टॉप न्यूज

'वडाप बंद झालेच पाहिजे!'

मुश्ताक खान, खेड, रत्नागिरी
‘आमच्या मागण्या मान्य करा’, ‘वडाप बंद झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत खेडच्या रिक्षा चालक-मालक संघटनेनं अवैध प्रवासी वाहतुकीला जोरदार विरोध केलाय. आमच्या रोजीरोटीवर गदा आणणाऱ्या या अवैध वाहतुकी विरोधात प्रशासन कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार रिक्षा संघटनेनं 'भारत4इंडिया'शी बोलताना जाहीर केला. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या तहसीलदार कचेरीसमोर सुरू असलेलं रिक्षा चालक-मालक संघटनेचं उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
 

वडाप म्हणजे अनधिकृत प्रवासी वाहतूक
कोकणात अनधिकृतपणं प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना वडाप (मेटेडोर रिक्षा) म्हणून ओळखलं जातं. कोकणाच्या बाहेर हा व्यावसाय काळी-पिवळी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या काळी-पिवळी विरोधात एसटी महामंडळानंही अनेकदा दंड धोपटले आहेत. आता रिक्षा चालक-मालक संघटनेनंही याविरोधात उडी घेतलीय. या वडाप बंद होण्यासाठी रत्नागिरीतील अकरा रिक्षा चालक-मालक संघटनेचे जवळजवळ 700 ते 800 सदस्य खेड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उषोणाला बसलेत. अद्याप आंदोलकांच्या प्रश्नाबाबत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं येऊन साधी चौकशीही केलेली नाहीय. या चोरट्या वाहतुकीकडं हे सरकारी अधिकारी जाणूनबजून दुर्लक्ष करताहेत, असा आरोप या रिक्षा संघटनांनी केलाय.

 

vlcsnap-2013-03-04-16h37m42s136.pngवडापमधून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक
वाहतुकीचा नियम पाळत जे परमिटधारक रिक्षाधारक आहेत ते तीनच प्रवासी बसवतात. पण अवैध वाहतूक करणाऱ्यांना यावर कसलीच बंधन नसल्यानं ते तब्बल एका गाडीत जनावरांप्रमाणं १०-१२ प्रवासीही कोंबतात. यावर कहर म्हणजे प्रशासनाला या गोष्टी माहीत असूनही ते याकडं साफ दुर्लक्ष करताहेत, असं रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मंगेश खेडेकर म्हणतात. त्यामुळं जोपर्यंत प्रशासन काही महत्त्वाचं पाऊल उचलत नाही आणि ही सुरू असलेली चोरटी वाहतूक पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, अशी भूमिका खेडेकर यांनी घेतलीय.

 
प्रशासनाकडून मागण्यांबाबत दुर्लक्ष

ही अवैध वाहतुकीची बाब रिक्षा संघटनेनं वारंवार निवेदनाद्वारे तिथल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलीय. परंतु त्यांच्याकडून यासाठी कधीही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आजपर्यंत केवळ आश्वासनं देण्यात आली. परंतु दिलेलं एकही आश्वासन अद्याप पाळण्यात आलेलं नाही, असा आरोपही संघटनेनं केलाय. अखेर शेवटचा पर्याय म्हणून हे आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला, असं रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मंगेश खेडेकर यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केलं.

 

vlcsnap-2013-03-04-16h37m52s246.pngरिक्षा संपामुळं प्रवाशांना फटका
खेडमध्ये २-३ किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. तिथून शहरात येण्याचं एकमेव साधन म्हणजे रिक्षा. आता त्यामधले ७००-८०० रिक्षा चालक-मालक संपावर गेल्यामुळं याचा सर्वाधिक फटका बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना बसलाय. सध्या खेडमध्ये नावालाही रिक्षा दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यातल्या त्यात आंदोलनामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतलीय. त्यामुळं आता प्रशासन या समस्येबाबत काय निर्णय घेतंय याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.