टॉप न्यूज

हम होंगे कामयाब!

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
जागतिक मंदी, महागाई आणि वित्तीय तूट कमी करण्याचं मोठं आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेपुढं आहे. पण...''हम क्या बनेंगे, यह हम पर निर्भर है'' याची जाणीव करून देतानाच 'मन में है विश्वास, हम होंगे कामयाब,' अशा शब्दात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यशस्वी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. संसदेत काल (गुरुवारी) 2013-14 सालचं बजेट सादर करताना चिदंबरम यांनी अनेक वेळा देशवासीयांना धोक्याची जाणीव करून दिली. तसंच या सर्वांवर मात करीत भारत जगात दहावी मोठी आर्थिक सत्ता म्हणून उदयाला येईल, असा विश्वासही व्यक्त केला.

 

chidambaramविकासाचं जू तरुणाईच्या खांद्यावर
आर्थिक तूट तीन टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून त्याला चांगलं यश मिळत असल्याचं चिदंबरम् यांनी निदर्शनास आणून दिलं. समस्त तरुणाईला आवाहन करताना त्यांनी तुम्हीच देशाचे आधारस्तंभ असून देशाचा विकास तुमच्याच खांद्यावर निर्भर असल्याचं सांगितलं. तमिळ संत तिरुवेल्लू यांच्या ''हम क्या बनेंगे, यह हम पर निर्भर है'' या वाक्याचा दाखलाही त्यांनी दिला.

 

''आपको जितनी शक्ती और हिम्मत चाहिए, वह आपके अंदर है। इसलिए, आप अपने भविष्य का निर्माण करें'' या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी तरुणाईला आश्वस्त केलं.


अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांना यशस्वी तोंड देऊन भारत जगातली दहावी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल. येत्या काही वर्षांत जगात भारताचं स्थान आणखी वरच्या स्थानावर जाईल. योग्य निर्णय आणि नीती यातून हे साध्य होईल, असंही चिदंबरम म्हणाले.


मंदीवर उतारा बचत - गुंतवणुकीचा
देशाचा सर्वांगीण विकास हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. जगभरामध्ये जरी मंदीचं वातावरण असलं तरी आपला देश त्यातूनही तग धरू शकेल. त्यासाठी देशातील वाढती आर्थिक तूट भरून काढणं हे सध्याचं मोठं आव्हान आहे. विदेशी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला पाहिजे. मंदी आणि महागाईविरुध्द लढा देताना बचत आणि गुंतवणुकीचा पर्यायही त्यांनी देशवासीयांपुढं ठेवलाय. उधळपट्टी न करता गरजा सीमित ठेवा, असंच त्यांनी सूचित केलंय.

 

विकासदर 8 टक्क्यांवर राहील
मोठ्या प्रमाणावर कोळशाची आयात, सोन्याची कमी प्रमाणात निर्यात यामुळं अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येतोय. हे टाळण्यासाठी यावर्षी, तसंच पुढील वर्षातही परकीय चलन कसं वाढेल, यावर आपण भर दिला पाहिजे. विकासाचा दर वाढवण्यासाठी चलनवाढीचा दर नियंत्रित ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढं आहे. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, परदेशी संस्थांमधील काही गुंतवणूक करणं आणि हे करण्यामुळं आर्थिक विकासदर 8टक्क्यांपर्यंत टिकून राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

 

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात घ्या
देशाच्या आर्थिक विकासाचा दर ११व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सरासरी ८ टक्क्यांवर राहिलाय, याकडं लक्ष वेधून विकासाचे फायदे महिला आणि आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्यात आपण उणे पडत आहोत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. विकासाच्या प्रक्रियेत मागं राहून गेलेल्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात सामाविष्ट करणं आणि विकासाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवणं हे केंद्र सरकारचं धोरण आहे. सर्वसमावेशक विकासासाठी यूपीए कटिबद्ध आहे. आज मी सादर करत असलेलं बजेट हाही या वचनबद्धतेचाच एक भाग आहे.

 

चिदंबरम् उवाच...

"आपका पैसा, आपके हाथ! 'आधार'द्वारे विविध योजनांचा आर्थिक लाभ थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसेल."

"महिलांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही महत्त्वाचं पाऊल उचललंय."

"अन्नधान्य सुरक्षा विधेयक हे यूपीएनं देशवासीयांना दिलेलं वचन आहे आणि ते पूर्ण करणारच!"


शेअर बाजार नाखूश
बजेटवर शेअर बाजारनं मात्र नाखुशीची मोहोर उठवलीय. तीन महिन्यांनंतर प्रथमच सेन्सेक्स 19 हजाराच्या खाली घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 290 अंकांनी घसरून 18861 वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 103 अंकांची घट पाहायला मिळाली. यात प्रमुख्यानं बँका आणि पायभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले.

 

सिमेंट, वीज क्षेत्रातील कंपन्यांमध्येही मोठी विक्री बघायला मिळाली. चिदंबरम यांच्याकडून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जातील अशी बाजाराची अपेक्षा होती.
पण चिदंबरम यांच्या भाषणातून या आशावादाला कुठलंही बळ मिळालं नाही, त्यामुळं बाजार पडला, असं तज्ज्ञांनी सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.