बोहाड्याच्या तयारीनंच होळीची चाहूल
बोहाडा म्हणजे आदिवासींच्या रंगनृत्याची लयलूट. खान्देश, नाशिक, तसंच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात बोहाडा आजही तेवढ्याच उत्साहानं साजरा होतो. त्यातही मोखाड्याचा (ठाणे) बोहाडा उठून दिसतो. आदिवासी भागात फाल्गुनच्या सुरुवातीलाच होळीची चाहूल लागते, तीच मुळी बोहाड्याच्या तयारीच्या लगबगीनं. या भागातील आदिवासी बोहाड्यासाठी वेगवेगळी सोंग बनवण्यात गढून जातात. कागदाच्या लगद्यापासून रंगीबेरंगी मुखवटे बनवले जातात. हे मुखवटे नर्तकाच्या चेहऱ्यावर लावून ते सोंग नाचवलं.
पुराणाचा आधार
या नृत्यनाट्यामध्ये रामायण महाभारताच्या प्रसंगावर आधारित कथाप्रसंग सादर केले जातात. या नृत्यनाट्यातील नटांना रावण, कुंभकर्ण, बिभिषण, राम, कृष्ण, भीम, अर्जुन, मारुती इत्यादींच्या हालचालीचा, हावभावांचा अभ्यास करावा लागतो. बोहाडा हे नृत्यनाटय़ असल्यामुळं त्यामध्ये नृत्याला विशेष प्राधान्य असतं आणि पशूचे, पक्ष्यांचे, राक्षसांचे आणि देवांचं नृत्य वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यासाठी त्या त्या नटाला आपापली निरीक्षणं पणाला लावूनच कसून मेहनत करावी लागते. बोहाड्याचा मुख्य कथाभाग पौराणिक असला तरी कालपरत्वे त्यात वैदू, बाळंतीण, बोहारीण, राजकीय पुढारी इत्यादी वेगवेगळ्या माणसांची सोंगं आणली जातात. त्यामुळं बोहाड्याचं स्वरूप निव्वळ दशावताराच्या खेळासारखं राहत नाही. ही बोहाड्याची सोंगं सादर करण्यासाठी देवदैत्यांचे मुखवटे तयार केले जातात. त्यासाठी सुरुवातीला मातीचे मुखवटे तयार करून त्यावर कागदाचा लगदा आणि उडदाचं पीठ एकत्र करून त्याच्या लुकणापासून देवदैत्यांचे मुखवटे तयार केले जातात. देवांचे मुखवटे शांत सात्विक भाव दर्शवणारे आणि दैत्यांचे मुखवटे क्रूर-भीषण भाव व्यक्त करणारे असतात. या मुखवट्यांना एकदा पक्का रंग दिला की, मग ते वर्षानुवर्षं वापरात राहिले तरी टिकतात.
बोहाड्यांना उजेड पलित्यांचा
यानंतर गणपती, सरस्वती, शंकर, खंडोबा इत्यादी देवतांसाठी उंदीर, मोर, नंदी, घोडा इत्यादी वाहनं तयार केली जातात. या वाहनांचे मुखवटेसुद्धा कागदाचा लगदा आणि उडदाचं पीठ यापासूनच बनवले जातात. त्यांचं बाकीचं शरीर मात्र पोलादी किंवा लोखंडी पत्र्याचं करतात. त्याच्या पाठीला एक माणूस कमरेइतका आत उभा राहू शकेल एवढं मोठं छिद्र ठेवतात. हे सर्व बोहाड्याचे कार्यक्रम पाच पाच रात्री चालतात. यासाठी नटांना वावरण्यासाठी सडकेचा लांबच लांब पट्टा आखून ठेवतात आणि सडकेच्या दोन्ही बाजूस प्रेक्षक दाटीवाटीनं बसतात. रात्रीच्या वेळी पलिते पेटवून त्याच्या प्रकाशात हे खेळ सुरू होतात. प्रथम सूत्रधार नमन करतो, नंतर संबळ, पिपाण्या यांच्या तालावर विदूषक उड्या मारू लागतो. त्यानंतर भालदार, चोपदार गणपतीच्या आगमनाच्या ललकाऱ्या देतात. पाठोपाठ गणपती उंदरावर बसून नाचत नाचत येतो. गणपती गेला की सरस्वती येते आणि नाचून आशीर्वाद देऊन परत जाते. त्यानंतर बोहाड्याचं मुख्य कथानक सुरू होतं. लोकसुद्धा न कंटाळता, न थकता हा कार्यक्रम पाहतात. यामध्ये दोन-दोनशे नट भाग घेतात. सध्या बोहाड्याचा प्रकार कमी झालेला दिसतो.
