आईस्क्रीमचे विविध फ्लेवर्स
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरांमध्ये आईस्क्रीमचे विविध फ्लेवर्स चाखायला मिळतात. पण रेग्युलर थ्री इन वन पॅकमध्ये न मिळता त्याचे स्कूप्स मिळतात. यशश्रीचे मालक प्रमोद ओरसकर यांना इथंच या आईस्क्रीमच्या निर्मितीची कल्पना सुचली. व्हॅनिला, पिस्तापेक्षा काही तरी वेगळं लोकांना देण्याचं त्यांनी ठरवलं. आपल्या गावाकडं म्हणजे मालवणमध्ये आल्यानंतर त्यांनी मिरची, आलं, लिंबू फ्लेवरची आईस्क्रीम बनवण्याचा प्रयोग केला. थोड्या मेहनतीनंतर तो प्रयत्न यशस्वीही झाला. त्यांच्या या नवीन फ्लेवर्सचा दुकानाबाहेर त्यांनी बोर्डही लावलं. पण सुरुवातीला गावात कुणालाही विश्वास बसेना. हा सगळा प्रकार पब्लिसिटी स्टंट आहे, अशा प्रतिक्रिया गावात उमटू लागल्या.
मिरची, आलं, लिंबू फ्लेवर
लोकांनी या नवीन फ्लेवर्सचा आस्वाद घ्यावा म्हणून ओरसकर यांनी आधी मित्र परिवाराला पार्लरमध्ये बोलावून मिरची, आलं, लिंबू फ्लेवरचं आईस्क्रीम खायला दिलं. मग कुठं जाऊन त्यांचा विश्वास बसू लागला. त्यानंतर कुठं त्यांनी तयार केलेल्या या घरगुती पद्धतीच्या आईस्क्रीमची महती आसपासच्या गावात पसरू लागली. मग काय, बघता बघता लोकांची गर्दी वाढू लागली. गावातले लोकच कुतूहल म्हणून, जीभ झोंबते का? लिंबू आंबट लागतं का? हे पाहण्यासाठी येऊ लागले. जेव्हा लोकांना हे जरा वेगळं आहे याची खात्री पटली तेव्हा त्यांनीच याचा प्रचार आणि प्रसार केला. आता तर अशी परिस्थिती निर्माण झालीय की, मालवणमध्ये येणारे, आंगणेवाडीच्या जत्रेत येणारे पर्यटकही आवर्जून मिरची, आलं, लिंबू फ्लेवरच्या आईस्क्रीमची मागणी करू लागले.
सध्या मिरची, आलं आणि लिंबू आईस्क्रीम फक्त यशश्रीमध्ये उपलब्ध आहे. याला कारणही आहे, त्यांनी तयार केलेली मशीन खूप छोटी आहे. मर्यादित प्रमाणातच या आईस्क्रीमची निर्मिती करता येते. पण भविष्यात संधी मिळाली तर कमर्शिअल स्तरावर याची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे. ओरसकर यांना येणाऱ्या काही दिवसात किमान मालवण शहराच्या प्रत्येक दुकानात हे फ्लेवर्स मिळतील अशी आशा आहे.
Comments
- No comments found