टॉप न्यूज

जपायला हवी तब्येत हवेची

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आजचं हवामान झपाट्यानं बदलतंय. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढतेय. सकाळी पाऊस, दुपारी ऊन तर रात्री थंडी असे एकाच दिवसात तिन्ही ऋतू आजकाल बघायला मिळतायेत. जागतिक तापमानात गेल्या काही दशकात चांगलीच वाढ झालीय. पृथ्वीचं वाढतं तापमान, हवामानातील बदल यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत प्रत्येकानं जागरुक व्हायला पाहिजे. आज जागतिक हवामान दिनानिमित्त या बदलत्या हवामानाचा 'भारत4इंडिया'नं घेतलेला आढावा...

 

Environment Day

 

'हवामान तुमच्यासाठी'

दरवर्षी 23 मार्च हा 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्यावतीनं 'हवामान तुमच्यासाठी' हे घोषवाक्‍य घेण्यात आलं आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्यावतीनं दरवर्षी हवामान दिन वेगळा विषय घेऊन साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानवाढीसंबंधी चर्चा सुरू आहे. 1961 ते 1990 या काळाच्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत जागतिक तापमानात 0.5 अंश सेल्सिअसनं वाढ झाल्याचं आढळून आलंय. तापमानवाढीमुळं बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढण्यापासून इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये हवामानाशी संबंधित संघटनांनी लक्ष घातलं असून लोकप्रबोधनाचं कामही जोरात सुरू आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना हवामानातील बदलांबाबत नियमित काम करत असते. संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा इथं असून जगातले 189 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेनं दिलेल्या मापदंडाचं पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो.

 

पर्यावरण आणि मानव

पर्यावरण हा मानवाच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. जाणवणारा आणि तरीही आचरणात आणण्याची वेळ झाल्यावर दुर्लक्षित होणारा असा हा विषय. अमेरिकेतील मूळ जमातीत (नेटीव्ह अमेरिकन्समधे) अशी म्हण आहे की,"हे जग तुम्हाला आंदण म्हणून मिळालेले नाही, तर तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी राखून ठेवण्याची एक जबाबदारी म्हणून मिळालेले आहे..." भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून "पृथ्वीला" माता म्हणून संबोधण्यात आलंय. आज एकीकडं भरमसाट प्रदूषण आणि वातावरणातील विविध बदलांमुळं निसर्गाचा समतोलही ढासळत चाललाय, शेवटी या सगळ्या गोष्टींचा परिणाम सर्व जीवसृष्टीवरच होणार यात काडीचीही शंका नाही आणि आता प्रत्येकानंच जाणीवपूर्वक प्रदूषण कसं टाळता येईल हा निर्धार करुन आमलात आणला, तर धरणीमातेलाही आपण वाचवू शकू.

 

हवामान म्हणजे काय?

हवेचं तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती आणि दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळं, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास 'हवामानशास्त्र' असं म्हणतात. वातावरणातील या घडामोडींचं निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणं, त्यानुसार निकटच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणं हे हवामानशास्त्रज्ञांचं प्रमुख काम असतं. पहिलेच्या काळात ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जायचा. विविध नैसर्गिक निरीक्षणांचा आणि खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात होता.

 

संगणकाची हवामानशास्त्रातील भूमिका

संगणकाच्या शोधानं हवामानशास्त्राचा अभ्यास करणं सोयीस्कर झालंय. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीनं गणितं करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचं काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचं कामही संगणकाद्वारं होऊ लागलं.

 

वार्‍याचा वेग मोजण्याचं साधन – अ‍ॅनोमिटर

हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधनं वापरली जातात. या साधनांच्या मदतीनं हवामानविषयक घटनेचं भौगोलिक स्थान, तीव्रता, वेग, प्रकार, तापमानातील होणारे बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणं जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरीक्षणासाठी नियुक्त केली जातात.

 

जमिनीवरील साधनं -

ही साधनं प्रामुख्यानं हवामान वेधशाळांमध्ये असतात.

रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्यानं विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळं वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची नोंद करता येते.

 

समुद्राच्या पाण्यावरील साधनं -

समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणं पाणी आणि वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.

 

वातावरणात सोडली जाणारी साधने -

फुग्यांच्या साहाय्यानं पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तिथल्या विविध घटकांची निरीक्षणं रेडिओ-लहरींद्वारं पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात आणि बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरट्या घालत नोंदी करणारी खास विमानं सोडली जातात. ही विमानं म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.

 

हवामानाचा अंदाज

राज्यात कुठे - किती पाऊस पडेल, याचा अंदाज वेधशाळा मांडते. हवामान केंद्राकडून येणारे हे अंदाज मोठ्या परिसरासाठी असतात. त्यामुळं लहान प्रदेशासाठी अंदाज वर्तवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ढगांची उंची, त्यांच्यातील बाष्पाचं प्रमाण वाढलं की विजांची संख्या आणि व्याप्ती वाढते. विजा कडाडण्याची शक्यता असलेल्या ढगांचे प्रकार आणि त्यांच्या मार्गाची दिशा डॉप्लर रडारवरून समजू शकेल. स्थानिक पातळीवर तापमानातील फरक लक्षात घेऊन विजांबाबत अंदाज वर्तवता येतो.

 

भारताचे हवामान नेमके आहे तरी कसे आणि त्यात अलीकडच्या काळात कोणते बदल झाले आहेत ते पाहूया-

 • भारताच्या पश्चिमेला राजस्थानच्या वाळवंटात वर्षांला जेमतेम १३० मिलिमीटर पाऊस पडतो.
 • ईशान्य भारतात मेघालयात मौसीराम इथं त्याचं प्रमाण तब्बल पंच्याऐंशी-नव्वदपटीनं जास्त आहे.
 • राजस्थानच्या वाळंवटात वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी केवळ वीस दिवस पावसाचे असतात, तर ईशान्य भारतात पावसाचे दिवस १८० च्या आसपास असतात.
 • भारतात वर्षांला सरासरी ११८२.८ मिलिमीटर पाऊस पडतो.
 • सर्वाधिक वाटा म्हणजे ७४.२ टक्के पाऊस मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये (जून ते सप्टेंबर) पडतो.
 • सर्वात मुख्य महिना आहे- जुलै. एकट्या जुलैमध्ये वर्षभतील २४.२ टक्के पाऊस पडतो.
 • ऑगस्टमघ्ये २१.२ टक्के, सप्टेंबरमध्ये १४.२ टक्के, तर जूनमध्ये १३.८ टक्के पाऊस पडतो.
 • पावसाळ्याशिवायच्या इतर आठ महिन्यांमध्ये २५.८ टक्के पाऊस पडतो.
 • तापमानात ०.५६ अंशांची वाढ देशातील तापमानाची १९०१ ते २००९ या काळातील आकडेवारी असे सांगते की, गेल्या शंभर वर्षांच्या काळात देशाच्या सरासरी तापमान ०.५६ अंश सेल्सिअसनं वाढलं आहे.
 • जागतिक तापमानातील वाढ ०.७४ अंशांची आहे.
 • तापमानात झालेली सर्वाधिक वाढ मुख्यत: पावसाळ्यानंतरच्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमधील आहे. या महिन्यांमधील तापमान ०.७० ते ०.७७ अंशांनी वाढलंय.
 • याउलट मान्सूनच्या काळातील तापमानवाढ सर्वात कमी (केवळ ०.३३ अंश) आहे.

 

'हवे'ला हवाय 'मान'

आज हवामानाच्या नोंदी घेणारी उपकरणं, स्वयंचलित हवामान केंद्रातील वेगवेगळी यंत्रणा उपलब्ध आहे. त्याची प्रत्येकानं माहिती करून घेणं गरजेचं आहे. शिवाय आपआपल्यापरीनं हवामान रक्षणासाठी आपण काय करू शकतो याचा प्रत्येकानं विचार करणं आवश्यक आहे.


Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.