टॉप न्यूज

मी नं कुणाला सांगायचे, कविता स्फुरते कशी?

ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी
कविता म्हणजे काय? मनातल्या असंख्य चांगल्या-वाईट शब्दांना लिखित स्वरूप देणं, एखाद्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, भेटीच्या प्रसंगी कवितेतल्या ओळी गुणगुणाव्याशा वाटतात. आपल्या शाळेतल्या अनेक कविता आजही आपल्याला पाठ आहेत. अशाच काही आठवणीतल्या कवितांना उजाळा दिलाय अरुण म्हात्रे यांनी.
 
 

arun mhatre 3संजीवनी मराठेबाईंची कविता आहे, 'मी नं कुणाला सांगायचे कविता स्फुरते कशी'. थोडक्यात कविता कशी येते, हे सांगणं कठीण आहे. लेखक किंवा कवी जेव्हा लिहित असतो तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी फिरकलं तर तो अस्वस्थ होतो. त्याला आजूबाजूला कोणी नको असतं. याचं कारण तो आतला क्षण असतो. तो संपूर्ण बाहेर येईपर्यंत त्याला कोणाला दाखवावसा वाटतं नाही. कविता झाली की तो दाखवतो. मात्र येतानाचा क्षण तो जपून ठेवतो. कविता निर्मितीच्या घटना वेगवेगळ्या आहेत. आरती प्रभू, वसंत सावंत, मंगेश पाडगावकर, अरूण कोल्हटकर, अशोक नायगावकर, ना. धो. महानोर यांची आवर्जून आठवण येते. बहिणाबाई शेतात राबणाऱ्या होत्या त्यांच्या कविता शेतातल्या आहेत. ''अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर'' या कवितेतून जशी शेतातली चूल दिसते तशीच मराठमोळी गृहिणीही.

 

आरती प्रभूंचं साहित्य वाचताना मी नकोसा झालेला, मी कशासाठी इथं आलो, ही वेदना त्यांच्या संपूर्ण जगण्यात जाणवते. ''अंत झाला असता जन्म एक व्याधी, वेदनांचे गाणे म्हणजे पोकळ समाधी'' यासारख्या त्यांच्या ओळी त्याचेच प्रतिक आहेत. कवितेत गहिरी प्रेमभावना असावी. कवितेतून वास्तवाची जाणीव करून देता येते. कवितेच्या निर्मितीत अनेकांचा सहभाग असतो. प्रेमाचे सुंदर वर्णन करता येतं. तरूणांच्या हृदयातील प्रेमभावना व्यक्त करण्याचं माध्यम असते कविता. कवितेतून निर्सगाचं, पावसाचं वर्णन अप्रतिम केलं गेलंय. कविता करत असताना माणसातला चित्रकार जिवंत होतो. प्रत्येक कवीच्या मनातला पाऊस वेगवेगळा असतो.

 

''कवी जेव्हा बोलतो प्राणातून, तेव्हा त्याला नसतं हसायचं,
कवी जेव्हा बोलतो, तेव्हा आपण फक्त कवितेसारखं बसायचं
कवी खूप बोलतो, नदीच्या काळजात जसा पूर येतो
कवी जेव्हा बोलतो, फुलांबद्दल फूल होऊन
तेव्हा ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मुलं होऊन''

 

arun mhatreकवी कोणाला म्हणता येईल?
कवी कोणाला म्हणता येईल? जो लिहितो तोच कवी का? कविता सुचते पण लिहित नाही त्यालाही आपण कवी म्हणू शकतो का? पाऊस सगळेचं बघतात पण किशोर कदम जो पाऊस बघतात तो वेगळा असतो. महानोर जो पाऊस बघतात तो वेगळा असतो. अशोक बागवेंच्या कवितेतला पाऊस वेगळा असतो. संभाजी भगत रस्त्यावर फिरत असताना रस्त्याकडेच्या झोपड्या दिसतात. वस्तीवस्तीतली घरं दिसतात. गरीब बायका दिसतात. त्यांच्या म्हाताऱ्या आया दिसतात. त्यांची विझलेली चूल दिसते. त्यांची कपाटीला गेलेली पोटं दिसतात. त्यांच्या घरात असणारा अंधार दिसतो. ती जी बाई आहे तिला जगण्यासाठी पडलेले प्रश्न चावडीला विचारावेसे वाटतात. हे नीट समजून घेतलं तर तुम्हाला कळेल भूकेची कळ माणसाला कविता लिहायला भाग पाडत असते. उत्कट प्रेम, निर्सगाचा वारा तुम्हाला कविता करण्यास भाग पाडतो. कवितेचे अर्थ अनेक असतात. जो ज्या पद्धतीनं घेईल तसा त्याला अर्थ सापडत जातो. ज्यानं त्यानं तो घ्यावा...एवढंच.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.