टॉप न्यूज

माणदेशी महोत्सवात धनगरी बाज

शशिकांत कोरे, सातारा
गजनृत्य... धनगरी समाजाचं पारंपरिक नृत्य. मेंढरामागं धावत धावत जीवन उभं करणाऱ्या धनगर समाजाचा हाच एक हक्काचा विरंगुळा. पावसाळ्याच्या चार महिन्यात गावी असलेल्या धनगरांची पावलं सायंकाळी मेंढरांना वाड्यात कोंडलं की ढोलाच्या आवाजाच्या दिशेनं पडतात. मग सुरू होतं गजनृत्य आणि 'सुंभरानं मांडलं गा, सुंभरानं माडलं,' चा घोष! धनगरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणारं हे गजनृत्य आता माणदेशातील सर्व जातीधर्माची शाळकरी मुलं पुढं नेतायत. असंख्य हालअपेष्टा सहन करून कलेसाठी सुरू असणारी त्यांची धडपड पाहून सदाशिव अमरापूरकरसारख्या कसलेल्या अभिनेत्यालाही अश्रू आवरणं कठीण गेलं.  
 


Gajnrutya 7.png माणदेशात छोट्या-छोट्या 'बनगरवाड्या' बहुसंख्येनं आहेत. त्यामुळं धनगर समाज इथं एकवटलेला आहे. त्यामुळं माणदेशी महोत्सवाला धनगरी बाज नसता तरचं नवल. नुकताच हा महोत्सव सातारच्या तालीम संघाच्या मैदानावर पार पडला. इथं रोज रात्री माणदेशातील कलांचं सादरीकरण व्हायचं. पण सर्वाधिक पसंती मिळाली ती गजनृत्य सादरीकरणालाच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह सदाशिव अमरापूरकर यावेळी उपस्थित होते.

 

पोरं करतायत संस्कृतीचं जतन
दुष्काळी माण तालुक्यातील माणसांना दुष्काळ काही नवीन नाही, लहानपणापासूनच पाण्यासाठी वणवण, अनवाणी फिरण्याची सवय या मातीतील विद्यार्थ्यांनाही झालीय. सकाळी चारा छावणीत जाऊन जनावरांना चारा टाकायचा, बाची भाकरं घेऊन जाणाऱ्या या पोरांना जीवनाचा अर्थ समजू लागलाय. समता शिक्षण संस्था, टाकेवाडी या संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील मुलांनी शिक्षण घेता घेता पारंपरिक कला जोपासलीय.

 

Gajnrutya 19.pngसमता शिक्षण संस्थेची मुलं
माण तालुक्यातील टाकेवाडी इथल्या समता शिक्षण संस्थेच्या चेअरमन सोनिया गोरे आणि मुख्याध्यापक नदाफ यांनी शाळेतील सत्तावीस मुलांची या गजनृत्य पथकासाठी निवड केली. शाळेत त्यांना ढोलावर ठेका कसा घ्यायचा हे शिकवण्यात आलं. यासाठी शिक्षक शिवाजी दडस आणि रवींद्र भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

 


काय आहे गजनृत्य...

मेंढपाळ म्हणजेच धनगरी समाज हा नृत्य प्रकार सादर करतात. धनगर मेंढी, बकर्‍या यांचे कळप पाळतात आणि तेच त्यांच्या दैनंदिन जीवनाचं साधन असतं. त्यांचं जीवन सदाहरित हिरवी झाडं, निसर्ग यातूनच प्रेरित झालेलं असतं आणि ते ओव्यांच्या रूपानं त्यांच्या ओठी येतं. या सर्व कविता बर्‍याचदा त्यांचं दैवत सतोबा याच्याशी संबंधित वर्णन करणाऱ्या असतात. धनगरी नृत्य ही त्यांची पूजा आहे. म्हणजे हा समाज आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धनगरी गाजा सादर करतात. हे नृत्य गोलाकार फेर धरून ढोलाच्या तालावर केलं जातं.

 

Gajnrutya 25.pngपारंपरिक वेशभूषा
या गजनृत्यासाठी धनगरी पारंपरिक वेशभूषा वापरली जाते. पायात घुंगरू चाळ, फेटे, चोळणा, रंगीत रुमाल, घाटन्या आदी वस्तू वापरल्या जातात, त्याला ढोल आणि काठीनं साथ दिली जाते.

 

परंपरा जतन करताना मन रमतं
माणदेशातील लोकनृत्य म्हणून धनगरी ओव्या, गजनृत्य पाहण्याची मजा काही औरच असते, विशेष म्हणजे या शाळकरी मुलांना ग्रामस्थांनी, घरातील वडीलधाऱ्या माणसांनी सहकार्य केलंय. त्यांना नृत्यातील बारकावे शिकवले आहेत. ही मुलं शाळेत सराव करतातच, सोबत घरीसुद्धा सायंकाळी सवंगड्यांसोबत सराव करतात. चित्रपटातील नृत्यांपेक्षा आमचं पारंपरिक नृत्य करण्यात आम्हाला आनंद मिळतो. ढोल वाजवताना चाप लावला जातो. त्यावर ठेका दोन की पाच हे ठरवलं जातं, असं विद्यार्थी आकाश दडस, सत्यवान दडस हे या नृत्याबाबत भरभरून बोलत होते. हे पथक म्हणजे गावाची शान आहे, असं ग्रामस्थ जालींधर दडस यांनी सांगितलं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.