्थसंकल्पात विदर्भाच्या पदरात नव्या रेल्वेगाड्या पडण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत होती, पण तेही झालेलं नाही.

 

मुंबईत लोकलच्या 72 फेऱ्या वाढल्या

प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेता मुंबईत लोकलच्या७२ नव्या फेऱ्या सुरू करण्याची घोषणा झालीय. अनेक वर्षांपासून होणारी एसी लोकलची मागणीही साकार झालीय. बाहेरून येणाऱ्या गाड्या आणि लोकल यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक ऐन गर्दीच्यावेळी नेहमी कोसळतं. मात्र, कर्जत आणि कल्याणमध्ये तिसरी लाईन टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे काम पूर्ण झाल्यास वेळापत्रकाप्रमाणं गाड्या धावतील.

 

सुपरफास्ट वगळता भाडेवाढ नाही
railwayरेल्वे मंत्रालयानं यावर्षी २१ जानेवारीला रेल्वे भाड्यात वाढ केली होती. त्यामुळं तूर्तास रेल्वे प्रवासात भाडेवाढ करण्यात आलेली नाही. सुपरफास्माट गाड्या, तसंच ऑनलाईन बुकींग आणि रिझर्व्हेशन दरात नाममात्र वाढ झालीय. येत्या वर्षात ३२ हजार ५० कोटी रुपये प्रवास भाड्यातून मिळवण्याचं लक्ष्य रेल्वेनं ठेवलं असल्यानं लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो, त्यानुसार वर्षभरात केव्हाही ही वाढ होऊ शकते, असे संकेत बन्सल यांनी दिलेत.

 

रेल्वे अर्थसंकल्पातील महाराष्ट्र

नागपूरमध्ये सुरू होणारे प्रकल्प
- देशात रेल्वेमार्गांवर प्रस्तावित सहा पाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प नागपूरमध्ये उभारण्यात येणार.
- रेल्वेसेवेसाठी आवश्यक कौशल्यावर आधारित देशातील प्रस्तावित 25 प्रकल्पांपैकी एक नागपुरात उभारण्यात येणार.
- रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणामधील बहुविभागीय प्रशिक्षण संस्था नागपुरात उभारणार.
- नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या एक्झिकेटिव्ह लाऊंजप्रमाणं नागपूर इथं एक्झिकेटिव्ह लाऊंज उभारणार.

 

नवीन रेल्वेमार्ग :
पुढील वर्षात नागपूर-नागभीड नवीन रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी नॅरोगेज रेल्वे सध्या अस्तित्वात असून तिचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
नवीन मार्गांचं सर्वेक्षण : 2013-14 मध्ये राज्यात करण्यात येणार्‍या नवीन मार्गांच्या सर्वेक्षणामध्ये
1) मलकापूर-चिखली
2) नायगाव-दिवा (जूचंद्र) वसई रोड बायपास लाईन
3) वाशीम–माहूर-अदिलाबाद
4) मंगळवेढा-पंढरपूर-विजापूर
या मार्गांचा समावेश आहे.

 

रेल्वेमार्गांचं दुपदरीकरण :
1) दौंड-मनमाड
2) कल्याण-कर्जत (तिसरी लाईन)
3) परभणी-मनमाड
4) सिकंदराबाद-मुदखेड-अदिलाबाद
या मार्गांचा समावेश आहे

 

महाराष्ट्रातून धावणार्‍या नव्या एक्सप्रेस गाडया :
1) अजनी (नागपूर)-लोकमान्य टिळक एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया हिंगोली
2) वांद्रे टर्मिनल्स-रामनगर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया नागदा-मथुरा- कानपूर-लखनऊ-रामपूर
3) वांद्रे टर्मिनल्स-जैसलमेर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया मारवाड-जोधपूर
4) वांद्रे टर्मिनल्स- हिस्सार एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया अहमदाबाद-पालनपूर-
मारवाड-जोधपूर-डेगाना
5) वांद्रे टर्मिनल्स-हरिद्वार एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया वलसाड
6) बिकानेर-चेन्नई एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया जयपूर-सवाईमाधोपूर-
नागदा-भोपाळ-नागपूर
7) चेन्नई-नागरसोल (साईनगर शिर्डीसाठी) एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया
रेणिगुंटा-धोने-काचेगुडा
8) गांधीग्राम-विशाखापट्टणम एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया अहमदाबाद-वर्धा-
बल्लारशाह-विजयवाडा
9) हजरत निजामुद्दीन-मुंबई एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया भोपाळ-खंडवा-
भुसावळ
10) हुबळी-मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया मिरज-पुणे
11) जबलपूर-यशवंतपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया नागपूर-धर्मावरम
12) काकीनाडा-मुंबई एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा)
13) कालका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) व्हाया हजरत
निजामुद्दीन-भोपाळ-इटारसी
14) लोकमान्य टिळक-कोच्चूवेल्ली एक्सप्रेस (साप्ताहिक)
15) मुंबई-सोलापूर एक्सप्रेस (आठवड्यात सहा दिवस) व्हाया पुणे
16) निजामाबाद-लोकमान्य टिळक एक्सप्रेस (साप्ताहिक)
17) पुरी-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया संबलपूर-टिटलागड-रायपूर-
नागपूर-भुसावळ
18) उना/नंगल डॅम-हजूर साहेब नांदेड एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया आनंदपूर
साहिब-मोरिंडा-चंदिगढ-अंबाला

