टॉप न्यूज

आठवणीतला कृष्णाकाठ!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. कराडमधील कृष्णाकाठच्या त्यांच्या समाधीस्थळासह राज्यभरात त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन केलं जातंय. कृष्णाकाठच्या कुशीत घडलेलं निर्मळ, निःस्वार्थी, निष्कलंक आणि निरलस असं हे व्यक्तिमत्त्व! यशवंतरावांनी जसा महाराष्ट्र घडवला तसाच देशही! हिमालयाच्या रक्षणाकरता सह्याद्री धावला... असं त्यांचं केलं जाणारं वर्णन याचीच साक्ष देतं. पुस्तकं आणि माणसांचा संग्रह हाच त्यांचा विरंगुळा आणि संपत्तीही. माणूस म्हणून ते किती थोर होते, याबाबत त्यांच्या सुहृद्यांनी सांगितलेल्या काही आठवणी, 'भारत4इंडिया'च्या वाचकांसाठी...
 

YSH 5भाऊ मानलं आणि नातं पेललंही
यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं नातं जीवाभावाचं! यशवंतरावांनी पत्नी वेणूताई हिच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा मौलिक खजिनाही रामभाऊंकडेच सुपूर्द केलाय. रामभाऊंनीही यशवंतरावांच्या संबंधित सर्व वैचारिक धन तेवढ्याच निःस्वार्थीपणे पुस्तकरूपानं मराठी माणसांपुढं ठेवलंय. 91 वर्षांच्या रामभाऊंनी जागवलेल्या आठवणी...

 

माझा यशवंतरावांशी खूप निकटचा ऋणानुबंध होता. 35-40 वर्षं मी त्यांच्याबरोबर देशात, परदेशात, विमानानं फिरलो. दिल्लीत त्यांच्या बंगल्यात राहिलो. या प्रवासात मला दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. ते चारित्र्यवान होतेच, शिवाय माणूस म्हणून खूप मोठे होते.YASHAWANT2230 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी वयाची 61 वर्षं पूर्ण केली म्हणून यशवंतरावांची कर्मभूमी असलेल्या कराडात माझ्या नागरी सत्काराचा कार्यक्रम झाला. कराड नगरपालिका शिक्षण संस्था आणि समस्त कराडकर नागरिकांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी अर्थातच केंद्रात मंत्री असलेल्या यशवंतरावांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, संभाजीराव थोरात आदी कराडातील ज्येष्ठ मंडळीही व्यासपीठावर उपस्थित होती. कार्यक्रमावेळी मी त्यांना म्हणालो, सत्कारानंतर मी अगोदर भाषण करतो नंतर तुम्ही बोला. त्यावर त्यांनी सभाशास्त्राप्रमाणं तुमचं भाषण शेवटी पाहिजे, असं सांगितलं. त्यावर मी त्यांना तुमचं भाषण झाल्यावर माझं भाषण ऐकायला कोण थांबणार, असा प्रश्न केला. त्यानंतर माझ्या भाषणानंतर ते बोलायला उभे राहिले.

 


यशवंतराव म्हणाले, ''रामभाऊ पत्रकार आहेत म्हणून मी इथं आलोय, असं समजू नका. आम्ही तीन भाऊ. त्यातील दोघांचं निधन झालं. देशाचं, समाजाचं मोठेपण सांभाळता येतं, परंतु कुटुंबातील लहान माणसाला कुटुंबातील मोठेपण सांभाळता येत नाही, हा माझा अनुभव आहे. रामभाऊंचाही तोच अनुभव आहे. त्यांचेही दोन भाऊ निर्वतलेत. मला धाकटा भाऊ नाही, रामभाऊंना मोठा भाऊ नाही. मी त्यांना धाकटा भाऊ म्हणून पूर्वीच स्वीकारलं आहे. त्यांनी मला भाऊ म्हणून स्वीकारावं म्हणून मी इथं आलोय.'' त्यांचे हे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

 

"त्यांचं माझं रक्ताचं नातं नाही. मी ब्राह्मण ते मराठा. ते देशाचे नेते, मी सामान्य पत्रकार. असं असताना त्यांनी केवळ ऋणानुबंधातून मला हा मोठेपणा बहाल केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा.”

