सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारच्या तालीम संघ मैदानावर नुकताच हा माणदेशी महोत्सव संपन्न झाला. त्याला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढता प्रतिसाद लक्षात घेता 'माणदेशी मार्केटिंग फेस्टिव्हल' या नावातच आता 'माणदेशी' उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करण्याची संकल्पना रुजू लागलीय.
घोंगडी, जानला वाढती मागणी
या महोत्सवात माणदेशी उत्पादनांच्या विक्रीसाठी सुमारे नव्वद स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये घोंगडी, जानचे दोन स्टॉल लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत घोंगडी, जान विक्री केली जाते आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. अडीचशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत नक्षीकाम केलेल्या, तसंच लोकरीच्या दर्जानुसार त्यांच्या किमती होत्या. दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांना जोंधळे, बाजरीसाठी पाणी उपलब्ध झालं होतं, त्यांनी धान्य विक्रीस ठेवलं होतं, चाळीस रुपये किलोनं ज्वारी विकली जात होती. काही स्टॉलवर संसारोपयोगी लाकडी वस्तू होत्या. त्यात लाटणं, पोळपाट, पापडाची लाटणी, लाकडी उलताणं या वस्तू होत्या. त्यांच्या किमती पन्नास ते शंभर रुपये याप्रमाणं होत्या. अनेकांनी विविध प्रकारच्या चटण्या, मसाल्याचे पदार्थ विक्रीस ठेवले होते. काही महिलांनी तयार कपडे विक्रीस ठेवले होते. त्याचप्रमाणं काही महिलांनी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या उपयुक्त वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. त्यात अगदी गव्हाच्या पिठापासून ते विविध डाळींच्या पिठापासून बनवलेल्या डांगरसारख्या पारंपरिक खाद्यपर्दार्थांचाही समावेश होता.
दोन कोटींची उलाढाल
तीव्र उन्हामुळं दिवसा या महोत्सवास ग्राहकांचा प्रतिसाद फार कमी असायचा, पण सायंकाळी मात्र प्रचंड गर्दीनं महोत्सव फुलून जायचा. या महोत्सवात गतवर्षी आर्थिक उलाढाल एक कोटीची होती. यावेळी ती सुमारे दुप्पट म्हणजेच दोन कोटींवर गेली. त्यामुळं छोट्या कारागिरांना चांगलाच हात मिळाला. असं अश्पाक मुल्ला यांनी सांगितलं.
माणदेशी फाऊंडेशन
कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या महिलांना दिशा देण्याची गरज होती. त्यासाठी चेतना सिन्हा यांनी माणदेशी महिला बॅंकेची स्थापना केली. परिसरातील वाड्यावस्तीत राहणाऱ्या महिलांची बैठक घेतली. बचत गटाची स्थापना करून त्यांना बॅंकेमार्फत अर्थसाहाय्य केलं. दोन-तीन शेळ्या खरेदी करून त्यांची विक्री करून फायदा मिळवण्याची कला महिलांना शिकवण्यात आली. दोरखंड तयार करणं, पत्रावळी, द्रोण बनवणं, मडकी, डेरा, खेळणी बनवणं, पापड, लोणची, चटण्या तयार करणं, आदी व्यवसाय माण तालुक्यातील महिला करू लागल्यात. त्यामागं माणदेशी फाऊंडेशनचं योगदान महत्त्वाचं ठरलंय. त्यामुळंच दुष्काळी माण तालुक्यातील सामान्य माणसांना आधार देणारं फाऊंडेशन म्हणून माणदेशी फाऊंडेशनची ख्याती झालीय. सुमारे तीस हजार महिलांना छोटे व्यवसाय करण्यांची संधी, अल्पबचत करण्याची शिकवण चेअरमन चेतना सिन्हा यांनी दिलीय.
ओबामांनी दिली शाबासकी
फाऊंडेशनच्या कार्याची दखल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही घेतलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या या फाऊंडेशननं म्हसवड इथं आशिया खंडातील सर्वात मोठी चारा छावणी सरकारच्या मदतीनं सुरू केलीय. जनावरांना चारा पुरवणं, पाणी देणं, ही कामंही दुष्काळात माणदेशी फाऊंडेशन करीत आहे.
Comments (1)
-
आदरणीय चेतना सिन्हा यांनी घेतलेला हा वसा आदर्श तथा अनुकरण प्रिय आहे .
समाजातील वंचित लोकांना मानाचे स्थान ,त्यांच्या कष्टाची जाण ,समाजाला व्हावी म्हणून त्यांनी स्वतः खूप खूप कष्ट घेतले आहेत .म्हणूनच माझा त्यांना सविनय नमस्कार.धन्यवाद चेतना ताई !