टॉप न्यूज

दिल्लीत मराठी ग्रंथोत्सव

ब्युरो रिपोर्ट, दिल्ली
महाराष्ट्र शासनाचं साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात नुकतंच दिल्ली ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी 'ग्रंथोत्सव' हा महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेला उपक्रम दिल्लीतील मराठी वाचक, तसंच वाचनसंस्कृतीला चालना देणारा प्रगतशील उपक्रम असल्याचं मानलं जातंय. या ग्रंथोत्सवामुळं तमाम दिल्लीकर पुस्तकप्रेमी मराठी वाचकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


Delhi Granthotsav2महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात दिल्ली ग्रंथोत्सवाचं उद्घाटन सिरपूरकर यांच्या हस्ते झालं. ग्रंथोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यामुळं दिल्लीतील वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असं सांगत कॉम्पिटिशन अपिलेट ट्रिब्यूनलचे चेअरमन न्या. व्ही. एस. सिरपूरकर यांनी दिल्लीकर पुस्तकप्रेमींना या ग्रंथोत्सवाला भेट देण्याचं आवाहन केलं. खासदार हुसेन दलवाई, निवासी आयुक्त बिपिन मल्लिक, दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक वानखडे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक मोहन राठोड यावेळी उपस्थित होते.


जगणं समृध्द करण्यात ग्रंथाचं महत्त्व
यावेळी सिरपूरकर म्हणाले की, माणसाचं जगणं समृध्द करण्यात ग्रंथांचं महत्त्वाचं योगदान आहे. पण आजच्या पिढीची ओढ संगणकाकडं आहे. वास्तविक संगणक केवळ आपणास माहिती देऊ शकतात, तर ग्रंथ हे विचार देतात. हे सद्विचारच माणसाचं जीवन समृध्द करतात. आजही काम करताना मला जेव्हा काही संदर्भ हवे असतात तेव्हा मी पुस्तकच जवळ करतो आणि मला मुबलक संदर्भ मिळतात, जे संगणकाद्वारे मिळवणं शक्य नाही. ग्रंथ हे विचारांचं स्रोत असतात आणि महाराष्ट्र शासनानं ग्रंथोत्सवाचं आयोजन करून दिल्लीकरांसाठी ज्ञानभंडार उपलब्ध करून दिलं आहे. दिल्लीकर वाचकांनी ग्रंथोत्सवाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.


महाराष्ट्र शासनाचा उपक्रम कौतुकास्पद
या उद्घाटन प्रसंगी खासदार हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, दिल्लीत एकाच छताखाली मराठी पुस्तक आणि ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. निवासी आयुक्त बिपिन मल्लिक यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, दिल्लीकर मराठी वाचकांना हव्या असलेल्या पुस्तकाच्या मागणीची नोंद केल्यास महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे संबंधित पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सदनाच्या संकेत स्थळावर दिल्लीकर मराठी बांधवांनी मोठ्या प्रमाणात नोंद करावी, असं आवाहन केलं. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीनं राज्यातील वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसंच रा. मो. हेजीब आणि अशोक वानखडे यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील वाचनसंस्कृतीचा आढावा घेत ग्रंथोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं.

 

खासदारांची माहिती असणार्‍या घडी पुस्तिकेचं लोकार्पण
निवासी आयुक्त बिपिन मल्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार्‍या महाराष्ट्र सदनातील खासदार कक्षाच्यावतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची माहिती असणार्‍या घडी पुस्तिकेचं लोकार्पण यावेळी न्या. व्ही. एस. सिरपूरकर आणि खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आलं. निवासी आयुक्त बिपिन मल्लिक, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक मोहन राठोड आणि परिचय केंद्राचे जनसंपर्क अधिकारी तथा खासदार कक्षाचे प्रभारी प्रवीण टाके यावेळी उपस्थित होते.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.