टॉप न्यूज

आमच्या गावात कोणतंही कलम मिळेल!

मुश्ताक खान, गव्हे, रत्नागिरी
कोणतीही फुलझाडं असोत नाहीतर फळझाडं... शेतकऱ्याला लागवड करायची म्हटलं तर उत्तम गुणवत्तेच्या रोपांची आणि कलमांची आवश्यकता भासते. ही रोपं आणि कलमं मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे नर्सरी. ठिकठिकाणी आपल्याला नर्सरी पाहायला मिळतात. मात्र दापोली तालुक्यातील एक आख्खं गाव नर्सरीचाच व्यवसाय करतं. त्यामुळंच गव्हे गावाला नावच पडलंय नर्सरीचं गाव. विशेष म्हणजे, इथल्या नर्सरीतून रोपं आणलीत म्हटल्यावर शेतकऱ्यांना काही काळजी नसते. रोपं चांगली जगणार आणि मोत्याची रास घरी येणार याची त्यांना खात्रीच असते.
 

narsury photo  8रत्नागिरी जिल्ह्यातलं गव्हे हे छोटंसं गाव. या गावाची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास आहे. पण इथल्या कष्टकरी ग्रामस्थांच्या सुप्तगुणांमुळं या गावानं आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. या गावातल्या घराघरातील प्रत्येक हात आंबा, काजू, कोकम, सोनचाफ्याची कलमं बांधण्याची कामं करत आहे. या वैशिष्ट्यामुळं या गावाला नर्सरींचं गाव म्हणून ओळखलं जातं.

 

कलमांना राज्यभरातून मागणी
या गावात २५ ते ३० नर्सरी उद्योजक आहेत. त्यापैकी अमृतेज नर्सरी आणि डॉ. कोपरकर्स नर्सरी या इथल्या मोठ्या नर्सरी आहेत. त्यांच्याच जोडीला इतर अनेक नर्सरी उद्योजक इथं आहेत, जे घरगुती पातळीवर हा व्यवसाय करत आहेत. या गावातले काही लोक एकत्रितपणं दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक प्रमाणात आंब्याची कलमं बांधतात. आंब्याच्या कलमांबरोबरच काजू, चिकू, पेरू, फणस, कोकम इत्यादी फळझाडांप्रमाणंच चाफा, जुई, जाई आदी फुलझाडांचीही कलमं मोठ्या प्रमाणावर इथं बांधली जातात. गव्हे गावच्या कलमांना राज्यभरातून आवर्जून मागणी आहे.

 

गावातच रोजगाराची निर्मिती
या गावात भरपूर प्रमाणात असलेल्या नर्सरींमुळं आणि घराघरांतून कलम बांधण्याचा व्यवसाय इथं मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं इथल्या गावकऱ्यांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळं जिल्ह्यातील इतर गावांपेक्षा या गावातील लोक स्वयंरोजगार करताहेत. गावातच रोजगार निर्माण झाल्यामुळं गावकऱ्यांच्या हातात पैसाही खेळू लागलाय. इथल्या नर्सरींमुळं गावातील अधिकाधिक लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटण्यास हातभारच लागलाय.

 

narsury photo  10नर्सरीसाठी पोषक वातावरण
कोकण प्रांत नर्सरी व्यवसायात देशात दादा होऊ शकतो असं म्हटलं जातं, याचं कारण इथलं वातावरण. कोकणचं वातावरण नर्सरी व्यवसायासाठी अत्यंत पोषक आहे. इथल्या वातावरणात प्रचंड आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आहे. एक प्रकारे कोकण हे नैसर्गिक ग्रीन हाऊसच आहे, असं मत सुहासिनी कोपरकर या नर्सरी व्यावसायिकेनं व्यक्त केलं. आंध्र प्रदेश हे राज्य सध्या नर्सरी व्यवसायात अग्रेसर आहे. त्याच आधारावर कोकणातही हा व्यवसाय वाढावा यासाठी सरकारनं विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असंही मत त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केलं.

 

नर्सरीचं प्रशिक्षण
नर्सरी व्यवसायात उडी घ्यायची असली वा हा व्यवसाय म्हणून करण्याचं जर कुणी ठरवत असेल त्याच्यासाठी गव्हे गाव हा उत्तम पर्याय आहे. नवोदितांना मार्गदर्शन करून नर्सरी उद्योजक घडवण्याचं काम गेल्या तीन दशकांपासून नर्सरी व्यावसायिक अरविंद अमृते हे करत आहेत. दर महिन्याला ते आपल्या नर्सरीत कार्यशाळा घेतात. त्याच्या कार्यशाळेत येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या गावात हा व्यवसाय सुरू करण्याच्या ईर्ष्येनंच परत जाते. अमृतेंनी हा व्यवसाय करण्यासाठी अनेकांना प्रेरणा दिलीय. त्यांच्या मनात जिद्दीची मशाल पेटवली आहे. ही ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारीही हे गाव योग्य प्रकारे पार पाडत आहे.

 

नर्सरी म्हटलं की फळझाडं, फुलझाडं, औषधी वनस्पती मिळण्याचं हमखास ठिकाण. ही झाडं तर इथल्या नर्सरींमध्ये मिळतातच, पण त्याचबरोबर इथं अशा अनेक जाती आहेत, ज्या एरवी आपल्याला बघायलाही मिळत नाहीत. त्यामुळं कोकणात आलात आणि तुम्हाला आवडणाऱ्या रोपांची निवड करायची असल्यास गव्हे गावाला नक्की भेट द्यायला विसरू नका. मग येताय ना, गव्हे गावात कलमं खरेदी करायला...!

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.