राज्यातील सुमारे ११५ तालुक्यांत सध्या दुष्काळ आहे. यावेळचा दुष्काळ १९७२ सालापेक्षाही गंभीर असल्याचं दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळं पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. म्हणूनच गोदरेज कंपनीनं 'वॉटर कॉन्क्लेव्ह' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कंपनीच्या विक्रोळी येथील मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार, रेन वॉटर क्लबचे संस्थापक एस. विश्वनाथ, जैन इरिगेशनच्या अॅग्री आणि फूड विभागाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
जलसंधारणाचा नामी उपाय
दरवेळी पाऊस पडतो, आपण त्याचं पाणी साठवतो, साठवलेल्या पाण्याचं नियोजनही करतो;
पण पाऊस लांबला की साहजिकच हे नियोजनही कोलमडतं. मग सुरू होतो पाण्यासाठी संघर्ष. या संघर्षावरचं एकमेव उत्तर म्हणजे जलसंधारण. पावसाला गृहीत धरणं आता थांबवलं पाहिजे आणि पाण्याचा थेंबन् थेंब साठवून ठेवला पाहिजे, यावर सर्वच मान्यवरांनी जोर दिला.
हसत-खेळत पाणी वाचवा - पवार
माणसाला जगायला आणि म्हटलं तर चैन करायला कितीसं पाणी लागतं वो? प्रत्येकानं फक्त मनात आणलं पाहिजे, मग काहीच अवघड नाही. आपण सर्व जण हसत-खेळत पाणी वाचवू शकतो, असं पोपटराव पवार यांनी सांगितलं. त्यांनी हिवरे बाजारमध्ये पाणी साठवण्याचे, तसंच वाचवण्याचे जे प्रयोग केलेत, त्याचीही माहिती दिली. अगदी बागेतील मुलांच्या खेळण्याच्या उपकरणांचा कल्पकतेनं वापर करून पाणी कसं वाचवलं, याची मनोरंजक माहितीही त्यांनी दिली.
पाण्याचं योग्य व्यवस्थापन करा - दिलीप कुलकर्णी
एकूण पाण्याच्या साठ्यातील जवळजवळ ८0 टक्के पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं, त्यामुळं पाण्याचं योग्य व्यवस्थापन करूनच पाणी वापरलं गेलं पाहिजे, यावर जैन इरिगेशनच्या अॅग्री आणि फूड विभागाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी भर दिला. शेतीमध्ये ठिबक सिंचनासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईलच, शिवाय उत्पादनातही चांगली वाढ होईल, हे त्यांनी प्रगत देशातील उदाहरण देऊन स्पष्ट केलं.
रेन वॉटर क्लबचे संस्थापक एस. विश्वनाथ यांनी मुख्यतः शहरी भागातील पाणी प्रश्नावर प्रकाशझोत टाकला. शहरातील पाण्याच्या प्रश्नावर 'ओपन वॉटर व्हेल्स' हा एक उत्कृष्ट उपाय म्हणून आपण वापरू शकतो. ओपन व्हेल्समुळं आपल्याला भूजल पातळीचंही ज्ञान होतं, असंही त्यांनी सांगितलं.
परिसंवादातील ठळक मुद्दे
पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस उग्र होत असतानाच जागतिक लोकसंख्येत दरवर्षी आठ कोटींची भर पडतेय. त्यामुळं पाण्याची गरजही ६४ हजार अब्ज लिटरनं वाढत चाललीय. पाण्याच्या वाढत्या गरजेमुळं दररोज एक अब्ज २० कोटी लोक पाण्यासाठी संघर्ष करताहेत. १९०० सालापासून आतापर्यंत जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त वेटलॅण्ड (जलसाठे) संपत चालले आहेत.
दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाचे पर्याय
1. दुष्काळाकडं संधी म्हणून पाहायची गरज :
दुष्काळाच्या निमित्तानं बराचसा निधी हा गावाकडं येत असतो. त्यामुळं गावातील प्रमुख लोकांनी याकडं एक संधी म्हणून पाहिलं तर कोणतंही गाव दुष्काळातून बाहेर पडायला मदत होईल.
2. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पीकपाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसं झाल्यास दुष्काळाच्या झळांची तीव्रता कमी होईल.
3. 'ड्रीप इरिगेशन'चा वापर - ड्रीप इरिगेशनचा अधिकाधिक वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून पाण्याची नासाडी कमी होईल. गावकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी राज्यकर्त्यांवर अवलंबून राहू नये, तर स्वतः आपल्या गावात पुढाकार घेऊन काम करावं.
4. रेन वॅाटर हार्वेस्टिंग :
रेन वॅाटर हार्वेस्टिंग करून पाणी जमा करणं खूपच महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त रेन वॅाटर हार्वेस्टिंग केल्यामुळं दुष्काळग्रस्त काळात पाण्याचा तुटवडा कमी होण्यास निश्चित मदत होईल.
पाणी बचतीचे सोपे घरगुती उपाय
बादलीत पाणी घेऊन आंघोळ केली, तर १८ लिटर पाणी लागतं, पण शॉवरखाली आंघोळ केली, तर कमीत कमी १०० लिटर पाणी वापरलं जातं.
नळ सुरू ठेवून ब्रश केला, तर चक्क १० लिटर पाणी लागतं. तेच तुम्ही मगमध्ये पाणी घेऊन दात स्वच्छ केले, तर अवघ्या एक लिटरमध्ये काम होतं.
वाहत्या नळाखाली कपडे धुण्यासाठी ११६ लिटर पाणी लागतं आणि बादलीचा वापर केला, तर ३६ लिटरमध्ये काम होतं. म्हणजे या छोट्या गोष्टीमुळं चक्क 80 लिटर पाण्याची बचत होते.
मोटार धुण्यासाठी पाईपचा वापर केला, तर १०० लिटर पाणी लागतं; परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली, तर १८ लिटरमध्ये काम होतं.
वाहत्या नळाखाली हात धुतले, तर १० लिटर पाणी वापरलं जातं; पण त्याएवजी मगमध्ये पाणी घेऊन हात धुतले, तर अर्ध्या लिटरचं पाणी लागतं.
घरगुती कामासाठी अशा पाणी बचतीचा अवलंब केला, तर प्रत्येक व्यक्तीला ८०.५ लिटर पाणी पुरवठ्याला येईल. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीमागं आपण २८५.५ लिटर पाण्याची बचत करू शकतो.
(संदर्भ : केंद्र सरकारच्या केंद्रीय पाणी आयोगाची पाण्याच्या लेखापरीक्षणविषयक नियमावली)
Comments
- No comments found