 

नव्या पॅसेंजर गाडया :
1) मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर (दररोज)
2) अमरावती-नरखेड पॅसेंजर (दररोज)
3) पूर्णा-परळी-वैजनाथ पॅसेंजर (दररोज)

 

विस्तारित मार्ग :
1) दुर्ग-छपरा एक्सप्रेस (गोंदियापर्यंत)
2) लोकमान्य टिळक-भुवनेश्वर एक्सप्रेस (पुरीपर्यंत)
3) लोकमान्य टिळक-दरभंगा एक्सप्रेस (रक्सोलपर्यंत)
4) मुंबई सीएसटी-लातूर एक्सप्रेस (हजूर साहेब नांदेडपर्यंत)
5) सोलापूर-यशवंतपूर एक्सप्रेस (मैसूरपर्यंत)
6) भुसावळ-अमरावती पॅसेंजर (नरखेडपर्यंत)

 

महाराष्ट्रातून धावणार्‍या गाडयांच्या फेर्‍यामध्ये वाढ :
1) अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस (दोनवरून तीन दिवस)
2) जबलपूर-अमरावती एक्सप्रेस (तीनवरून सात दिवस)
3) नरसापूर-नागरसोल (साईनगर शिर्डी) एक्सप्रेस (दोनवरून सात दिवस)
4) विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक एक्सप्रेस (दोनवरून सात दिवस)
5) संबलपूर-हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस (दोनवरून तीन दिवस)
6) विशाखापट्टणम-हुजूर साहेब एक्सप्रेस (दोनवरून तीन दिवस)

 

2013 वर्षांत पूर्ण होणारे रेल्वेमार्ग
1) अहमदनगर-नारायणदोह
2013 वर्षांत विद्युतीकरण पूर्ण होणारा रेल्वेमार्ग
1) बेलापूर-दौंड
2014 पर्यंत दुपदरीकरण पूर्ण होणारे रेल्वेमार्ग
1) चिंचपाडा-नंदुरबार
2) कालूमना-नागपूर

 

railway1अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

 • मुंबईत धावणार पहिली 'एसी ट्रेन'
 • मुंबईत नव्या ७२ लोकल, तर कोलकात्यात १८ लोकल
 • तत्काळ सेवेच्या शुल्कात वाढ
 • मालभाड्यात ५ टक्के वाढ
 • पिण्याच्या पाण्यासाठी ६ 'रेल्वे नीर' प्रकल्प उभारणार
 • ब्रेल लिपीत स्टिकर्सचा समावेश
 • रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय यंत्रणा स्थापणार
 • रेल्वेतील दीड लाख जागा भरण्यासाठी ६० शहरांमध्ये नोकरभरती
 • आता इंटरनेटवरून २३ तास बुकिंग होणार; फक्त एक तास ही सेवा बंद राहणार
 • नागपूर-नागभीड मार्गाचं गेज कन्व्हर्जन्स होणार
 • २६ नवीन पॅसेंजर ट्रेन आणि ६७ नवीन एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याची घोषणा
 • रेल्वेसंदर्भातील तक्रारीसाठी नवा नंबर १८००-१११-३२१
 • मंदीमुळे रेल्वे मालवाहतुकीचं लक्ष्य गाठू शकलो नाही
 • रेल्वेचा कचरा विकून ४५०० करोड रुपये उभे करणार
 • रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या आणखी आठ कंपन्या स्थापन करणार
 • या कंपन्यांमध्ये निवड करताना १० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणार   

railway graph

raiway reservation


Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.