टॉप न्यूज

आवाज उठू लागला...फ्लेमिंगोंसाठी!

ब्युरो रिपोर्ट, शिवडी, मुंबई
फ्लेमिंगो पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळावा, यासाठी आता आवाज उठू लागलाय. मुंबईत शिवडी जेट्टीवर नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो फेस्टिव्हलमध्ये प्रस्तावित शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतू शिवडीच्या बाजूनं ५०० मीटर दक्षिणेकडं हलवण्याची मागणी करण्यात आली. तर राज्यभरातील अधिवास असणारी ठिकाणं फ्लेमिंगोंसाठी सुरक्षित ठेवा, तसंच त्यांच्या शिकारीवर निर्बंध घाला, अशी एकमुखी मागणीही यावेळी पक्षीप्रेमींनी केली.
 
दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागायला लागली की फ्लेमिंगोंचे म्हणजेच रोहित पक्ष्यांचे थवे राज्यात येतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यासह पुण्याजवळील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माणमधील तलाव, विदर्भातील गोंदियाजवळचा नवेबांधगाव तलाव, अशा बऱ्याच ठिकाणी फ्लेमिंगो येतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही त्यांची हक्कांची ठिकाणं झाली आहेत. ते येतात. घरटी करतात. मजेत राहतात. दोघाचे तीन-चार होतात आणि मग चक्क चिल्यापिल्यांसह मायभूमीत रवाना होतात. त्यामुळंच सीमारेषेत जगणाऱ्या माणसांनी विकास करताना या पाहुण्यांच्या जगण्याचा विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागलीय.

  

falmingo 1मुंबईतील फ्लेमिंगो फेस्टिव्हल
बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी)तर्फे आज शिवडी जेट्टीवर फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. रणरणतं ऊन, धूळ आणि गर्दी असूनही आज लहानथोर मुंबईकर मोठ्या संख्येनं जमले होते. समुद्रावर विहरणारे असंख्य फ्लेमिंगो पाहून जणू समुद्रावर गुलाबी सौंदर्यवती जलविहार करत असल्याचा भास होत होता. पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात झेपावल्यानंतर त्यांना मराठीत अग्निशिखा हे नाव किती चपखल लागू होतं, याची प्रचीतीही सर्वांना आली. फ्लेमिंगोच्या पुतळ्याचं अनावरण करून या फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं! यावेळी बीएनएचएस कर्मचारी, शास्त्रज्ञ, सभासद, पक्षीप्रेमी, सरकारी अधिकारी, प्रसिद्धिमाध्यमं आणि अन्य निसर्गप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांची आता फ्लेमिंगोशी मैत्री होत असल्याची प्रचीती इथल्या गर्दीवरून येते. मुंबईसह राज्यातील चिखलाची मैदानं, खारफुटी आणि खाड्या, तळी, धरणांचं पाणलोट क्षेत्र, आदी महत्त्वपूर्ण फ्लेमिंगोंच्या अधिवासाची ठिकाणं त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवली पाहिजेत. विकासाचा विचार करताना त्यांच्या या अधिवासांचा आपण विचार करायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी बीएनएचएसचे संचालक डॉ. असद रहमानी यांनी मांडला.

 

Flamingo 4.pngगुलाबी सागर
अरबी समुद्राच्या बाजूलाच जवळजवळ १५,००० धाकट्या आणि थोरल्या फ्लेमिंगोंचा गुलाबी सागर दिसत होता. किनाऱ्यावरील चिखलाच्या मैदानांवर हे पक्षी आपलं खाद्य शोधण्यात मग्न होते. पाठीमागे ट्रॉम्बेपर्यंत पसरलेली गच्च हिरवी खारफुटी आणि माहुलमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प तसंच ऊर्जा प्रकल्प दिसत होते. फ्लेमिंगोंच्या डौलदार हालचाली आणि त्यांच्या लांबसडक बाकदार माना अतिशय सुंदर दिसत होत्या. ते उडतानाचं दृश्य तर रमणीय होतं. फ्लेमिंगोंव्यतिरिक्त या ठिकाणी बगळे, वंचक, शराटी, सुरय, कुरल, समुद्रपक्षी, खंड्या आणि अन्य पाणपक्ष्यांच्या विविध जातीसुद्धा दिसतात. या विहंगांची आणि फ्लेमिंगोंच्या पुतळ्यासोबत स्वतःची छायाचित्रं काढण्यात आलेले सर्व जण दंग झाले होते.