 

YSH 4नातं असं सांभाळलं...
त्यानंतरच्या काळात हे बंधुप्रेमाचं नातं पेलणं अवघड होतं. आम्ही दोघांनीही ते पेललं, सांभाळलं. त्यांनी नातं कसं सांभाळलं, याचा हा हृद्य प्रसंग...
1971-72 मध्ये माझा अपघात झाला. पुण्यात 'केसरी'च्या कार्यालयातून रात्रपाळी करून घरी परतत असताना माझ्या स्कूटरला अॅम्बॅसिडरनं धडक दिली. मी 35 फुटांवर जाऊन बेशुद्ध पडलो. पाहणाऱ्यांत मला ओळखणारे होते. त्यांनी 'केसरी'त फोन करून माहिती दिली आणि मला उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल केलं. तीन दिवस मी बेशुद्ध होतो. याच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. त्यामुळं यशवंतरावांनाही ते समजलं. त्यानंतर त्यांचे खाजगी साहाय्यक डोंगरे यांनी घरी फोन करून घटनेची खात्री करून घेतली आणि यशवंतराव खास विमानानं मला भेटायला ससूनमध्ये आले. सुमारे तासभर थांबले. माझ्या प्रकृतीची आणि उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली. माझी, पत्नीची आस्थेनं विचारपूस केली. दिल्लीला परतताना मुंबईत थांबून त्यांनी ओळखीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना ससूनमध्ये जाऊन माझी तपासणी करायला सांगितलं. त्याप्रमाणं तज्ज्ञ डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली. माझी तब्येत चांगली असून भीतीचं काहीच कारण नसल्याचा निर्वाळा त्यांना दिला. नंतर मी ससूनमधून घरी परतलो. त्यावेळी मी पूर्ण बरा होईपर्यंत ते रोज सायंकाळी दिल्लीहून फोन करून माझी आस्थेनं विचारपूस करीत. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी त्यांना एवढं करण्याची काय गरज होती? पण त्यांनी भावाचं नातं सांभाळलं. त्यांच्यासारखी माणसं मनानं मोठी असतात.

 

शेवटची ठेव 36 हजारांची...
ते गेले 25 नोव्हेंबर 1984 रोजी. माझं त्यांच्याशी फोनवर शेवटचं बोलणं झालं 19 नोव्हेंबरला. त्यावेळी निवडणुकांचं वारं होतं. ते मला म्हणाले, ''मी 25 तारखेला पुण्याला येणार, 26 ला साताऱ्यात अर्ज भरायला जाणारेय.'' आणि अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली. वेणूताईंच्या निधनानं ते पुरते खचले होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेला हा माणूस. एवढी सत्तास्थानं भूषवलेल्या या माणसानं आपल्यामागं केवळ विचारधनच ठेवलं. महाराष्ट्रात कुठंही त्यांचं घर, फ्लॅट, जमीनजुमला असं काही नाही. सहकारी कारखानदारीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मात्र, कुठल्याही कारखान्यात त्यांची भागीदारी नाही, की कुठं, कशात म्हणून मालकी नाही. त्यांना मिळणारी पेन्शन, भत्ते, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा होत. निधनानंतर त्या खात्यात केवळ 36 हजाराची शिल्लक होती. बंगल्यातील कपाटात काहीही संपत्ती मिळाली नाही, असंही रामभाऊ जोशी यांनी आवर्जून सांगितलं.

