टॉप न्यूज

वेळास बनलं कासवांचं गाव!

मुश्ताक खान, मुरूड, रत्नागिरी
कासवाची छोटी-छोटी पिल्लं, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, डॉल्फिन सफारी, कोकणी पदार्थांची चंगळ आणि कोकणची लोकसंस्कृती... हे सगळं एकाच ठिकाणी बघण्याची संधी पर्यटकांना मिळाली. निमित्त होतं ते मुरूडमध्ये आयोजित कासव-डॉल्फिन महोत्सवाचं... रत्नागिरीतल्या महर्षी कर्वेंच्या मुरूडमध्ये पहिल्यांदाच १५ ते १७ मार्च दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामुळं रत्नागिरीच्या मुरूडचं नाव पर्यटकांच्या जिभेवर वसलंच आहे, शिवाय वेळासनं आता कासवांचं गाव म्हणून आपलं नाव सार्थ ठरवलंय.
 

राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या महोत्सवात पतंग उत्सव, आकाश कंदील सोडणं, डॉल्फिन सफारी, कासव दर्शनाची (वेळास) मजा पर्यटकांना अनुभवता आली. त्याचबरोबर या महोत्सवात कासव नृत्य, पालखी नृत्य, कोळी नृत्य, जाखडी, नमन, रावण नाचवणं, टिपरी नृत्य, काटखेळ या लोककलांची मेजवानीही होती.


कासव-डॉल्फिन महोत्सव ठरला चर्चेचा विषयturtle 12.png
नुकताच साजरा झालेला कासव-डॉल्फिन महोत्सव सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय आणि त्यामुळं अनेकांना आता रत्नागिरी जिल्ह्यातलं मुरूडही माहिती झालंय. आतापर्यंत अनेकांना केवळ रायगड जिल्ह्यातलं मुरूड-जंजिरा हेच पर्यटन स्थळ म्हणून माहीत होतं. पण, कासव-डॉल्फिन महोत्सवामुळं रत्नागिरीतलं मुरूड हेसुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरलंय. यंदा पहिल्यांदाच आयोजित या महोत्सवाला देशभरातून आलेल्या हजारो पर्यटकांनी भेट दिली. या पर्यटन महोत्सवाचा येणाऱ्या २५ वर्षांपर्यंत सकारात्मक परिणाम जाणवत राहील, अशी प्रतिक्रिया महोत्सवाचे मुख्य आयोजक शैलेश मोरे यांनी दिली.


turtle festival 7.pngस्थानिकांना मिळाला रोजगार
पर्यटकांना इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद चाखता यावा, त्याचबरोबर कोकणातल्या पर्यटन स्थळांची माहिती व्हावी यासाठी इथं खास सोय करण्यात आली होती. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्तानं स्थानिकांसाठी रोजगाराचं नवीन दालन उपलब्ध झालं आहे.

या महोत्सवानिमित्तानं कोकणी संस्कृतीचं दर्शनही इथं येणाऱ्या पर्यटकांना घडलं. मग कासव नृत्य, पालखी नृत्य, कोळी नृत्य, जाखडी, नमन, रावण नाचवणं, टिपरी नृत्य, काटखेळ इत्यादी लोककलांनी पर्यटकांना भुरळ घातली. त्यात काटखेळ सर्वात आकर्षणाचा विषय ठरला. त्याचबरोबर रत्नागिरी इथल्या स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या 'नमन'नंही विशेष दाद मिळवली.

 

खाद्यपदार्थांची चंगळturtle festival 9.png
कोकणात आल्यावर इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय पर्यटक माघारी जात नाहीत. इथंही आल्यावर सुरमई, पापलेटवर यथेच्छ ताव मारण्यात आला. बारीक कोळंबीपासून तयार करण्यात आलेला जवळा विशेष भाव खाऊन गेला. त्याचबरोबर तूप घालून गरमा-गरम उकडीचे मोदक खाण्याची मजा काही औरच. कोथिंबीर वडी, पुरणपोळी, आंबोळी चटणी, कोंबडी वड्यांवरही पर्यटकांनी ताव मारला.

 

अनुभव डॉल्फिन सफारीचा
कासव आणि डॉल्फिन पाहण्यासाठी पहाटेपासून पर्यटक समुद्रकिनारी हजेरी लावत होते. डॉल्फिन सफारी करतानाचा अनुभव टायगर सफारी एवढाच थरारक असतो. फरक फक्त एवढाच आहे की, टायगर जमिनीवर दिसतो आणि डॉल्फिन खोल समुद्रात. दोघं दिसण्यासाठी नशीब लागतं. कासवांची मजा अनेकांनी अनुभवली. पहिल्या दिवशी १८ कासवांच्या पिल्लांनी जन्म घेतला. २००- २५० पर्यटकांच्या साक्षीनं त्यांना समुद्रात सोडण्यात आलं. त्यावेळचा उत्साह पाहण्यासारखा होता.

 

turtle festival 21.pngपतंग उत्सव सर्वात आकर्षण
या पर्यटन महोत्सवातलं सगळ्यात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला पतंग उत्सव. आबाल –वृद्धांनी पतंग उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. आंतरराष्ट्रीय पतंग उत्सवामध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशोक शहा यांनी १ इंचापासून ६० फुटांपर्यंतचे पतंग इथं आणले होते. जगभरातल्या समुद्र किनाऱ्यावर पतंग उत्सव करणाऱ्या शहा यांना मुरूडचा (रत्नागिरी) समुद्र किनारा सर्वात जास्त आवडला.

 

रत्नागिरीतल्या या मुरूडला अधिक विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे आणि इथलं वातावरण उत्साहवर्धक आहे, अशा प्रतिक्रिया इथे उमटत होत्या. पर्यटकांनी इथून परत जाताना आम्ही आता लोकांना रत्नागिरीच्या मुरूडमध्ये जा, असं आवर्जून सांगू, अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच देशभरातून आलेल्या हजारो पर्यटकांच्या साक्षीनं मुरूडमध्ये आयोजित करण्यात आलेला कासव-डॉल्फिन महोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.