टॉप न्यूज

जलाल बाबांचा उरुस

मुश्ताक खान, रत्नागिरी
रत्नागिरीतल्या वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबा यांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्याप्रमाणं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही नुकताच हा सर्वधर्मीयांचा मेळावा मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला. उरुसाला राज्यभरातून लाखो हिंदू-मुस्लिम भाविकांनी उपस्थिती लावली. इथं प्रसाद म्हणून दिलं जाणारं चिकन-मटणाचं जेवण हा नियोजनाचा उत्तम नमुनाच असतो, याची प्रचीतीही भाविकांनी घेतली.
 


वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्या तुल्यबळच असतो. नुकत्याच झालेल्या पीर जलालशाह बाबांच्या उरुसाला ९० वर्षं पूर्ण झाली. ९० वर्षांपूर्वी शेख उमर पोत्रिक यांनी या उरुसाची सुरुवात केली. त्यावेळी जलालशाह बाबा यांची फक्त मजार म्हणजेच समाधी होती. तिथं साधी इमारतही नव्हती. त्या मजारीवर पोत्रिक कुटुंबीयांनी पेंढ्याची शेड बांधून उरुसाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तर या परिसरात लाईट, रस्ता काहीच नव्हतं. त्यावेळी पोत्रिक कुटुंबीय दिवाबत्ती घेऊन पायपीट करत इथपर्यंत येत असत.

 

Peer Baba Jalal 2.pngएसटी महामंडळाकडूनही विशेष फेऱ्या
पोत्रिक कुटुंबीयांच्या पुढाकारानंच इथं सर्व सोयीसुविधायुक्त दर्ग्याची भव्य इमारत उभी राहिली आहे. या उरुसासाठी जवळजवळ वर्षभर तयारी सुरूच असते. येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या येण्या-जाण्याची सुविधा चोख असावी यासाठी प्रशासनही काळजी घेत असतं. उरुसाच्या दिवशी खेड परिसरातल्या गावांमधून भाविक या ठिकाणी यावेत यासाठी एसटी महामंडळाकडूनही विशेष फेऱ्या सोडण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांत या उरुसामध्ये किती भाविक येतात याचा नेमका आकडा कळू शकलेला नाहीये, पण पुढच्या वर्षापासून भाविकांची मोजणीही केली जाईल, असं अब्दुल कादर पोत्रिक यांनी सांगितलं.

 

Peer Baba Jalal 5.pngहे ठिकाण सर्व समुदायांचं
हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत आदराचं ठिकाण म्हणून जलालशाह बाबा यांचा दर्गा ओळखला जातो. या उरुसाला ५० टक्के मुस्लिम, तर ५० टक्के हिंदू उपस्थित राहतात. ज्या गावात जलालशाह बाबांचा दर्गा आहे, त्या गावात एकही मुस्लिम कुटुंबीय राहत नाही. तरीही या गावातील सर्व ग्रामस्थ या उरुसाला आवर्जून येतात. त्यामुळं जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील जनतेला हा संदेश जातो की हे ठिकाण सर्व समुदायांचं आहे.

  

प्रसाद म्हणून चिकन - मटणाचं जेवण

उरुसाला येण्यापूर्वी खेड शहरातून गौस खतीब यांच्या घरापासून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संदलची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर संदल दर्ग्यात पोहोचायला जवळपास दहा वाजतात. संदल आल्यानंतर दर्ग्यात Peer Baba Jalal 1.pngदुआ मागितली जाते आणि मग प्रसाद वाटपाला सुरुवात होते. एरवी प्रसाद म्हणून शिरा, खिचडी आपल्याला माहिती आहे. पण जलालशाह बाबा यांच्या उरुसात नियाज म्हणजेच प्रसाद म्हणून चिकन आणि मटणाचं जेवण दिलं जातं. हजारो लोक इथं नियाजसाठी रांग लावतात. उरुसानिमित्त १५-१६ मण तांदूळ आणि ५०० किलो मटण शिजवलं जातं. त्यात कोंबडी आणि बोकडाच्या मटणाचा समावेश असतो. अत्यंत शिस्तबद्ध सुरू असलेला हा प्रकार पाहून अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटतात.

 

गेल्या नऊ दशकापासून पोत्रिक कुटुंबीयच या उरुसाची व्यवस्था पाहत आहेत मग ती भाविकांची सोय असेल, नियाजची व्यवस्था असेल किंवा आणखी काही या सर्व गोष्टींसाठी पोत्रिक कुटुंबीय सदैव तत्पर असतात. येणाऱ्या काळामध्ये भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असंही अब्दुल कादीर पोत्रिक यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.