टॉप न्यूज

बिगी बिगी जाऊ चल, भोंगऱ्याला!

ब्युरो रिपोर्ट, वैजापूर
विवाह ठरवण्यासाठी जातीनिहाय वधू-वर मेळावे होतात. शहरात वधू-वर सूचक केंद्रं दिसतात. याशिवाय ऑनलाईन मँरेज ब्युरोंची धूम आहेच. पण हे सारं झालं अलीकडचं. आदिवासी समाजात यासाठी परंपराच आहे. त्यासाठी होळीचा दिवस मुक्रर करण्यात आलाय. गावात होळीआधी बाजार भरतो. याच बाजारात उपवर तरुण-तरुणी एकमेकांना बघून आपला जोडीदार निवडतात. म्हणूनच भोंगऱ्या म्हणतात या सणाला... भोंगऱ्या!   
 

DSCN4964
सातपुडा पर्वतरांगेत १६ आदिवासी गावं आहेत. त्यातील वैजापूर हे या गावांमध्ये सर्वात मोठं गाव.   होळीच्या या सणाला सुरुवात होते ती सुमारे आठवडाभरापूर्वी. सातपुड्यातील आणि सीमेवरील लहान लहान गावात भरणाऱ्या आठवडे बाजारात परिसरातील आदिवासी बांधव या सणाच्या तयारीस लागणारं साहित्य आणि नवीन कपडे खरेदीसाठी येत असतात. हा बाजार होळीच्या आधी भरतो, म्हणून या बाजाराला 'भोंगऱ्या बाजार' म्हणतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पारंपरिक वेश परिधान करून नटूनथटून सजवलेल्या बैलगाडीतून बाजाराच्या ठिकाणी येतात.

 

DSCN4982

 

 

मानाचा ढोल आणि नाच
बाजारात येणाऱ्या आपल्या प्रत्येक नातेवाईकाला होळीच्या शुभेच्छा देत रंग लावून नाचत-गात हा सण साजरा करीत असतात. या बाजाराला जणू जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. या बाजाराचं मुख्य आकर्षण असतं ते प्रत्येक गावाचा आलेला मानाचा ढोल आणि त्या ढोलाच्या तालावर नाचणारे गावातील आबालवृद्ध. या प्रत्येक गावात आठवडाभर आधी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी भोंगऱ्या बाजार असतो. प्रत्येक गावाचा ढोल या यावेळी आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असतो. पण ज्या गावात भोंगऱ्या बाजार असतो त्या गावाचा ढोल त्या बाजारात मानाचा समजला जातो. 

 

 

DSCN5046दारू आणि बिडीही

वैजापूर गावात भरणाऱ्या या भोंगऱ्या बाजारास महाराष्ट्रातील, तसंच सीमेपलीकडील खेड्यापाड्यांतून हजारो आदिवासी येत असतात. काळ बदलला असला तरीही सातपुड्यातील आदिवासींच्या जीवनात या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचं महत्त्व कायम आहे. या भोंगऱ्या बाजारातून हा आदिवासी समाज आपला विवाह जुळवण्याची ही अनोखी परंपरा आजही जपत आहे. भोंगऱ्या बाजारात येणाऱ्यांचं स्वागत दारू, तसंच बिडी देऊन केलं जातं. होळीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या वैजापूरच्या या भोंगऱ्या बाजारास जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. जवळपास एक लाख लोक या भोंगऱ्या बाजारात येऊन खरेदी करतात. अनेक गावांतून आलेली आदिवासी कुटुंबं या जत्रेचा आनंद लुटत असतात. उंच उंच आकाशाला भिडणारे पाळणे, गोल गोल फिरणारे झोपाळे या बाजारात लहान-मोठ्यांचं मनोरंजन करीत असतात. अनेक पारंपरिक खेळ आणि कुस्त्यांचं आयोजन भोंगऱ्या बाजाराच्या निमित्तानं केलं जातं. आदिवासी महिलांसाठी 'कावल्या' (बांगड्या) आणि धोती (आदिवासी स्त्रियांचा पेहराव)ची अनेक दुकानं या बाजारात लावलेली असतात. खरेदीचा शीण घालवण्यासाठी भोंगऱ्या बाजाराच्या मध्यभागी वाजत असलेल्या ढोल आणि थाटीच्या (पितळी ताट) तालावर हे आदिवासी ताल धरतात. स्त्री-पुरुष असा कुठलाही भेदभाव यात केला जात नाही.


शेतीसाठी लागणारी अवजारं, घरगुती वापरास लागणारी भांडी, किराणा सामान, कापड, दागदागिने, अशी अनेक दुकानं या बाजारात थाटलेली असतात. चुरमुरे, डाळ्या आणि शेव अशा खास आदिवासींच्या न्याहारीला लागणारी मिरीची दुकानं भोंगऱ्या बाजारात असतात. रंगांची उधळण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळत अशीही आनंदात साजरी करता येते होळी.

 

 

भोंगऱ्याचं वाणDSCN4985

मकरसंक्रांताला आपल्याकडं जसं वाण देण्याची प्रथा आहे तसंच आदिवासींमध्येही होळाच्या दिवसापर्यंत भोगऱ्या देण्याची प्रथा आहे. या भोंगऱ्या म्हणजे चणे-फुटाणे, डाळ, आणि काहीतरी गोड पदार्थ. होळाच्या दिवसापर्यंत घरी येणाऱ्या प्रत्येकाला यातलं थोडं थोडं वाण दिलं जातं. त्याची खरेदी या भोंगऱ्या बाजारात करण्यात येते.

 

भोंगऱ्यातील पानाची प्रथा

भोंगऱ्या बाजारात ठिकठिकाणी पानाच्या टपऱ्या लावलेल्या असतात, एखाद्या आदिवासी तरुणाला जर कोणी आदिवासी मुलगी आवडली तर त्यानं तिला तिथलं पान खायला द्यायची प्रथा आहे.

 

IMG 8148

 

होळीनंतर लग्नसराई


होळीच्या अगोदर एक महिन्यापासून ते आपल्या उपवर मुलामुलींची सोयरिक जुळवण्यासाठी या सणाची आणि या बाजाराची वाट आतुरतेनं पाहतात. याच बाजारात उपवर तरुण-तरुणी एकमेकांना बघून आपला जोडीदार निवडतात. या बाजारामुळं होळी संपल्यावर लग्नसराई सुरू होते. या बाजारात जी मुलगी घरच्यांनी पसंत केलेली असते किंवा एखादी मुलगी पसंत पडलेली असते त्या मुलींला तो मुलगा पळवून नेतो आणि आपल्या नातेवाईकांकडं राहतो. नातेवाईकांच्या माध्यमातून मुलीच्या वडिलांकडे मागणी घालतो. मुलीच्या वडिलांची संमती मिळाली तर विवाह संपन्न होतो. त्याचबरोबर आदिवासी समाजात मुलींना मानाचं स्थान आहे. या समाजात मुलींना हुंडा देण्याची प्रथा आहे. आदिवासी कितीही श्रीमंत असो वा गरीब, समाजानं ठरवलेली १३, ४१८ रुपयाची रोकड हुंडा म्हणून मुलाकडून मुलीला दिली जाते.

आताच्या होळीतही सगळं डिट्टो असंच आहे...महाराजा! मग. बिगी बिगी जाऊ या का भोंगऱ्याला...?

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.