टॉप न्यूज

कासवांनी जिंकली जीवनाची शर्यत

मुश्ताक खान, वेळास, रत्नागिरी
समुद्रतळ स्वच्छ ठेवून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम कासव करतात. निसर्गानं दीर्घायुष्य दिलेलं हे कासव आता मात्र अल्पायुषी ठरलंय. मनुष्यप्राण्याच्या अतिहव्यासाचे बळी ठरल्यानं ते आता नामशेष होऊ लागलंय. अशा या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गावानं आणि सह्याद्री मित्र मंडळानं उचललीय. गेल्या १० वर्षांपासून या कार्यात स्वत:ला झोकून देऊन त्यांनी आतापर्यंत १९ हजार कासवांना जीवदान दिलंय. निमित्त ठरलाय मुरूड इथला कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव...
 

 

 

turtle festival 14सह्याद्री निसर्ग मित्र मंडळानं २००२ सालापासून या कासवांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्या या स्तुत्य अशा कार्याला कासव मित्र मंडळ, वेळास आणि ग्रामपंचायतीनं सकारात्मक प्रतिसाद दिला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या २० गावांमध्ये सध्या २० घरटी आढळली आहेत. त्यात वेळासमध्ये सर्वाधिक २० घरट्यांचा समावेश आहे. मुरूड इथं 15 ते 17 मार्च दरम्यान झालेल्या कासव, डॉल्फिन पर्यटन महोत्सवानिमित्त आलेल्या पर्यटकांच्या समक्ष ग्रामस्थांनी १८ कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडलं. त्यांना पाहताना पर्यटकांचे चेहरे आनंदानं खुलले होते आणि प्रत्येकाच्या मनात गावकऱ्यांच्या या कार्याबद्दल आदराची भावना दिसून येत होती.


कासवाचे दोन प्रकार
1. गोड्या पाण्यातील कासव
ही कासवं विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्यानं ही पूर्ण वाढ झालेली कासवं आकारानं खूप मोठी असतात.

 

2. समुद्री कासव
समुद्रात राहणाऱ्या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असं म्हणतात. ही कासवं समुद्रतळ स्वच्छ राखण्याचं कार्य करून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाचा हातभार लावतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवं भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री किनाऱ्यावर आढळून येतात.

 

turtle festival 20ओलिव्ह रिडले प्रजातीचे कासव
वेळास भागात ओलिव्ह रिडले या प्रजातीची कासवं आढळतात. प्रसिद्ध असं हे कासव तपकिरी रंगाचं असतं. एकत्रितपणं एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळं त्यांना ओलिव्ह रिडले हे नाव मिळालं आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं मादी कासवं एकत्र येतात. भारतात ओडिशाच्या गोहिरमाथा समुद्र किनाऱ्यावर ही कासवं मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय ही कासवं भारताच्या इतर किनाऱ्यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून ती खाऊन टाकली जात असत. यामुळं त्यांच्या संख्येत वाढत्या प्रमाणात घट झाल्यामुळं यावर कायद्यानं बंदी घालण्यात आली. तसंच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली.


वेळासमधील कासवांचा प्रवास
रात्री किंवा पहाटे सागरी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. मादी एका वेळेस १०० ते १५० अंडी घालते. अंड्यांना माणसांचा, कोल्ह्यांचा आणि कुत्र्यांचा धोका पोहोचू नये, म्हणून वेळास कासव मित्र मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या घरट्यांना कुंपण घालतात. अंड्यातून पिल्लं बाहेर यायला साधारणपणं ४५-६५ दिवस लागतात. एकदा पिल्लं बाहेर आली की, ग्रामस्थ या पिल्लांना सकाळी ६-७ वाजता किंवा सायंकाळी ६ वाजता म्हणजेच कोवळं ऊन असताना समुद्रात सोडतात. या पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वी ग्रामस्थांकडून बॅरिकेट्स लावले जातात, जेणेकरून त्यांच्या मार्गात पर्यटकांचे अडथळे येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

 

turtle 12.pngरक्षण मानवापासूनही...
तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीत पर्सनेटमध्ये अडकून मरण पावणाऱ्या कासवांचं वाढतं प्रमाण, मानवाकडून होणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरील अतिक्रमणामुळं कासवांचा नष्ट होणारा अधिवास, कासवांच्या पाठीवरील कवचाचा दागिन्यांसाठी होणारा वापर, सागरी कासवांची मटणासाठी होणारी शिकार, आणि त्याचबरोबर त्यांच्या अंड्यांची चोरी आदी कारणांमुळंही ही सुंदर प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. म्हणूनच त्यांना प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याचं रक्षण देण्यात आलंय. समुद्री कासवांना पकडणं बेकायदा आहे. याच कारणामुळं केंद्र सरकारनं या प्रजातींच्या संवर्धनासाठी त्यांचा शेड्यूल- १ मध्ये समावेश केला आहे. उशिरा का होईना, पण केंद्र सरकारनं दाखवलेल्या गांभीर्यामुळं आणि सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ आणि कासव मित्र मंडळ यांच्या प्रयत्नानं हजारो सागरी कासवांना सुरक्षितपणं समुद्रात सोडता आलंय.

 

पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी...

किनाऱ्यावर कासव, अंडी किंवा पिल्लं आढळल्यास स्थानिक संस्थेला कळवावं
कासव संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावं!
कासवांचं घरटं पुरस्कृत करावं

 

पर्यटकांनी काय करू नये...
कासवांना आणि त्यांच्या पिल्लांची हत्या करू नये
रात्री समुद्रकिनारी फिरण्यावर बंधन आणावं
रात्री किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा प्रकाश करू नये
कासवांच्या घरट्यांना कोणताही धोका पोहोचवू नये

    

Comments (1)

  • always heard from my elders about sea turtles hatching on the coast line of my native place . kolthare - dapoli, but never seen it actually , great to see it at last . good work

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.