टॉप न्यूज

विज्ञान जत्रेतलं 'रुरल टॅलेंट'

ब्युरो रिपोर्ट
कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत नुकतंच एक आगळंवेगळं विज्ञान प्रदर्शन पार पडलं. यावेळी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी अणुभट्टीपासून सॅटेलाईट, रॉकेटपर्यंतची मॉडेल्स सादर केली. कोणीही थक्क व्हावं, असं हे 'रुरल टॅलेंट' (ग्रामीण शहाणपण) होतं. हे पाहिल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. मुंबईच्या भाभा विज्ञान मूलभूत शिक्षण सहकार्यानं पार पडलेल्या या विज्ञान जत्रेची 'चला जाणून घेऊया ज्ञानरचनावाद' ही मध्यवर्ती कल्पना होती. राज्यात अशा पद्धतीचं हे पहिलंच विज्ञान प्रदर्शन होतं.
 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यावेळी विज्ञानावर आधारित ३०० विविध प्रयोगांचं सादरीकरण केलं. या उपक्रमात माध्यमिक शाळांचे सुमारे एक हजार शिक्षक आणि एक हजार विदयार्थी सहभागी झाले होते.

 

Rayat2विज्ञाननिष्ठ पिढी बनवा - शरद पवार
दैनंदिन जीवनात आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो, समाजजीवन बदलण्यासाठी विज्ञान उपयुक्‍त ठरतंच. नवी आव्हानं पेलण्यास विज्ञानासंबंधी चिकित्सक वृत्ती आणि आस्था महत्त्वाची असते. ''ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचं ज्ञान देऊन विज्ञाननिष्ठ युवा पिढी घडवणं ही आता काळाची गरज आहे," असं मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे, व्हॉईस चेअरमन डॉ. अनिल पाटील आदी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.


टेक्नॉलॉजी सेंटर उभारणार - शिंदे
संस्थेचे पहिले अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडवण्याचं काम जोरात सुरू आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावं यासाठी चार कोटींची देणगी गोळा करून देत संस्थेच्या बारा कोटींच्या संगणक सेंटर उपक्रमात मोलाचं काम केलंय. आता ग्रामीण भागातून नोबेल पारितोषिक मिळवणारे विद्यार्थी घडावेत यासाठी टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रावसाहेब शिंदे यांनी दिली.

 

'रयत' ही संस्था नसून चळवळ - माशेलकरRayat5
याप्रसंगी ज्येष्ठ शास्ञज्ञ रघुनाथ माशेलकर म्हणाले, "शंभर वर्षांपूर्वी कर्मवीरांनी सर्वसामान्यांसाठी कमवा आणि शिका हा प्रयोग राबवला. तसंच शेती, कचऱ्यापासून खतनिर्मिती; शाळा, वसतिगृहामध्ये नवनवीन प्रयोग केले. त्यासह 'ई' म्हणजे 'एज्युकेशन' आणि 'एफ' अर्थात 'फ्युचर' असं समीकरण स्पष्ट केलं. ज्या शिक्षणानं समाजाचं भविष्य घडेल तेच शिक्षण अधिक महत्त्वाचं आहे. शिक्षण हेच भविष्य आहे, ही विचारधारा देणारी 'रयत' ही संस्था नसून एक चळवळ आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.


विज्ञान जत्रेचं हे होतं आकर्षण
सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (रॉकेट) - सॅटेलाईटच प्रक्षेपण कशा पद्धतीनं केलं जातं याचं प्रात्यक्षिक मॉडेल्सच्या सहाय्यानं दाखवण्यात आलं. हे मॉडेल 27 फूट उंच होतं. यासाठी कप्ची, लॉंचर, स्मोक, लाईट इफेक्‍ट्‌स, बॅकग्राऊंड म्युझिकच्या साहाय्यानं प्रक्षेपण करण्यात आलं.

 

सॅटेलाईट (मॉडेल) - अवकाशात जे. पी. एस. एल. व्ही. आणि जी. एस. एल. व्ही. अशा प्रकारचे उपग्रह सोडण्यात येतात. त्या सॅटेलाईटचे मॉडेलही शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं.

 

अणुभट्टी - प्रातिनिधिक स्वरूपातील अणुभट्टीचं मॉडेल अबालवृद्धांच्या औत्सुक्याचा विषय झाला होता. प्रदर्शनस्थळी 24 बाय 24 आकाराची भव्य क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची रांगोळी रेखाटण्यात आली होती. सुरेख रंगसंगती आणि प्रकाशयोजना हे या रांगोळीचं वैशिष्ट्य होतं. सुमारे 16 कला शिक्षकांचे हात त्यासाठी राबले.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.