महिलांना रोजगार आणि आर्थिक प्राप्ती
दरवर्षीप्रमाणं यंदाही सातारा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या 'मानिनी जत्रा 2013'ला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे दहा लाख रुपये खर्चून चार दिवसीय या जत्रेत अगदी पुणे, कोल्हापूर, सांगली इथले महिला बचत गट सहभागी झाले होते. सॉफ्ट टॉईजपासून बांबू आर्टपर्यंतच्या शोभेच्या वस्तू, पापडापासून चटणीपर्यंतचे पदार्थ जिल्ह्यातील बहुतांश गटांनी विक्रीस आणले होते. बचत गटांचे शंभरहून अधिक स्टॉल्स लागल्यानं अनेक विविध प्रकारची आणि दर्जेदार उत्पादनं ग्राहकांना उपलब्ध झाली. चार दिवसांच्या मानिनी जत्रेमुळं जिल्ह्यातील महिलांना रोजगार आणि आर्थिक प्राप्ती झाली.
बहिणाबाई महिला बचत गटाचा सहभाग
सणासुदीला गावाकडं घरोघरी पुरणपोळीचा बेत असतो, तसंच महाराष्ट्रातील खान्देशी मांड्याचा करिष्मा सर्वांनाच ठाऊक आहे. साधी पोळी, पुरणाची पोळी, सुजीची पोळी, तेलावरची पोळी आणि खान्देशातील पुरणपोळीचे मांडे आदी विविध प्रकार असतात. सातारच्या या मानिनी जत्रेत मात्र खान्देशातील पुरणपोळीनं ग्राहकांवर जादू केली. राज्यातील प्रसिध्द अशा बचत गटाच्या जत्रा अर्थात दख्खन जत्रा, भीमथडी, कोल्हापुरी महालक्ष्मी, सातारची मानिनी जत्रा इत्यादी सर्व ठिकाणी खान्देशातील बहिणाबाई महिला बचत गटाचा सहभाग असतो.
अशी बनते खान्देशी पुरणपोळी
खान्देशी पुरणपोळी म्हणजेच मांडा तयार करायला खान्देशी खापरांची चूल महत्त्वाची असते.
ही चूल नेहमीच्या चुलीपेक्षा थोडीशी वेगळी असते. चुलीची धग व्यवस्थित लागावी यासाठी उभ्या पध्दतीनं विटा ठेवल्या जातात. मग त्यावर खापर ठेवलं जातं. हे खास खापर मालेगाव, सटाणा भागात तयार केलं जातं. यामध्ये निर्माण होणाऱ्या वाफेवर पुरणपोळी भाजली जाते. त्यामुळं मांडे खूपच चविष्ट होतात, गव्हाचं पीठ - सोजीचा वापर करून ही खान्देशी पुरणपोळी तयार होते. अशा चविष्ट मांडेची व्रिकी करत बहिणाबाई महिला बचत गटाची दरवर्षी दहा ते बारा लाखांची उलाढाल होते, त्यातील प्रत्येक सदस्य महिलेला एक लाख रुपये मिळतात.
विविध ठिकाणच्या खास गोष्टी जत्रेमध्ये दाखल
अनेक महिला बचत गटांनी तर महाबळेश्वरची जॅम आणि जेली, पाटणमधील नैसर्गिक मध, कराड तालुक्यातील मांडवी, कोल्हापूरची मातीची भांडी, माणमधील माग, खान्देशी मांडे, सुप्रसिध्द हातसडीचे तांदूळ, सोलापूर चादर आणि घोंगडी, गूळ, काकवी, मेतकूट, गहू भरडा, नाचणीची उत्पादनं विक्रीला ठेवलेली होती.
पारंपरिक गोष्टींसह आधुनिक उत्पादनं विक्रीला
बचत गटांची राज्यात सुमारे अडीच लाखांपेक्षाही जास्त बचत गटांची संख्या आहे आणि सातारा जिल्ह्यात 35 हजार बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकी 2800 बचत गट अतिशय क्रियाशील आहेत. चोखंदळ रसिकांना खास मेजवानीसाठी लोणची, पापड, शेवया, बिर्याणी, मटण, पांढरा रस्सा, लस्सी, ताक, चहा आदी विविध खाद्यपदार्थांचे महिलांनी स्टॅाल लावलेले होते. पण आता या पारंपरिक पदार्थांच्या उत्पादनातही हळूहळू बदल होताना दिसतोय. आकर्षक कागदी वस्तू, कागदी टेडिबेअर, फॅन्सी कपडे, मसाले, सौदर्य प्रसाधनं, चपला, गृहोपयोगी वस्तू अशा तऱ्हेतऱ्हेच्या आधुनिक गोष्टीसुध्दा ठेवलेल्या होत्या. या मानिनी जत्रेमुळं महिलांच्या उत्पादनाला एक योग्य अशी बाजारपेठ लाभली.
Comments
- No comments found