होळीला तारपा नृत्य
मोखाड्यात सात ते आठ दिवस चालणारा बोहाडा सुरू होतो तो होळीच्या दुसऱ्या दिवशी. होळीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं होळी जाळून, ती रात्र जागवली जाते ती वेगवेगळ्या कला प्रकारांनी. सहसा तारपा नृत्य सादर करून होळीची रात्र जागवली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी जत्रा सुरू होते ती गावातील जगदंबा देवीची. देवीच्या जत्रेसाठी या बोहाडामध्ये सोंग नाचवली जातात.
परंपरेनं चालतंय बोहाडा नृत्य
गावातील काहींच्या घरी एक सोंगाची प्रथा असते. एका परिवारात परंपरेनं एक सोंग चालत असतं. त्या घरातील व्यक्ती त्यांच्या घरातील सोंग नाचवतात. पहिल्या दिवशी फक्त गणपती हे सोंग नाचवलं जातं. गणपती या आप्तइष्ट देवतेला वंदन करून पुढील दिवसाच्या सोंगांची तयारी सुरू होते आणि प्रत्येक दिवशी नवीन असं सोंग नाचवलं जातं. दुसऱ्या दिवसापासून रावण, त्राटिका, खंडोबा, भीमाचं लग्न हिडिंबाबरोबर, काळोबा, भैरोबा, सत्वाई अशी वेगवेगळी सोंगं नाचवली जातात. जत्रा संपण्याच्या आदल्या दिवशी ज्याला धाकटा बोहाडा म्हटलं जातं. शेवटच्या दिवसाला मोठा बोहाडा असं म्हटलं जातं. या दिवशी देवीचं सोंग नाचवलं जातं. देवीची लढाई महिषासुर राक्षसाबरोबर असं सोंग नाचवून या आठ दिवसांच्या बोहाड्याची समाप्ती होते.
भस्मासुराचं सोंग...
राजन वैद्य, मोखाड्यातील कलावंत यांनी सांगितलं, "माझ्या घरी भस्मासुर हे सोंग परंपरेनं चालत आलं आहे. हाच बोहाडा नृत्य प्रकार फक्त मोखाड्यापर्यंत सीमित न राहता आता त्याला एक लोककलेचा दर्जा मिळाला आहे. म्हणून बाहेर त्याचं प्रस्तुतीकरण करताना कोणीही हे सोंग नाचवतं, पण जत्रेमध्ये सादर होताना प्रत्येक परिवारातील मंडळींना हा मान मिळतो." आता लोककला प्रकार फक्त जत्रेमध्ये सीमित न राहता शहरातील लोकांपर्यंत पोचला आहे. जरी या प्रकारची अनेक लोककला महोत्सवामध्ये मागणी येत असली तरी हा बोहाडा पारंपरिक पद्धतीनं अजूनही मोखाडा भागात सादर होत असतो आणि याला बघण्यासाठी जवळच्या आदिवासी गावातील लोकही येत असतात.
होळी सण जवळ आला की, प्रत्येक घराण्यातील मंडळी आपली सोंगं सजवायला तयार होतात. रंगरंगोटी करून ती बोहाड्यामध्ये वापरायला तयार ठेवतात.
Comments
- No comments found