 

Flamingo 12.pngप्रबोधन आणि संवर्धन
लोकांना पक्ष्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास आणि त्यांना संभवणारे धोके यांची माहिती द्यायला बीएनएचएसची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणी आणि स्पॉटिंग स्कोपच्या साहाय्यानं पक्ष्यांना बघणं ही एक पर्वणीच होती. मनसोक्त पक्षी पाहण्याव्यतिरिक्त या ठिकाणी बीएनएचएसचं रोहितवरचं छायाचित्र आणि माहिती प्रदर्शन, तसंच चेहरा रंगवणं, पक्षी टॅटू आणि ‘आपल्या पंखांची लांबी मोजा’ असे लहान मुलांकरता असलेले उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून घेत होतं. बीएनएचएसची वन्यजीवविषयक पुस्तकं आणि अन्य शैक्षणिक सामग्री लोकांच्या पसंतीस उतरत होती. कॉर्पोरेट क्षेत्र आणि चित्रपट जगत यांतील मान्यवरांनीसुद्धा आपली उपस्थिती यावेळी लावली.

 

Flamingo 9.pngफ्लेमिंगोबाबत शास्त्रीय माहिती
फ्लेमिंगो पक्ष्याचं शास्त्रीय नाव : फिनिकोप्टेरस (Phoenicopterus) फिनिकोपारस (Phoenicoparrus) असं आहे. इंग्लिशमध्ये याला फ्लेमिंगो (Flamingo) म्हणतात. हा पाणथळ जागी थव्यानं राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान आणि लांब पाय असलेल्या रोहितची पिसं गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. हा पक्षी मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. हजारोंच्या संख्येने यांचे मोठमोठे थवे आढळून येतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडात आढळतात. भारतातही हा विपुल प्रमाणात आढळतो.

 

Flamingo 22.pngभारतातील स्थान
बहुतांश फ्लेमिंगो कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. कच्छच्या रणामध्ये पावसाळ्यात गुडघाभर उथळ पाणी जमतं, अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात हे आपली अंडी घालतात आणि पिल्लांना वाढवतात. इथं पाणी आणि ऊन पुष्कळ असल्यानं त्यांना भरपूर खाद्य उपलब्ध असतं. त्यामुळं पिल्लांचं पालनपोषण चांगलं होतं. तसंच कच्छचं रण मानवी वावरापासून दूर असल्यानं त्यांची वाढ व्यवस्थित होते. आफ्रिकेतही व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये फ्लेमिंगो पक्ष्याची वसतिस्थानं आहेत.

 

Flamingo 17.pngफ्लेमिंगोची चोच
पावसाळ्यानंतर कच्छमधील पाणी आटल्यावर फ्लेमिंगो स्थलांतर करतात आणि देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात फ्लेमिंगोंना पोषक अशा उथळ जागा आहेत. तिथं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही हे बऱ्याचदा आढळतात.

 

फ्लेमिंगोचं खाद्य
काही विशिष्ट प्रकारचं शेवाळ खाल्ल्यामुळं यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते, हे या पक्ष्याचं वैशिष्ट्य आहे. फ्लेमिंगोची चोचही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळं या पक्ष्याला चिखलामधील खाणं शोधणं अतिशय सोपं जातं. याच चोचीच्या मदतीनं ते चिखलात घरटंदेखील बनवतात. यांचं प्रमुख खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती आणि शेवाळ हे होय.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.