 

YSH 6जे आहोत ते यशवंतरावांमुळंच – शरद पवार
आपण आज जे कोणी आहोत, जे काही घडलो त्याचं सारं श्रेय यशवंतरावांना जातं, असं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जाहीरपणं मान्य करतात. यशवंतरावांचा सहवास हा मोठा ठेवा आहे. महाविद्यालयात सरचिटणीस असताना यशवंतराव मुख्यमंत्री होते. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मी प्रथमच प्रास्ताविक केलं. या भाषणानं प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी कार्यक्रम संपल्यानंतर माझी चौकशी केली आणि व्यापक क्षेत्रात काम करत राहा, असा मौलिक सल्ला दिला. त्यानंतर एकदा बारामतीला आले असताना यशवंतरावांनी माझ्या आईला, तुम्हाला सात मुलं आहेत, शरदला माझ्याकडं सोपवा, अशी मागणी केली. त्याला राजकारणात रस असेल तर माझी हरकत नाही, असं आईनंही सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला मुंबईत बोलावून घेतलं आणि टिळक भवनात राहण्याची सोयही केली. तेव्हापासून मी यशवंतरावांच्या सोबत काम सुरू केलं. आज मी जो कोणी आहे, ते साहेबांमुळंच!

 

वेणूताई...
यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्र ग्रंथाची अर्पणपत्रिका वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत.
''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...''

 

YSH 1वेणूताईंचं स्मारक म्हणजे ज्ञानभंडार
वेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या योग्य अशा स्मारकासाठी कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमाच्या ठिकाणी म्हणजे कराड इथं, 'सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ची स्थापना स्वत: यशवंतरावांनी केलीय. तिथले ग्रंथ चाळताना यशवंतरावांच्या वाङ्‌मयीन अभिरुचीचं, त्यांच्या अभ्यासूवृत्तीचं स्तिमित करणारं दर्शन होतं. या ग्रंथसंग्रहातील बहुतेक सर्व पुस्तकं त्यांनी वाचलीत. सुमारे ४० टक्के पुस्तकं त्यांनी अभ्यासल्याचं दिसून येतं. कारण त्यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांवर केलेल्या टीका-टिप्पणी किंवा महत्त्वाच्या ओळीखाली केलेलं अधोरेखन, परिच्छेदांना केलेल्या चौकटी यांचे निर्देश आहेत. यातील बहुतांश पुस्तकं त्यांनी स्वत: खरेदी केलेली आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथांवर विकत घेतल्याची तारीख, ठिकाण याची नोंद करून त्यावर त्यांनी आपली स्वाक्षरीही केलेली आहे.

 

यशवंत राजकारणी

Fullscreen capture 12-03-2013 163012.bmpयशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राज्य सरकारात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून स्थान मिळवलं आणि पुढं विशाल द्वैभाषिकांचे आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले. एवढंच नव्हे, तर नंतर नोव्हेंबर १९६२ मध्ये झालेल्या चीनच्या आक्रमण प्रसंगी पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर १९८०पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात निरनिराळ्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर किंवा त्यापूर्वीही काही काळ ते भारताच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही होते. १९६४ मध्ये 'इंटरनॅशनल अफेअर्स' या अमेरिकन राजकीय मासिकानं ‘जगातल्या जाणत्या नेतृत्वाचे वारस कोण?' असा विषय घेऊन अभ्यासपूर्ण अंदाज वर्तवले होते. त्यात भारताच्या राजकारणाचाही अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले होते. भारतासंबंधी लिहिताना, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांच्या नावांची चिकित्सा करून झाल्यावर लेखक म्हणतो, ''हे सर्व लिहून चौथ्या क्रमांकाचा विचार करताना भारताच्या संभाव्य पंतप्रधानाच्या यादीतून यशवंतराव चव्हाण यांचं नाव वगळणं चुकीचं ठरेल. त्यांच्या धोरणातला समतोल, त्यांच्या साधेपणात भरलेलं आकर्षण, सदैव कार्यक्षम असलेलं मन आणि मराठी मातीचं आकर्षण हे त्यांचे गुण महत्त्वपूर्ण आहेत.” असा अभिप्राय या मासिकात व्यक्त झाला आहे.

 

YSH 3अशीही एक आठवण...
भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या आईनं वर्तमानपत्रात वाचकांच्या पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण यांनी त्या माहिलेला निवृत्ती वेतन मिळण्याची तजवीज केली होती.

 


'यशवंतरावांनी ' कृष्णाकाठ'सारखं नितांत सुंदर आत्मचरित्र लिहिलं. ते राजकारणात नसते तर मोठे साहित्यिक झाले असते.' - भालचंद्र नेमाडे

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.