टॉप न्यूज

रंगून जा, नैसर्गिक रंगांनी!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
होळीनिमित्तानं विविध रंग उधळून भावी आयुष्यातील रंगही आनंदाचे, समृद्धीचे असावेत, अशीच इच्छा प्रत्येक जण धरतो. पण, उधळले जाणारे रंग आरोग्यासाठी घातक असतील तर आयुष्याचा बेरंगही होऊ शकतो. त्यामुळं पाण्याची नासाडी न करता 'इको फ्रेंडली' होळी साजरी करण्याचा संदेश येथील दीपशिखा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी देताहेत. यासाठी त्या उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी शरीराला कोणताही अपाय न करणारे नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात, याचे धडेच देतात.
 

 

बाजारातील रंगांमुळं शरीराला अपाय
'वाईटाचा नाश आणि चांगल्या गोष्टींचं जतन' हा होळी सणाचा मुख्य उद्देश आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, कपट, कोतेपणा यांसह सर्व दुर्गुणांची होळी करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं होळी साजरी करणं होय. होळी म्हटलं की, लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना रंग खेळण्याचा मोह आवरता येत नाही. होळीसाठी बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या रंगांमुळं शरीराला अनेकदा गंभीर दुखापत होऊ शकते. त्वचेला अपाय होऊ शकतो. कायमचं अंधत्वही येऊ शकतं. काळानुरूप होळी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल होताना दिसताहेत. यातही आता पर्यावरणपूरक होळी साजरी जर झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल. हाच विचार ध्यानात ठेवून मनीषा चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले.
 

002पर्यावरणपूरक होळीसाठी जनजागृती
पर्यावरणाशी बांधिलकी जपत चौधरी गेली अनेक वर्षं नैसर्गिक होळी कशी साजरी करता येईल याबाबत जनजागृती करत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या विषारी रंगांमुळे अनेक पालक आपल्या चिमुकल्या मुलांना होळी खेळण्यापासून परावृत्त करतात. त्यामुळं होळीचा नैसर्गिक निखळ आनंद मुलांना लुटता येत नाही. रंग खेळून आल्यानंतर त्यांना स्वच्छ करणं म्हणजे अनेक पालकांची खरी परीक्षाच ठरते. बाजारातील रंग हे शरीरापासून लगेच वेगळे होत नाहीत. त्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो. तसंच यामुळं पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून मनीषा चौधरी या घरच्या घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून नैसर्गिक रंग कसे बनवावेत, याचे धडे पालकांना आणि मुलांना देतात. यासाठी त्या अनेक सोसायटीत, कार्यक्रमाअंतर्गत या नैसर्गिक रंग निर्मितीच्या कार्यशाळा घेतात.

 

मनीषा चौधरींचे नैसर्गिक रंग निर्मितीचे प्रकार :-


हिरवा रंग

हिरवा रंग हा अनेक प्रकारे तयार करता येतो, विशेषतः हा रंग पालकाच्या भाजीपासून, कडुनिंबाच्या
पाल्यापासून तयार करता येतो. या पालकाच्या पाल्याचा लगदा तयार केल्यावर त्यात पाणी मिसळून हिरवा रंग तयार होतो. पिचकारीसाठी मात्र बनवलेला हा रंग गाळून घ्यावा लागतो.

 


पिवळा रंगeco friendly holi 11

झेंडूची ताजी किंवा वाळलेली फुलं किंवा हळद आणि मैदा यापासून पिवळा रंग तयार करता येतो. यासाठी झेंडूची फुलं साधारण गरम वा कोमट पाण्यात कमीत कमी सात ते आठ तास भिजवून ठेवणं गरजेचं असतं. तसंच हळद आणि मैदा यांचं मिश्रण करून ते सुकवल्यानंतर त्याचा कोरडा पिवळा रंग तयार होतो.

 


गुलाबी रंग

बीटपासून हा रंग तयार करता येतो. किसलेलं बीट पाण्यात मिसळून गुलाबी रंग तयार करता येतो.

 

नारिंगी रंग
डाळिंबाच्या सालीपासून हा रंग तयार करता येतो. डाळिंबाची साल गरम, कोमट पाण्यात
कमीत कमी सात ते आठ तास भिजवून ठेवल्यानंतर हा नारिंगी रंग तयार करता येतो.

 

काळा रंग
हा रंग आवळ्याच्या पावडरपासून तयार करता येतो. आवळ्याची पावडर सात ते आठ तास लोखंडाच्या कढईत
भिजवून ठेवल्यानंतर काळा रंग तयार होतो.

 

eco friendly holi 12रंगकौशल्य शिकण्यासाठी मुलांबरोबर पालकही
अनेक रंगीबेरंगी फुलांपासून वेगवेगळे रंग बनवता येतात. त्यासाठी पालकांची आणि मुलांची इच्छाशक्ती गरजेची असते, असं मनीषाताई म्हणतात. त्यांच्या या कार्यशाळेत अनेक मुलांची, बालगोपाळांची हजेरी असतेच. त्याचबरोबर आपल्या चिमुकल्यांचा उत्साह कमी होऊ नये, त्यांना होळीचा आनंद लुटता आला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं पालकही रंग बनवण्याचं कौशल्य शिकून घेण्यासाठी त्यांच्या या कार्यशाळेत हजर असतात.

 

पर्यावरण आणि पाणी बचतीचेही धडे
मनीषाताई या मुलांना नैसर्गिक रंगांबरोबरच पर्यावरणाचे आणि पाणी बचतीचे धडेही देत असतात. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलाय, पाणी टंचाईनं तर कळसच गाठलाय. त्यामुळं होळीनिमित्त नेहमी होणारी पाण्याची नासाडी थांबवून नैसर्गिक रंगानं होळी खेळल्यास त्यापासून शरीराला अपाय तर होत नाहीच, उलट त्वचेचं रक्षण होतं. शिवाय अतिशय कमी पाण्यात ते सहजपणे धुता येतात. त्यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणात बचतही होते. मनीषाताई तर पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगानं मुलांना फक्त टिळा होळी खेळा, असं सुचवत आहेत.

 

रंगांची उधळण करण्यासाठी जो-तो आतुर झालेला असल्यामुळं नैसर्गिक रंगानं होळी खेळा आणि पर्यावरणाची कास धरा, पाण्याची बचत करा असा मौलिक संदेश दीपशिखा फॉऊंडेशनच्या मनीषा चौधरी देताहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला 'भारत4इंडिया'चा सलाम.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.