टॉप न्यूज

दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा!

मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
कोकणात परंपरेप्रमाणं यंदाही शिमगा दणक्यात साजरा होतोय. शिमगा साजरा करण्याच्या विविध परंपरांपैकी सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी! सर्व भाविकांना एकाच ठिकाणी जिल्हाभरातल्या देवतांचं दर्शन व्हावं यासाठी गेल्या सात वर्षांपासून दापोलीत साई सेवा केंद्रातर्फे शिमगा पालखी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. राज्यातल्या या एकमेव पालखी महोत्सवात यंदाही जिल्ह्यातल्या विविध भागांतून १८ पालख्या धुमधडाक्यात दाखल झाल्यात. याचा आनंद लुटताना प्रत्येक जण दुष्काळ दूर होऊ दे रेsss महाराजा, असं गाऱ्हाणं घालतोय.
 

palkhi mahostav 1कोकणात शिमगा आणि गणपती हे दोन सण जोमानं साजरे होतात. हा शिमगाही त्याला अपवाद नाही. कोकणी माणूस जिथं कुठं असेल तिथून शिमग्याला तो थेट कोकण गाठतो आणि आपल्या खांद्यावर पालख्या खेळवतो. यावर्षीही मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमधून कामाधंद्यानिमित्त बाहेर गेलेले लाखो चाकरमानी शिमग्याची मजा लुटण्यासाठी सहपरिवार कोकणात दाखल झालेत. नेहमीप्रमाणं सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे.

 

ढोल-ताशांचा खणखणाट
शिमगा सुरू झाला की, कोकणात प्रत्येक ठिकाणी ढोल-ताशांचा आवाज घुमत राहतो. शहरांपासून गाव-खेड्यातल्या रस्त्यांवर पालख्या नाचवल्याचं दृष्य दिसतं. भाविकही मोठ्या भक्तिभावानं या पालख्यांना हुलपे देतात. मग त्यात हिंदू किंवा मुस्लिम असा भेद केला जात नाही. या पालख्या प्रत्येकाच्या दारावर जातात. गेल्या अनेक दशकांपासून कोळथरे इथल्या इक्बाल मुकादम यांच्या घरातही शिमग्यात झेंडा येतो आणि तेही आनंदानं हुलपे भरतात. अशा अनेक गावांत शिमग्यानिमित्त धार्मिक सलोखा पाहायला मिळतो.

 

गाऱ्हाणं घालण्याची प्रथा
"हे देव बा महाराजा, आज जिल्ह्यातले भाविक तुझ्या पायाशी आले आसत... होय महाराजा... राज्यावर दुष्काळाचा सावट आसा, ता दूर कर रे महाराजा... होय महाराजा... सर्वांना सुखाचे, समाधानाचे दिवस दाखव रे महाराजा... होय महाराजा...” अशी गाऱ्हाणी घालून पाण्याचं संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना जिल्हाभरातून आलेल्या देवांकडे करण्यात आली.

 

palkhi mahostav 11लोककलेचं जतन व्हावं
देशात सध्या लोककलांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ती लोप पावू नये म्हणून गावागावात जाऊन लोकांनी चर्चा करून या महोत्सवाचं आयोजन केलं, अशी प्रतिक्रिया साईसेवा केंद्राचे अध्यक्ष सुहास खानविलकर यांनी दिली. यावेळी नमन, नकटा, शंकासुर, तमाशा, गोमूचा नाच, काटखेळ आदी पारंपरिक नृत्य पालख्यांबरोबर आलेल्या लोककलावंतांनी सादर केली. महाराष्ट्राला तितकासा परिचित नसलेल्या काटखेळाची सहा पथकं इथं दाखल झाली होती. ही परिस्थिती समाधानकारक आहे, असंही खानविलकर म्हणाले. साई सेवा केंद्रानं सुरू केलेली ही प्रथा अशीच कायम ठेवावी, त्याचबरोबर लोकांनीही त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलंय. आमदार दळवी यांनी यावेळी पालखी नृत्यात मोठ्या हिरिरीनं सहभाग घेतलाय.

 

कोकणाचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळं प्रत्येक गावात जाऊन पालखी पाहणं भाविकांना शक्य होत नाही. त्यामुळं दापोलीत एकाच ठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या या पालख्या पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. महिलांची संख्या तर यावेळी लक्षणीय असते. इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहण्यासारखा असतो. आता जिल्हाभरातून १८ पालख्या ढोल-ताशांच्या गजरात दापोली शहरात दाखल झाल्यात. दिवसभर या पालख्या शहरातल्या विविध भागात दर्शनासाठी नेण्यात आल्या.
श्री देव रवळनाथ, रत्नागिरी
श्री देवी चंडिका, नवीन मंदिर, खेर्डी
श्री देव भैरवनाथ, वाघवे
श्री देवी काळेश्वरी, लोणवाडी
श्री देव भैरवनाथ, ताडील
श्री देव भैरवनाथ, सारंग
श्री देवी महामाई, बांधतिवरे
श्री देवी महामाई, ताडील- सुरेवाडी
श्री देव जुना भैरी, साकुर्डे
श्री देव जुना भैरी, जगदाळेवाडी, साकुर्डे
श्री देव भैरवनाथ, इळणे
श्री देव धावजी, कळंबट
श्री देवी चंडिका, खेर्डी
श्री देवी रणभैरी, मराठवाडी, आपटी,
श्री देवी खेम, दळखण
श्री देवी काळकाई, दापोली
श्री देवी काळकाई, चांदिवणे
आदी पालख्यांचं दर्शन हजारो भाविकांनी घेतलं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.