जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात, व्यासपीठावर दैनिक ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय वरकड, पत्रकार विनोद राऊत, दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’चे संपादक राम शेवडीकर आणि सृजनशील कवी मनोज बोरगावकर, निर्मलकुमार सूर्यवंशी, संदीप काळे, सारिका काळे यांचीही उपस्थिती होती.
पत्रकारांनी लेखणीची तलवार उगारावी
"माध्यम क्षेत्राला वलय असलं तरी खर्या अर्थानं वंचितांच्या शोषणाविरुद्ध पत्रकारांनी आपल्या लेखणीची तलवार उगारली पाहिजे". तसंच मराठवाड्यातल्या दुष्काळाचा संदर्भ देत "कोरड्या विहिरी आणि कोरड्या जमिनीच्या भेगा माध्यमातून पुढं आणणं थांबवून माध्यमांनी या दुष्काळामागच्या व्यवस्थेची गचांडी पकडली पाहिजे. महाराष्ट्रातला एक देश म्हणजे मराठवाडा आहे. चिवट वृत्तीची माणसं मराठवाड्यात आहेत. ‘अनावृत...’मधून वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न तर केलाच आहे; त्याशिवाय सभोवतालच्या नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मकता शोधली आहे.” असंही मंदार फणसे म्हणाले.
‘अनावृत’मध्ये समाजातलं भोंगळ सत्य
कविवर्य फ. मु. शिंदे यांनी आपल्या मिश्किल शैलीत भाषणाला सुरुवात करीत संदीप काळेंच्या ‘अनावृत’मध्ये समाजातलं भोंगळ सत्य आहे; पण लेखन भोंगळ नाही, असं सांगितलं. सद्य काळात मूल्य मागं पडली आहेत. पत्रकारांनी ‘मी मला विश्वासू वाटलो पाहिजे’ एवढी विश्वासार्ह पत्रकारिता केली पाहिजे, असंही फमु म्हणाले. ‘अनावृत...’मधील लेखन अत्यंत प्रामाणिक आणि परखड असल्याचं सांगून पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या देखणेपणाबद्दल चित्रकार नयन बाराहाते यांचं कौतुक करताना या मुखपृष्ठाबद्दल एक कविताही फमुंनी सादर केली.
मनोज बोरगावकर यांनी ‘अनावृत...’चा आढावा घेताना समाजात विधायक आणि विध्वंसक या दोनच प्रवृत्ती सर्वकाळ असतात. एखादा पत्रकार धाडसानं आणि प्रामाणिकपणं काम करतो, तेव्हा समाजानंही त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. संदीप काळेंच्या लेखनात भाबडेपणा नाही तर तर्कसंगतता आहे. त्यांची लेखणी परखड आहे, पण कडवट नाही, असं सांगून जगण्याचाही अनुवाद करता येतो, हे संदीप काळेंनी ‘अनावृत...’मधून दाखवून दिलं आहे, असंही ते म्हणाले.
माध्यमात नेहमी तारेवरची कसरत असते. पूर्वीपेक्षा पत्रकारितेत ‘अलर्टनेस’ वाढला आहे, किंबहुना तो कायम ठेवणं, हे आजचं आव्हान आहे. संदीप काळे यांनी ‘अनावृत...’मधून परखड आणि सकारात्मक लेखन केलं आहे आणि ते दिशादर्शक ठरू शकेल, असं मत दैनिक ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी व्यक्त केलं.
दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’चे संपादक राम शेवडीकर यांनी प्रास्ताविकात सांगितलं की, संदीप काळेंनी 'उद्याचा मराठवाडा'मध्ये विविध विषयांवर लेखन करीत वाचकांशी आपलं नातं पक्कं केलं आहे. पत्रकारितेत संदीप काळे जणू जागल्याची भूमिका करतात, असंही ते म्हणाले. आपलं मनोगत व्यक्त करताना संदीप काळे यांनी आपल्या आई-वडील आणि जीवनातल्या मार्गदर्शक, सहकार्यांची कृतज्ञता व्यक्त करताना, ‘अनावृत...’मधलं सर्व लेखन सेवावृत्तीनं लिहिल्याचं सांगितलं. प्रकाशनानंतर पुस्तक प्रा. राजाराम वट्टमवार यांना अर्पण करण्यात आलं. संदीप काळे यांचे वडील रामराव काळे आणि आई कमलबाई काळे, नयन बाराहाते, राघवेंद्र कट्टी, राजेश मुखेडकर यांचा यावेळी विशेष सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी बाबा आमटेंच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं. मान्यवरांचं स्वागत राम शेवडीकर, अवधूत निरगुडे, धर्मराज हल्लाळे, नयन बाराहाते, किरण कुलकर्णी, रविप्रकाश कुलकर्णी, निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केलं. कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन राजश्री हेमंत पाटील यांनी केलं, तर नयन बाराहाते यांनी आभार मानले.
Comments
- No comments found