टॉप न्यूज

प्रवास ई-कवितांचा...

सुखदा खांडगे, मुंबई
'तुझ्या कवितेचं पुस्तक वाचलं... छान लिहतोस!' अशा प्रतिक्रियेचं रूपांतर आता 'तुझी कविता ऑनलाईन वाचली, चांगली वाटली' अशा प्रतिक्रियांमध्ये झालंय. कारण आजच्या वेबच्या दुनियेत आता सगळं काही ऑनलाईन झालंय. यात मग कवी तरी मागं कसे राहणार? सध्या इंटरनेटवर ब्लॉग, कवितेचे ग्रुप, सोशल नेटवर्क साईटवरील ग्रुप अशी वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून आता कवितांचंही आदान-प्रदान केलं जातंय. आजच्या (21मार्च) जागतिक काव्य दिनाच्या निमित्तानं अशाच वेगवेगळ्या व्यासपीठांचा आढावा घेणार आहोत.

 

नचिकेत जोशी
kavi 3नचिकेत जोशी, हा युवक गेले आठ ते नऊ वर्ष इंटरनेटवर ब्लॉग लिहितोय आणि त्याच्या या ब्लॉगला आतापर्यंत तब्बल २२,००० हिट्स मिळाल्यात. 'ऑनलाईन' माध्यमाबद्दल नचिकेतनं सांगितलं की, "हे माध्यम खूप उपयुक्त आणि लोकांपर्यंत सहज पोहचता येण्यासारखं आहे. मला कविता आणि गझल लिहायला आवडतात. सुरुवातीला मी तेच लिहित गेलो आणि माझ्या ब्लॉगवर टाकत गेलो. यामुळं माझ्या कवितांचा प्रसार वाढत गेला आणि आता तो इतका वाढला की दिवसभरात माझ्या ब्लॉगला शेकडो लोक भेट देताहेत."

 

पुढे तो म्हणाला, की "हे माध्यम एकसारख्या विचारांच्या लोकांना एकत्र आणायला मदत करतं. मग ती कविता सामाजिक असो, प्रेम कविता असो अथवा अजून काही. कवितांची देवाणघेवाणीमुळं या माध्यमाचाही प्रसार वाढलाय हे नक्की."

 

BLOGनचिकेतचा ब्लॉग पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 

 

kavi 2कामिनी फडणीस-केंभावे

नचिकेत सारखचं लिहिणारी अजून एक कवयित्री आहे कामिनी फडणीस-केंभावे. कामिनीनं आठ वर्षापुर्वी www.mayboli.com वर कविता लिहायला सुरुवात केली आणि आपला ब्लॉगही बनवला. याच माध्यमातून पुढे येऊन तिनं आता स्वतःचा  'चांदण शेला' हा गाण्यांचा अल्बमही तयार केलाय. 

 

कवितांबाबत कामिनी म्हणाली, "इंटरनेटवर कविता लिहित लिहीतच मला माझे वाचक मिळाले. खूप दिवसांनी जर मी कविता अपलोड केली तर वाचक मला याचं कारण विचारतात? आम्हाला नेहमी तुझ्या कविता वाचायला आवडतील असेही ते सांगतात. माझे आता अनेक फॅन फॉलोवर्स झालेत. सध्या मी कवितांपेक्षा गाणीच जास्त लिहते. पण इंटरनेटवर इतर नवकवींच्या कविता आजही आवर्जून वाचते."

 

BLOG कामिनीचा ब्लॉग पाहण्यासाठी इथं क्लिक करा..

 

 

श्वेता पाटोळे

kavi 1पुण्याची श्वेता पाटोळे या तरुणीच्या ब्लॉग्सला देखील अनेक हिट्स येतात. या तिच्या ब्लॉ़गबाबत बोलताना श्वेता सांगते, "सगळ्यांनाच पुस्तक प्रकाशित करण जमत नाही, आणि ते खर्चीकही असतं. त्यामुळं ब्लॉगवर, किंवा कवितांच्या ग्रुपवर कविता पोस्ट करणं हे अगदी सहज आणि सोपं असतं. त्यात अजून एक मजेची गोष्ट म्हणजे हे सर्व अगदी मोफत असल्यानं इथं कविता पोस्ट करायला परवडतंही. त्यातही कोणताही संपादकीय वरदहस्त याला नसतो. त्यामुळं आपली कविता निवडली जाईल, की नाही, ही भीतीसुध्दा नसते. फक्त कविता टाईप करा आणि पोस्ट करा म्हणजे झालं. तुमची कविता लाखो वाचकांपर्यंत एका लिंकच्या सहाय्यानं पोहचते आणि फक्त पोहचतेच असं नाही तर लगेच वाचकांच्या प्रतिक्रियाही मिळतात. या प्रतिक्रियाचं तर मला पुढील लेखनासाठी प्रवृत्त करतात.”

 

BLOGश्वेताचा ब्लॉग पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 


नचिकेत, कामिनी, श्वेता यांसारखे अनेक नवोदित कवी या ऑनलाईन माध्यमांमध्ये आपली कला, आपली आवड जोपासत असतात. इंटरनेट आल्यावरती अनेकांनी याच्या गैरवापरामुळं मुलांचं नुकसान होईल असा हंबरडा फोडला. परंतु कोणत्याही नवीन गोष्टींचे जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. परंतु या इंटरनेटमुळं अनेक साहित्यिकांना, कलाकारांना आपलं हक्काचं असं व्यासपीठ मिळालय. तसचं इतरांच पाहून प्रत्येकातला साहित्यिक, कलाकार जागृत होण्यास मदत होते. त्यामुळं या माध्यमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. आता तर आधुनिक म्हणजेच, ब्लॅकबेरी, अॅण्ड्रॉइड तंत्रज्ञानाच्या मोबाईलमुळं इंटरनेट वापरणं आणखी सुलभ झालंय. आपल्या मित्रांच्या कविता, गाणी यांना आपण हवं तेव्हा कोणत्याही वेळी लाईक आणि कमेंट करुन प्रतिक्रिया नोंदवू शकतो. त्यामुळं आता इंटरनेट हेच एक हक्काचं असं व्यासपीठ बनलंय असंच म्हणायला हवं.

 

इंटरनेटवरील काही नवोदित कवींच्या निवडक कविता

काळोखाची गाणी

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...
मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...
                             -  श्वेता पाटोळे
-------------------------------------------------------------------------------------------------

चल खेळू या...

डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?
दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!
तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं
आणि विचार मग.... चल खेळू या?
                                      -  कामिनी फडणीस -केंभावे

-------------------------------------------------------------------------------------------------


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.