टॉप न्यूज

चारा घेऊन दिंडी चालली... चालली!

ब्युरो रिपोर्ट, जालना
राज्यात भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य देत योजना राबवल्या जातायत. त्यात आता सेवाभावी संस्थांबरोबरच विरोधी पक्षांनीही पुढाकार घेतलाय. शिवसेनेनं जालन्यात नुकताच चारा दिंडीचा अभिनव उपक्रम सुरू केलाय. 'चारा छावणीत नको, दावणीला द्या,' असा घोष करीत ही दिंडी शेतकऱ्यांच्या दावणीतच चारा देऊ लागलीय.

chara dindi 4सांत्वन दिंडीनंतर चारा दिंडी
कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी `कापूस दिंडी’, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी `सांत्वन दिंडी’ आणि आता दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ही `चारा दिंडी’ सुरू केल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. जालना जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी सुरू झालीय. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. जवळपास 85 वाहनांमधून 35 हजार कडब्याच्या पेंढ्या घेऊन सुरू झालेली ही दिंडी शेतकऱ्यांना दावणीला चारा देणार आहे. जालना जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात ही दिंडी जाणार असल्याचं हरिभाऊ लहानेंनी सांगितलंय. विशेष म्हणजे, या चारा दिंडींसाठी केवळ शिवसेना नेत्यांचाच नव्हे, तर समाजातील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचा हातभार लागलाय.


चारा छावणीत नको, दावणीलाच द्या - रावतेchara dindi 3
या अभिनव चारा दिंडीविषयी रावते म्हणाले, “मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जालना, धाराशीव, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज आहे. चारा टंचाईला शेतकरी तोंड देत असताना शेतकऱ्यांची जनावरं कवडीमोल भावात विकत घेऊन कत्तलखान्यात जाण्यापूर्वी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. सरकारनं चारा छावण्या उघडल्या असतील, परंतु छावणीला चारा न देता थेट दावणीला चारा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. कारण चारा मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या जमिनीतील कामं या जनावरांकडून करून घेतल्यानंतर पुढच्या तयारीला लागेल. ही चारा दिंडी आता प्रत्येक तालुक्यातून जाणार आहे.


पाणी सोडलं असतं तर...
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीप्रमाणं दुष्काळाचं चित्र आपल्याच भागात असल्याचं रंगवून जास्त निधी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेनं मात्र मराठवाड्यातील दुष्काळाकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न विधानभवनात केला. कृष्णा खोऱ्याचं 21 टीएमसी पाणी सोडलं असतं तर नक्कीच धाराशीव, बीड जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असती. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पाणी शेवटपर्यंत न सोडल्यानं दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. परळी वीज केंद्राला पाणी सोडण्याची चूक सरकारनं केलीय. आज मुद्गल बंधाऱ्याचं पाणी कमी झालं असून परळी वीज केंद्र बंद अवस्थेत आहे. तेव्हा शिवसेनेनं मुद्गल बंधाऱ्यासाठी केलेलं हे आंदोलन योग्य असल्याचं समर्थनही रावते यांनी केलं.


chara dindi 2चारा निर्मितीसाठी 100 कोटींची तरतूद
दरम्यान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, याचा पुनरुच्चार करून चारा निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यानं चाऱ्याची कमतरता भासणार नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी कराड इथं विभागीय बैठक झाली. राज्यात चार लाख हेक्टरवर चारा निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला असून यासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. या कार्यक्रमातून 70 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, अशी आशा मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली.


2,270 कोटींच्या 105 योजनांचा प्रस्ताव केंद्राला सादर
दुष्काळी भागातील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मान्य आणि अंतिम टप्प्यातील योजनांसाठी 2,270 कोटींच्या 105 योजनांचा प्रस्ताव केंद्राला सादर केला असून केंद्राकडून ही योजना मान्य होईपर्यंत राज्य सरकार राज्याच्या निधीतून हा कार्यक्रम प्राधान्यक्रमानं राबवत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या निधीसाठी राज्याचा केंद्राकडं पाठपुरावा चालू असून एआयबीपीतूनही या योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या योजनांमुळं दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचं पाणी तातडीनं उपलब्ध करून देणं शक्य होईल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.