टॉप न्यूज

दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानं हे चित्र बदलण्याची आशा निर्माण झालीय.
 

 

Rajnath singh 3.pngयेत्या संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील दुष्काळावर आवाज उठवू, तसंच वेळ पडल्यास संसदेचं कामकाज ठप्प करू, पण मदत देण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असं आश्वासन राजनाथसिंह यांनी दिलंय. त्यामुळं येत्या २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाकडं आता सर्वांचं लक्ष राहणार आहे. याशिवाय चारा छावण्यांचे पैसे सात दिवसांच्या आत दिले नाहीत तर आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिलाय.

 

अध्यक्षपदानंतर पहिलाच महाराष्ट्राचा दौरा
राजनाथसिंह यांनी नुकतीच मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सिंह यांचा हा महाराष्ट्रातील पहिलाच दोन दिवसांचा दौरा होता. सकाळी साडेदहा वाजता सिंह यांचं विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी चित्ते पिंपळगाव येथील छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना येथील चारा छावणीला भेट दिली. या ठिकाणी माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा शाल देऊन सत्कार केला असताना राजनाथसिंह यांनी ही वेळ सत्काराची नाही म्हणून तो नाकारला. या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांसमोर भाषण करताना त्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

Rajnath Singh 9 2भाजपतर्फे एक लाख रुपयांची मदत
मलकापूर येथील रमेश डाके या शेतकऱ्याच्या दुष्काळामुळं जळालेल्या मोसंबीच्या बागेलाही राजनाथसिंह यांनी भेट दिली. लाडसांगवी इथं शेतकऱ्यांपुढं आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळाचा पहिला बळी ठरलेल्या लाडसांगवीच्या १४ वर्षीय अजय राजू भालेराव याच्या कुटुंबीयांची सिंह यांनी भेट घेतली आणि भाजपतर्फे या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाकरवाडी इथल्या चारा छावणीला भेट दिली, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच शेतकऱ्यांसोबत त्यांनी जेवणही घेतलं. यावेळी त्यांनी पत्रकांराशीही संवाद साधला.

 

मला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण आहे
शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपण आजपर्यंत माणसांसाठी कॅम्प घेतलेले पाहिले, मात्र जनावरांच्या चाऱ्यासाठी, पाण्यासाठी कॅम्प घेतलेले पहिल्यांदाच पाहतोय, असं सांगत मीही शेतकरी कुटुंबातील असून मला शेतकऱ्याच्या दुःखाची जाण आहे. शेतकरी आपल्या जनावरांना मुलाप्रमाणं सांभाळत असतो. त्यांना जीव लावत असतो. याच जनावरांना एखाद्या कॅम्पमध्ये ठेवताना त्याला किती यातना होत असतील... यामुळं माझं मन हेलावून गेलं असल्याचंही यावेळी बोलताना सिंह यांनी म्हटलं. महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ पडला यांची माहिती महाराष्ट्रातील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी मला दिली होती. यासंदर्भात लोकसभेत त्यांनी आवाजही उठवला होता. मात्र सरकारनं दुष्काळाची गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळं येत्या अधिवेशनात सरकारला याचा जाब विचारणार आहे, आणि वेळप्रसंगी संसद ठप्प करू, असंही सिंह यांनी सांगितलं.
Rajnath singh 7.pngशेतकऱ्यांना वर्षाचं सर्व कर्ज माफ करावं

सरकारकडं आपण शेतकऱ्यांना किमान दोन वर्षं शून्य व्याजदरावर कर्ज मिळावं, एका वर्षाचं सर्व कर्ज माफ करावं, अशी मागणी केली आहे असं सांगितलं. तसंच मराठवाड्यासाठी दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प हाती घ्यावा, फळबाग शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, तसंच दुष्काळग्रस्त निधी वाटपात होणारा भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी यावेळी राजनाथसिंह यांनी केली. निल्लोड, कायगाव, (ता. सिल्लोड) इथंही सिंह यांनी शेतकऱ्यांशी आणि मजुरांशी संवाद साधला. दुष्काळाची पाहणी केल्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारला धारेवर धरत केंद्र सरकारला दुष्काळासाठी अधिक मदत देण्यास भाग पाडू, असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं.

 


मुंडे आमरण उपोषणाला बसणार

पत्रकारांशी संवाद साधताना खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जनावरांच्या चारा छावण्या सुरू होऊन दोन महिने उलटले तरी सरकारनं या चारा छावण्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. जर येत्या सात दिवसांत सरकारनं हे पैसे दिले नाहीत, तर आपण औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. जर मुंडे यांचं उपोषण लांबलं तर आपणही दिल्ली सोडून मुंडेंसोबत उपोषणाला बसणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

 

Rajnath singh 6.pngप्रदेशाध्यक्षाची आठवडाभरात घोषणा
भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव निश्चित झालं असून त्याची घोषणा आठवडाभरात होईल, अशीही माहिती सिंह यांनी पत्रकारांना दिली. मुंडे आणि गडकरी यांनीच हे नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव सूचित केल्यामुळं वादाचा कोणताच मुद्दा राहणार नाही, असं स्पष्टीकरणही द्यायलाही ते विसरले नाहीत. या दौऱ्यात माजी मंत्री हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार पंकजा पालवे, राष्ट्रीय सरचिटणीस पूनम महाजन, शाम जाजू, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, उपमहापौर संजय जोशी, विजया रहाटकर, अतुल सावे आणि अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.