टॉप न्यूज

महाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण!

ब्युरो रिपोर्ट, अरख, वाशीम
स्त्रीचं आयुष्य बदलवून टाकणारी घटना म्हणजे विवाह...विवाहानंतर सगळी नातीगोती बदलून जातात. महिला सासरी कितीही रमली तरी माहेरची ओढ काही केल्या संपत नाही. माहेरपण काय असतं ते सासुरवाशीण झाल्याशिवाय कळत नाही. तर... सासुरवाशिणींना अवघ्या गावानंच माहेरपणासाठी आवताण धाडलं तर. आश्चर्यचकीत झालात ना? पण वाशीम जिल्ह्यातील अरख गावानं हे करुन दाखवलंय. अरखमधील सर्व जातीधर्माच्या सासूरवाशीणींचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी गावच सामुहिक माहेरपण करतय.
 
 
 सर्व लेकीबाळींना खास निमंत्रण पत्रिका

लेकीबाळांच्या माहेरपणाचा हा उत्सव यंदाही अरख गावात धडाक्यात साजरा होतोय. सालाबादप्रमाणं यंदाही गावानं सासरी गेलेल्या मुलींना आवताण धाडून माहेरपणाला बोलावलंय. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी गावच्या दैवताची,जगदीश्वराची यात्रा असते. त्यातच माहेरवाशीणींचा हा सन्मानसोहळा पार पडतो. गावातील सर्व माहेरवाशीणींना गावातल्या सुवासिनी साडीचोळी देतात. गावचं हे माहेरपण सहसा कोणती महिला चुकवत नाही.

 

Maherwashin 12.pngमाघारणीचं लेणं...
साडीचोळी म्हणजे माघारणीचं लेणं आणि या लेण्याला खूप महत्त्वही असतं. प्रत्येक मुलगी माहेरी आली की, तिला साडीचोळी करूनच सासरी पाठवण्याची परंपरा आहे. हीच परंपरा गावात जपली जाते. अर्थात त्यातही गावचं वेगळेपण आहे. आणि ते म्हणजे गाव हा सोहळा सामूहिकरित्या करतं. या दिवशी गावातल्या सर्व सुवासिनी आलेल्या सर्व लेकीबाळींची मायेनं विचारपूस करतात. त्यांना गोडधोड खाऊ घालतात.

 

 

सर्वधर्माच्या लेकीबाळींना आमंत्रण
आज सर्वत्रच 'हम सब एक है' असा नारा फक्त ऐकायलाच मिळतो. पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव मात्र काही ठिकाणीच पाहायला मिळतोय. अरख गावानं मात्र हे सत्यात उतरवलंय. जगदीश्वराच्या यात्रेतल्या या माहेरपणाच्या सोहळ्याला गावातील सर्व जाती-धर्माच्या लेकीबाळींना आमंत्रित केलं जातं. ही परंपरा गावानं अनेक वर्षांपासून जपलीय. त्यामुळं गावातील सर्वच लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या लेकी या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावतात. एक प्रकारे दरवर्षी नित्यनेमे सार्वजनिक स्वरूपात या नारीशक्तीचा सन्मानच करण्यात येतो.

 


Maherwashin 5.pngनिमित्त जगदीश्वराच्या यात्रेचं
ग्रामदैवत असलेल्या जगदीश्वराच्या यात्रेला ग्रामस्थांकडून हे निमंत्रण पाठवण्यात येतं. त्यामुळं लग्न झालेली प्रत्येक मुलगी इतर कोणत्याही सणापेक्षा किंवा त्या सणाला महत्त्व न देता गावच्या या जत्रेला मात्र हमखास येते. त्यामुळं यानिमित्तानं गावात सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. तर दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणालाही माहेरी न येणारी लेक या कार्यक्रमाला मात्र न चुकता हजेरी लावते. यंदाही असंच चित्र पहायला मिळतंय.

 

 

सुखानं नांदू लागल्या लेकीबाळी
Maherwashin 15.pngआपल्या मुलीचा संसार सुखात, आनंदात चालावा, असं प्रत्येक मुलीच्या आईला वाटत असतं आणि यासाठी आई देवाची पूजाअर्चा करत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावानं सुरू केलेल्या या उपक्रमामुळं नवविवाहित मुलीचे क्षुल्लक कारणानं सासरच्या मंडळींसोबत होणारे वाद कमी झालेत, तसंच घटस्फोटाचं प्रमाणही घटल्याचं इथल्या ग्रामस्थांकडून सांगण्यात येतं. या कार्यक्रमामुळं गावात एकमेकांमध्ये प्रेमभावना वाढीस लागली तर आहेच, शिवाय स्त्रियांचा आदर करण्याची शिकवणही हे गाव या माध्यमातून भावी पिढीला देतंय, असंच म्हणावं लागेल.

 

 

अनुकरणीय सोहळा...

अरख गाव करत असलेल्या या माहेरपणाच्या सोहळ्याचं अनुकरण कोणत्याही गावानं करावं, असाच हा सोहळा आहे. यातून गावागावांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण होऊन नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे सासुरवाशिणीची माहेराची ओढ निमून त्यांचा संसारही सुखाचा होण्यास हातभारच लागतो, असा अरखवासीयांचा अनुभव आहे. 

कवयित्री बहिणाबाई चौधरींनी केलेल्या माहेराच्या कविता डोळे पाणावणाऱ्या आहेत. एका कवितेत त्या  माहेराविषयी म्हणतात, 

 

"देव कुठे, देव कुठे भरीसनी जो उरला

अरे, उरीसनी माझ्या माहेरात सामावला"

अरख गावच्या माहेरवाशिणींची भावना याहून काय वेगळी असणार..? 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.