टॉप न्यूज

शेतीविषयक संशोधन बांधापर्यंत पोहोचवा

मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
जगभरात अथवा देशात शेतीविषयी संशोधन होतच असतं. पण ते वेळेत बांधापर्यंत पोहोचतंच असं नाही. त्यामुळं त्या संशोधनाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती लाभ होतो, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कोकण विद्यापीठाच्या भेटीदरम्यान नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत संशोधन करण्याबरोबरच ते तातडीनं बांधापर्यंत पोहोचण्यासाठीही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शेतीत नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, असं आवाहनही त्यांनी केलं. या भेटीत राज्यपालांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची गाऱ्हाणी ऐकली आणि समस्या सोडवण्याचंही आश्वासन दिलं.
 

governor visit photo 1राज्यपालांनी कृषी विद्यापीठातील संशोधनाचा आढावा घेतला. विद्यापीठातील विविध विभागांच्या प्रमुखांनी राज्यपालांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी संशोधनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक पवार, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भावे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दीपक हर्डीकर उपस्थित होते.


नारळ तोडणी यंत्राचं प्रात्यक्षिक
विद्यापीठानं विकसित केलेल्या नारळ तोडणी यंत्राचं राज्यपालांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या यंत्राच्या साहाय्यानं नारळाच्या झाडावर चढणाऱ्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी आपुलकीनं गप्पा मारून यंत्राच्या सुलभतेविषयी माहिती घेतली. हे उपकरण कोकणसाठी विशेष उपयुक्त ठरणार असून त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचेल यासाठी विद्यापीठानं प्रयत्नशील राहावं, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय काजू फोडणी यंत्र, सुपारी फोडणी यंत्र आदी उपकरणांचंही त्यांनी कौतुक केलं.


शेतकऱ्यांशी चर्चा
राज्यपालांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. आधुनिक यांत्रिकीकरणाच्या बाबतीत सरकारनं सहकार्य करावं, कोकणातल्या दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, विद्यापीठानं विकसित केलेल्या जलकुंडांची व्याप्ती वाढवण्यात यावी, बचत गटांच्या छोट्या युनिट्सना कर्ज उपलब्ध व्हावं, त्याचबरोबर गोड्या पाण्यातील मच्छीमारीबाबत सरकारनं गंभीर व्हायला हवं, असे अनेक कळीचे मुद्दे यावेळी शेतकऱ्यांनी मांडले. ते सोडवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू, असं आश्वासन राज्यपालांनी दिलं. त्यामुळं आता आमचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.governor visit photo  3काजू आणि दुग्धोत्पादन वाढवा

कृषी प्रदर्शनाला भेट देण्यापूर्वी राज्यपालांनी विद्यापीठातील संशोधकांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. कोकणातील काजूला बाजारात चांगली किंमत मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांनी काजूपासून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी विद्यापीठानं जागरूक असलं पाहिजे. त्याचबरोबर कोकणात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठीही विशेष प्रयत्न करावेत, असंही ते म्हणाले. राज्यपालांनी कोकणात लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळावं यासाठी 'वळणे' इथल्या काजू प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन माहिती घेतली.

 

अननसाची लागवड करा
फळांमध्ये आंबा, काजू, चिकू, फणस तर असतंच, पण अननसाचीही लागवड केली तर चांगला फायदा मिळू शकेल, असा मोलाचा सल्ला राज्यपालांनी दिला. कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी खास शेतकऱ्यांसाठी केलेल्या संशोधनाची माहिती दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी विद्यापीठानं तांदूळ, आंबा, नारळ, काजू, भाजीपाल्याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. विद्यापीठाच्या माध्यमातून वर्षाला ६७०० टन बियाणांची निर्मिती केली जाते, असंही कुलगुरूंनी सांगितलं.

 

आंबा उत्पादन तंत्रज्ञानाला भेट
मान्यवरांनी विद्यापीठाच्या नर्सरी, फळप्रक्रिया, उच्चतंत्र शेती प्रकल्प, वाईन निर्मिती प्रकल्प, अवजारे उद्यान, ऊर्जा उद्यान, पाणलोट उद्यान, नारळ आणि काजूप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, काथ्यानिर्मिती केंद्र, तसंच कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील विद्यापीठ संग्रहालय आणि विक्री केंद्रास भेट दिली. विद्यापीठानं विकसित केलेलं 'आंबा उत्पादन तंत्रज्ञान' याविषयी सविस्तर माहिती घेतली आणि जालगावच्या आदर्श अंगणवाडीला भेट देऊन बच्चे कंपनीशी मुक्तपणं संवाद साधला.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.